शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

पार्थसारथी मंदिर

WD
केरळमधील प्राचीन मंदिरांपैकी अरण्यमूल श्री पार्थसारथी मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. येथे श्रीकृष्ण पार्थसारथी रूपात बसले आहेत. केरळमधील पथानमथिट्टा जिल्ह्यात ‘पंबा’ नदीच्या किनारी हे मंदिर आहे. नि:शस्त्र कर्णाला मारल्याने प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाने हे मंदिर बांधल्याचे मानले जाते.

हे मंदिर मुळात शबरीमाला जवळील नीलकल येथे तयार करण्यात आले. त्यानंतर सहा बांबूंच्या सहाय्याने ते येथे आणण्यात आले. म्हणूनच या भागाचे नाव ‘अरण्यमूल’ पडले. मल्याळी भाषेत याचा अर्थ बांबूचे सहा तुकडे असा होतो.
ओणम या केरळमधील प्रसिद्ध उत्सवादरम्यान येथे नौकांची शर्यत आयोजित केली जाते.


WD
हे मंदिर दाक्षिणात्य वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. पार्थसारथीची मूर्ती सहा फूट उंच आहे. दरवाज्यावर सुंदर चित्रे आहेत. चार स्तंभावर हे मंदिर उभारले आहे. पूर्वेला असलेल्या स्तंभाजवळून मंदिरात जायला 18 पायर्‍या आहेत. तर उत्तरेला असलेल्या 17 पायर्‍या उतरून पंबा नदीवर जाता येते.

मल्याळी दिनदर्शिकेप्रमाणे मीनम या महिन्यात येथे दहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. ओणम उत्सव काळात येथे नौकाशर्यती होतात. या शर्यतींना ‘अरुण्मला वल्लमकली’ असे म्हणतात. या शर्यतीमागेही मोठी परंपरा आहे. या नौकेत तांदूळ आणि अन्य खाद्यपदार्थ घेऊन ते जवळच्या गावात वाटायची मंगद नावाची परंपरा शर्यतीत परिवर्तीत झाली. कोडीमट्टमने म्हणजे ध्वजारोहण होऊन उत्सवाला प्रारंभ होतो आणि मूर्तीला स्नान घालून सांगता होते.

WD
‘गरूडवाहन इजुनल्लातु’ हाही एक मोठा उत्सव तेथे होतो. यात शोभायात्रा काढली जाते. भगवान पार्थसारथी यांना गरूडाच्या रथावर बसवून पंबा नदीवर नेले जाते. यावेळी मंदिराला मोठा नजराणा भेट दिला जातो.

याशिवाय ‘खांडव नादाहनम’ नावाचाही एक उत्सव असतो. धनुस या मल्याळम महिन्यात तो साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीही येथे उत्साहात साजरी केली जाते.

पथानम थिट्टा येथून अरण्यमूल 16 कि. मी. अंतरावर आहे. येथून बसने जाता येते. रेल्वेने यायचे तर जवळ ‘चेनगन्नुर’ नावाचे रेल्वे स्टेशन आहे. तेथून अरण्यमूल 14 कि. मी. अंतरावर आहे. विमानाने यायचे तर कोचीला उतरून यावे लागेल. कोचीपासून अरण्यमूल 110 कि.मी. अंतरावर आहे. यात्रेच्या वेळी पर्यटकांची गर्दी होते.