गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

शापित सौंदर्य लाभलेले- स्वात खोरे

NDND
स्वात खोरे पाकिस्तानमधील स्वित्झलॅंड म्हणून ओळखले जाते. भारताशी तुलना करायची झाल्यास हे पाकिस्तानचे काश्मीर समजा ना. निसर्ग सौंदर्याचा साज चढवलेल्या या स्वात खोर्‍यात सुमारे साडेबारा लाख लोक रहातात. बर्फाच्छादित उंच उंच डोंगर व हिरवी शाल पांघरलेले पठार स्वातच्या सौंदर्यात भर घालत असतात. येथून वाहणार्‍या स्वात नदी उल्लेख ऋग्वेदामध्ये 'सुवास्तु' या नावाने आला आहे.

'सुवास्तू' हाच शब्द आज 'स्वात' म्हणून प्रचलित आहे. या भागाला भगवान बुद्धांचा वारसा लाभला असून हे बुद्ध संप्रदायाचे शिक्षण व साधनाचे एक मुख्य केंद्र होते. भगवान बुद्धांनी येथे काही काळ वास्तव्य करून नागरिकाना उपदेश दिल्याचे दाखले येथे सापडतात. बुद्धांचे पदचिन्ह स्वात संग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहे. इ. स. पूर्व 326 मध्ये एलेक्झांडर या भागात पोहोचला होता. पुढे चंद्रगुप्त मौर्याने स्वात खोरे आपल्या साम्राज्यात सामील करून घेतले.

येथील नैसर्गिक सौंदर्य व शांत, रमणीय वातावरण अनेकांना आकर्षित करून घेणारे ठरले आहे. राजे-महाराजापासून तर भिख्खू-महंतापर्यंत अनेकांना स्वातने आपल्याकडे खेचून घेतले आहे. येथील शांत व संथ वातावरण पाहून सुप्रसिद्ध बौद्ध सम्राट कनिष्कने आपली राजधानी पेशावरहून हलवून स्वात येथे स्थलातरित केली होती. बुद्ध धर्माच्या वज्रयान पंथाचे उगमस्थान हे 'स्वात' आहे.

गंधार कला केंद्र-
स्वात खोरे प्राचीन गांधार संस्कृतीचा भाग होती. येथील कला विश्वविख्यात आहे. येथील मूर्तीकलेचा प्रचार फार दूरदूरपर्यंत झाला आहे. पूर्वीच्या काळी येथे दीड हजार स्तुप व बौद्ध मठ स्थापन करण्‍यात आले होते. आजही येथे त्यातील 400 पेक्षा अधिकांचे अवशेष सापडतात.

मोगलांनी अनेकदा स्वात खोरे काबिज करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते त्यात यशस्वी ठरले नाहीत. 1840 मध्ये सूफी संत अब्दुल गफूर यांच्या नेतृत्वाखाली स्वात खोर्‍यासाठी इंग्रजाविरूध्द बंड पुकारण्यात आले. परंतु, इंग्रजानी त्यांना पराभूत केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे स्वात खोर्‍यात अब्दुल गफूरचा नातू मियाँ गुल वदूदच्या नेतृत्त्वाखालील राज्याला ब्रिटिशांनी मान्यता दिली. 1947 मध्ये स्वातचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला. तेव्हाही मियाँ गुल वदूद यांचेच नेतृत्त्व होते. पुढे पाकिस्तानी कायदे या भागात 1969 मध्ये लागू करण्यात आल्यानंतर स्वात खोरे पाकिस्तानात खर्‍या अर्थाने समाविष्ट करण्यात आले.

स्वातला नैसर्गिक सौंदर्याची खाण म्हटले जाते. मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. परंतु, आता हा भाग तालिबान्यांच्या हाती गेला आहे. पर्यटक येथे जाण्यास घाबरतात.

स्वात नदीमुळे स्वात खोर्‍याचे सौंदर्य वाढले आहे. येथे मासे पैदास केंद्र मोठ्या प्रमाणात आहे. तोच येथील मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायातून येथील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत असतो. पाकिस्तानीच नव्हे तर परदेशी पर्यटकही येथे येत असतात.

स्वात नदी व्यतिरिक्त येथे अनेक ऐतिहासिक तसेच नैसर्गिक स्थळे या खोर्‍यात आहेत. स्वात खोर्‍यात सापडलेले अवशेष येथील संग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयाच्या शेजारी इ.स. पूर्व काळातील बुतकारा स्तंभ आहे. सम्राट अशोकाने त्याची निर्मिती केल्याचे सांगितले जाते.
NDND

येथे ऐतिहासिक स्तंभही जागोजागी आढळतात. येथे 'पान' नामक एक स्थळ असून तेथे एक स्तंभ आहे. शिवाय एका पुरातन मठाचे अवशेषही आहेत. कबाल येथे एक मोठा गोल्फ कोर्स असून तो पर्यटकांसाठी बाराही महिने खुला असतो.

स्वात खोर्‍यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण म्हमजे मियाँदम. येथे जाणारे सगळे मार्ग डोंगराच्या अंगाखांद्यांवरून जाणारे आहेत. त्यामुळे पर्वतारोहण, स्कीइंगसाठी येथे अनेक स्थळे आहेत. येथील मादयान हे शॉपिंगसाठी लोकप्रिय आहे.

येथील बाजारात ऊबदार कपडे, शाल, पारंपारिक कलाकुसरीचे दागिने, काश्तकारीचे सामान, ऐतिहासिक महत्व असलेली नाणी आदी साहित्य पर्यटकाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते.