शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : सोमवार, 8 डिसेंबर 2014 (15:04 IST)

स्वप्नाकडून सत्यापर्यंत (लेह लद्दाख बुलेट प्रवास)

- योगेश अरविंद अनासपुरे
 
माझं हे प्रवासवर्णन आहे अगदी साधं! यात शब्दांच्या चमत्कृती नाहीत की सराईत कोलांट्याउड्या नाहीत! आहेत ते प्रवासात मनामधे आलेले, छोट्याश्या डायरीत त्याचवेळी टिपलेले आणि हा ब्लॉग लिहिताना सरळपणे मांडलेले विचार!
 
प्रवासवर्णनं संयत असावी लागतात कारण अनाठायी तपशिलांमुळे ती शब्दबंबाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीही अनावश्यक वर्णनं वगळून किमान वेळात वाचून होईल असं सुटसुटीत प्रवासवर्णन लिहिलंय. हे वाचून जर कोणाला हा जादूई प्रवास करावासा वाटला तर माझी उठाठेव सफळ होईल.
 
प्रत्येकानंच मनाशी जसं अगदी स्वतःचं असं एखादं स्वप्न बाळगलेलं असतं, तसंच माझंही एक स्वप्न होतं...एखाद्या अद्भुत-अनोख्या प्रवासाचं! मात्र हे स्वप्न वास्तव झाल्याचं पहाण्यासाठी एखादी जादूची कांडी फिरावी अशीही माझी अवास्तव मागणी कधीही नव्हती. त्यासाठी हवा तेवढा घाम गाळायला मी राजी होतो. त्याचा पाठपुरावा करण्याचं धैर्यही मी उराशी बाळगलेलं होतंच. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचं या संबंधी फार छान वाक्य आहेः You have to dream before your dreams can come true. मला हेही चांगलंच ठाऊक होतं की माझं स्वप्न जर मला साकार करायचं असेल तर केवळ कृती करुन चालणार नाही तर मला ते साकार झाल्याच्या स्वप्नावरही कमालीचा विश्वास ठेवावा लागणार आहे. म्हणजे मग ती सकारात्मक ऊर्जाच मला प्रत्यक्षात सहाय्य करण्यासाठी धाऊन येईल. असं म्हणतात की जग हे एक उघडं पुस्तक आहे आणि जो प्रवास करत नाही तो त्या पुस्तकाचं केवळ एकच पान वाचतो. प्रवास करणं म्हणजे स्वतःचा नव्यानं शोध घेणं असतं...प्रवास करणं म्हणजे स्वतःच्याच अंतरंगात फेरफटका मारुन येण्यासारखं असतं. यावर्षी कैलास-मानससरोवर मनात ठरवलं होतं. पण काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही. 

प्रवासाचा पहिला नियम आहे - ज्यांच्याशी आपलं पटू शकत नाही अश्यांसोबत कधीही प्रवासाला न जाणं! पत्नी-मुलाबाळं-इष्ट-मित्रांसोबत प्रवास करावा...कारण यापूर्वी कधीही न जाणवलेला त्यांच्या स्वभावाचा एखादा अनोखा पैलू प्रवासात लख्खपणे चमकून जातो. त्यामुळेच मेहुणा रोहित कुलकर्णी आणि मित्र निलेश वैकर, आशुतोष मुळे, चारुदत्त जोशी आणि केदार बोबडे यांच्यासोबत मनाली-लेह-काश्मिर असा अद्भुत प्रवास बुलेट्सवरुन करायचं मी ठरवलं. पत्नी अनघा आणि आई-बाबांनी लागलीच परवानगी दिल्यामुळे हुरूप आला.

मुख्य अडचण होती ती व्यावसायिक कामांतून १५ दिवस सुट्टी काढण्याची आणि बुलेट मिळवण्याची! माझ्यापुरतं बोलायचं झालं तर, प्रवासच मला पोटापाण्यासाठी माझा व्यवसाय करायला आणि रोजचं जगणं आनंदात जगायला प्रोत्साहन देत असतो. प्रवासावर माझं निरतिशय प्रेम असल्यानं कदाचित् असेल पण माझ्या या दोन्हीही अडचणी चुटकीसरशी दूर झाल्या. बालमित्र भूषण भणगेनं क्षणार्धात् त्याच्या बुलेटची किल्ली माझ्या हातात सोपावली आणि व्यवसायात मार्गदर्शक असलेले माझे काका श्री. सुधीर जोशींनीही लागलीच प्रवासाचं 
बुकींग करुन टाकायला सांगितलं. प्रवासाला जाण्यापूर्वी माझे व्यावसायिक भागिदार आणि मित्र श्री. मंगेश मिरीकरांनी पाठीवर आश्वासक हात फिरवत म्हटलं, "योगेश बिनधास्त जाऊन ये! इथलं सगळं सांभाळायला मी आहे! काही काळजी करु नकोस!" 

प्रवासाला निघण्याआधीच ‘प्रवासी’ व्हायचंय का ‘टूरीस्ट’ व्हायचंय हेदेखील ज्यानंत्यानं आपापल्या 'तब्येतीनुसार' ठरवावं! कारण दोघांच्याही 'पहाण्यात' कमालीचं अंतर असतं...प्रवाश्याला 'न दिसणारंही' खुणावत असतं तर टूरीस्ट जे 'पहायला' आलेला असतो, तेच केवळ त्याला 'दिसत' असतं. प्रवासात केवळ 'स्मृती' हीच ती काय एकमेव बॅग पाठीवर टाका…अनावश्यक काहीही सोबत घेऊ नका. 

आम्ही 'एसपीआर-गिरिरत्न हायकर्स' या संस्थेमार्फत बुकींग करुन टाकलं आणि मग तयारीला वेग आला. 'हे लागेल - ते लागेल' असं करताकरता ही भलीमोठी सॅक भरली. त्यात खाण्याच्या टिकाऊ पदार्थांपासून गरम कपडे-कॅमेरा-बुलेटचे आवश्यक सुटे भाग होते. प्रवासात एकूण १६ जण राईडर्स, ५ जण पिलियन राईडर्स आणि कारमधून प्रवास करणारे ७ जण असा २८ जणांचा ग्रुप तयार झाला. मुंबईहून रेल्वेनं चंदीगडला पोहोचल्यावर ख-या अर्थानं प्रवास सुरु झाला. चंदीगडमधे ज्या हॉटेलमधे उतरण्याची सोय केलेली होती, तिथे आम्ही पोहोचण्याआधीच आमच्या बुलेट्स आमची वाट पहात उभ्या होत्या. त्यांच्याकडे पहाताना मनात येऊन गेलं, 'आता इथून पुढे १०-१२ दिवस या बुलेट्सच आपलं सर्वस्व आहेत...आपल्यासाठी ईश्वराचं रुप आहेत...!' मनोमनच त्यांना सॅल्यूट ठोकून घेतला. अश्या 'हाय अल्टिट्यूड' प्रवासातील सर्वात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे भरपूर पाणी पिणं आणि मांसाहार-मद्यपान पूर्ण वर्ज्य! 

दुस-या दिवशी सकल शुभकार्याचा सिद्धीदाता श्रीगणेश आणि स्मरणगामी श्रीदत्तप्रभू यांचं स्मरण करुन मनालीच्या दिशेनं बुलेट्ला किक् मारली. अज्ञाताविषयी भीति, हुरहूर, धाकधूक वाटणं हा मानवी स्वभाव आहे. त्याचाच अनुभव पहिल्या दिवशी येत होता. आभाळ आलेलं होतं, भुरभुर पाऊसही पडत होता. भोवतालच्या शेतांचा हिरवाकंच रंग क्षितिजापर्यंत पसरलेला होता. वर काळेकुळकूळीत ढग, त्यातून पडत असलेले पावसाचे रुपेरी थेंब आणि आजूबाजूची ती हिरवाई हे सगळंच दैवी होतं. 

वाटेत प्रथम पाहिला तो बियास नदीवर १९७७ साली उभारलेला ‘पंडोह डॅम’! इथे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. रात्री मनाली मुक्कामी पोहोचलो. दुसरा दिवसही आम्ही मनालीतच होतो. गाड्यांची देखभाल, पेट्रोल भरणं, काही किरकोळ खरेदी यात तो दिवसही चटकन मावळला. 

पुढच्या दिवसापासून रोहतांगपास-राणी नल्ला-टांगलांगला अश्या आमच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. मनालीहून रोहतांगपास पार करताना प्रवासात धुकं-पाऊस-ग्लेसियर्सचं वितळलेलं पाणी-ट्रॅफिक् अशी सत्राशेसाठ विघ्नं येऊ शकतात. परंतु सुदैवानं तसं काहीही न होता आमचा तोही टप्पा निर्विघ्नपणे पार पडला. एका बाजूला पांढ-या शुभ्र हिमानं झाकलेले उंच पर्वत आणि दुसरीकडे काळजाचा ठोका चुकवणारी खोल दरी अशी निसर्गाची दोन्हीही रुपं आम्ही पहात होतो.

मौजेची गोष्ट अशी की वाटेत ‘तंडी’ या गावात आमचं स्वागत केलं ते 'चंद्रभागा' नदीनं! त्या नदीचं नाव ऐकताक्षणीच आमचं मराठी मन केंव्हाच पंढरपुरात सावळ्या विठोबाच्या समचरणी जाऊन पोहोचलं होतं. तंडीमधे भेटलेली ही चंद्रभागा नदी 'चंद्र' आणि 'भागा' या दोन नद्यांच्या संगमानं निर्माण झालीये. आणि तिलाच पुढे 'चिनाब' या नावानं ओळखतात. (या तंडी गावानंतर पुढे ३०० किमी अंतरापर्यंत पेट्रोलपंप नाही, हे लक्षात असू द्यावं.) त्या रात्रीचा मुक्काम होता निसर्गानं फार जिव्हाळ्यानं घट्ट मिठी मारलेल्या ‘केलांग’ या चिमुकल्या 
गावात! या गावात वास्तव्यासाठी आटोपशीर आणि स्वच्छ अशी गेस्ट हाऊसेस् उपलब्ध आहेत. 

सकाळी जाग येताच नजर खिडकीबाहेर गेली. क्षितिजावर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य होतं. त्या परिसराचं वातावरणच प्रदुषणमुक्त असल्यानं इंद्रधनुष्याचे सगळेच रंग अनाघ्रात फुलासारखे तजेलदार दिसत होते. काही वेळानं पुढचा प्रवास सुरु झाला समुद्रसपाटीपासून १४००० फूट उंचीवर असलेल्या 'सारचू' या ठिकाणाच्या दिशेनं! कठीण परीक्षा देतदेतच दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. या ठिकाणापासून निसर्गात बदल व्हायला लागतो. त्यामुळेच आमच्यातल्या बहुतेकजणांना डोकेदुखी-श्वसनाचा त्रास व्हायला लागला होता. कापूर हुंगणं, लसूण खाणं, लसणाचं पाणी पिणं यासारखे आमचे 'आजीबाईच्या बटव्यातले' उपाय चालू होतेच.
अत्यंत तीव्र चढ-उतार असलेला 'बारलाचापास' ओलांडून आम्ही 'सारचू' ला पोहोचलो. सारचूनंतर निसर्गाची हिरवाई संपली आणि शीतवाळवंटाचा प्रदेश सुरु झाला. ग्लेसियर्सवरुन येणारं थंड वारं आणि उलटपक्षी वर तळपणारा सूर्य यामधे आमची कठीण परीक्षा होत होती. सारचूच्या मुक्कामी रात्री आमच्यातल्या काहीजणांना भारतीय सेनेच्या कॅम्पमधे ऑक्सीजन देऊन आणावा लागला. बल्ब नसलेल्या तंबूत आडवं झालो खरं, पण बाहेर प्रचंड वेगानं थंड वारं वहात होतं. आपल्या उरावर कोणीतरी मोठ्ठी शिळा ठेवलीये असं वाटायला लागलं. त्यामुळे काही केल्या डोळा लागेना...शेवटी ती आख्खी रात्र बसून काढावी लागली. शेजारच्या बाथरुममधे जाऊन आलं तरी दिडदोन किलोमीटर पळून आल्यासारखी धाप लागत होती. एकदा मनात येऊन गेलं की उगीचच या फंदात पडलो...सरळ उठावं आणि घरी जावं. पण क्षणभर वाट चुकलेलं मन पुन्हा भानावर आलं आणि मगाशी निराश झालेलं तेच मन आता आत्मविश्वास देत होतं, 'अरे या निराळ्या अनुभवांसाठीच तर तू इथे आलायस ...पळून काय जातोस...तोंड दे आणि बघ कशी गंमत येते ती!' मग ती रात्र मांडी घालून श्रीदत्तनामस्मरणातच संपली. 

त्या भागात फोन्सची रेंज नसल्यानं अखंड २४ तास अनघाशी फोनसंपर्क होऊ शकलेला नव्हता…टेलिपथीचाही प्रयत्न करुन पाहिला. असो! सकाळी २५० किमी अंतरावर असलेल्या ‘लेह’ च्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. एका डोंगराला वळसा घालात वर चढायचं आणि लागलीच उतरायचं. हे झालं की पुढे दुसरा डोंगर तयारच असतो. असाच हाप्रवास चालू होता. ‘पांग’ या खेडेगावात दुपारचं जेवण केलं आणि तिथल्या मिलिटरी कॅम्पमधे वैद्यकीय तपासणी करुन आलो. भारतीय सेनेचे हे कॅम्पस् अतिशय सेवाभावानं भोजन, गाडी, शारिरीक प्रकृती, झोपणं याबाबतीतल्या आपल्या प्रत्येक अडचणींवर सहाय्य करतात. 

तिथल्या डॉक्टरांकडून आम्हालाही खूप मोलाच्या सुचना मिळाल्या. पुढे 'मोरये' नावाचं एक पठार लागलं. त्या पठारावर होता सुमारे ४० किमी चा सरळ आणि सुंदर रस्ता! मात्र नंतर पुन्हा वळणाचा रस्ता सुरु झाला. घाटानंतर होता 'गाटा लूप्स' नावाचा २१ हेअर पिन् बेंड्स असलेला अवघड रस्ता! ऊनही कडकडीत पडलेलं होतं. घाट चढल्यावर आम्ही पोहोचलो ‘टांगलांगला’ इथे! हा आहे जगातला समुद्रसपाटीपासून दुस-या क्रमांकाचा उंचीवरचा रस्ता! तिथेच आम्हाला बर्फवृष्टीही अनुभवायला मिळाली. 

घाट उतरुन खाली आल्यावर बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनाईझेशन) नं लावलेले वैशिष्ट्यपूर्ण निरनिराळे फलक दिसत होते. त्यातील काही लक्षात राहीले ते असे, ‘Driving is risky, with whisky!’, ‘Better Mr. Late than Late Mr.’ किंवा ‘It’s not a rally, enjoy the valley!’ या अश्या दुर्गम भागात आणि अत्यंत प्रतिकूल हवामानामधे बीआरओ करत असलेल्या सेवाभावी कार्याला त्रिवार वंदन! वाटेमधे 'शे' या गावात शे राजवाडा आणि त्याच्या शेजारीच जिथे ‘३ इडियट्स’ चं शूटींग झालं ती शाळाही दिसली. तिथेच ‘ठिकसे मोनास्ट्री’ ही पाहिली. दुस-या दिवसाचं आमचं आकर्षण होतं १६० स्क्वे किमी असलेलं 'पॅन्गॉन्ग लेक'! वाटेत आम्हाला लागला जगातील तिस-या क्रमांकाचा उंचीवरील ‘चांगलापास’ हा मार्ग! तो उतरुन आल्यावर मराठा लाईट इन्फंट्रीचं एक चेक पोस्ट आम्हाला लागलं. तिथे आरामासाठी खुर्च्या, गरम पाणी, चहा, बदाम-मनुकेही स्वागतासाठी ठेवलेले होते. तिथल्या सगळ्या मराठी जवांनाशी गप्पा मारताना आपणही मराठी असल्याच्या अभिमानानं ऊर भरुन आला. 

देशरक्षणासोबतच आपले भारतीय जवान पर्यटकांची सरबराईही किती निःस्वार्थीपणानं आणि मनापासून करतायत् तेही 'याची देही, याची डोळा' अनुभवायला मिळालं. माझ्या नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी, अकोळनेर, नांदूर शिंगवे या गावचे आणि खुद्द माझ्या कर्जत या तालुक्यातले जवानही तिथे भेटले. 

१६० किमीचा खडतर रस्ता पार करीत १४२७० फूटावर असलेल्या त्या तलावावर आम्ही पोहोचलो. एवढया उंचीवर असूनही याचं पाणी खारट आहे. खारट पाणी असलेलं हे जगातलं सर्वोच्च सरोवर! दुसरं आश्चर्य असं की हे पाणी खारट असूनही हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठून जातं. यालाच तिबेटन भाषेत 'पॅन्गॉन्ग त्सो' असं म्हणतात. याचा ६०% भाग तिबेटमधे आहे. समोर होतं सरोवराचं निळंशार पाणी आणि डोक्यावर होतं निळं आकाश! निळा रंग हा मूळातच मनाला अगदी शांत-समाधानी करणारा आहे. त्यात त्याचं ते अनोखं रुप  पाहून 'हरखून जाणं' या वाक्प्रचाराची व्याप्ती मला आपसूकच कळाली. ज्या साठी आपण आटापिटा करतो-जीवाचं रान करतो, ते साध्य झाल्यावर 'याचसाठी केला होता अट्टहास' हा संत तुकाराम महाराजांचा अभंग माझ्यासारख्या मराठी मनाला आठवला नाही तरच नवल! पॅन्गॉन्ग सरोवराच्या त्या निळाईला कवटाळून रात्री गाढ झोप लागण्याआधी आठवायला लागली पूर्वी कधीतरी वाचलेली, महान कवी विल्यम् बटलर यीट्सनं ‘इन्निसफ्री’ या सरोवरावर लिहिलेली कविता. 

सकाळी उठून पाहिलं तर सरोवरच्या पाण्यावर असलेल्या त्या निळ्या रंगाची जागा सोनेरी रंगानं घेतलेली होती. काही वेळानं तो हिरवा दिसू लागला. निसर्गाची ती करामत सोडून कुठेही जाऊच नये असं वाटत होतं...'निसर्गात भरूनी राहे अनादि अनंत' असं उगीचंच म्हणत नाही तेही जाणवलं. निसर्गदेवतेचा तो साक्षात्कार मोठया अनिच्छेनं सोडून जड पायानं आणि जड मनानंही पुन्हा लेहला परतलो. प्रत्येक गिर्यारोहकाला जसं एव्हरेस्ट सर करायचं असतं, तसंच प्रत्येक अस्सल बायकरला ‘खार्दुंगलापास’ इथं जायचं असतं. लेहपासून ६० किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण पाहिल्यावर तिथल्या भूमीला दंडवतही घातला. 

लेहमधे परतल्यावर भारतीय सेनेचं 'हॉल ऑफ् फेम' हे संग्रहालय पहायला गेलो. लेहला जाणा-या प्रत्येकानं हे अतिशय सुंदर असं संग्रहालय अवश्य पहायलाच हवं. तिथे जतन केलेली छायाचित्रं, कारगील सरशीवर असलेली 'ऑपरेशन विजय' ही फिल्म पाहिली. सियाचिन भागात आपले जवान कमरेइतक्या बर्फात उभं राहून देशाच्या सीमेचं रक्षण करतानाचे फोटो पाहिले आणि डोळे भरुन आले. इथे कारगील युद्धात हुतात्मा झालेल्या वीर भारतीय जवानांच्या सन्मानार्थ अतिशय सुंदर असं स्मारक उभारलेलं आहे. राष्ट्रकवी माखनलाल चतुर्वेदी यांचं फार समर्पक काव्य तिथे कोरलेलं आहे. 

पुढच्या दिवशी कारगीलला जाताना 'मॅग्नेटिक हिल्' या ठिकाणी वाहनावर होणारा चुंबकीय परिणाम अनुभवला. सिंधू-झंस्कार नदीच्या संगमात राफ्टींग केलं. चंद्रावरचे खळगे आणि डोंगरांची प्रतिकृतीच वाटावी अशी ‘मूनव्हॅली’ पाहिली. कारगील मुक्कामी पोहोचल्यावर तिथे नांदेडची एक व्यक्ती भेटली. कामासाठी त्याला इतक्या दूर आलेलं पाहून आश्चर्य वाटलं. कारगील वॉर म्युझियम पाहिलं. टोलोलिंग टॉप, टायगर हिल्, बत्रा टॉप ही केवळ वर्तमानपत्रातूनच वाचलेली आणि प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेली ठिकाणं पाहिली. 

भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या आठवणीनं अंगावर रोमांच उभे रहात होते. तिथे असलेल्या स्मृती स्तंभावर कारगील युद्धामधे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तिथल्या स्मारकावर प्रत्येक भारतीयाच्या मनातल्या ओळीच कोरलेल्या आहेत, 'शहिदोंके चिताओंपर  लगेंगे हर बरस मेले, वतनपर मर मिटनेवालोंका यहीं बाकी निशां होगा'! पुढच्या प्रवासात उत्सुकता होती ती श्रीनगर मार्गावरच्या ‘झोझिलापास’ ची! अत्यंत अरुंद मार्ग, एका बाजूला खोल दरी आणि कोणत्याही क्षणी पडणा-या दरडी यामुळे तो रस्ता अत्यंत भयावह आहे. जेंव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा नुकतीच एक दरड पडलेली होती आणि ती हटवण्याचंच काम बीआरओचे जवान करत होते. तिथून समोरच दिसत होती एक खोल दरी आणि अमरनाथ यात्रेच्या प्रारंभाचं स्थान ‘बालताल’! या ठीकाणापासून निसर्गाचं हिरवं आणि सौम्य रुप पुन्हा दिसायला लागतं. दरड दूर झाल्यानंतर खाचखळग्यांच्या रस्त्यातून ‘सोनमर्ग’ ला पोहोचलो. सोनमर्गहून श्रीनगरमधे प्रवेश करताक्षणीच जागोजाग दिसू लागले गस्त घालणारे सीआरपीएफचे सशस्त्र जवान! श्रीनगरमुक्कामी आद्य शंकराचार्य स्थापित शिवमंदिर, मोघल गार्डन पाहिलं. लाल चौक परिसरात काही खरेदी केली. 

प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरु झाला. श्रीनगरहून ‘नेहरु टनेल’ (३.२५ किमी लांबीचा) पार करुन जम्मूमधे आलो. गाड्या ट्रान्सपोर्टवाल्याकडे देऊन हॉटेलवर मुक्कामासाठी आलो. अश्या ह्या तब्बल २३०० किमी हून अधिक लांब आणि आयुष्यभरातले सोनेरी अनुभव देणा-या प्रवासाची इतिश्री झाली. प्रवासात आमच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे सहाजण आणि उरलेली मंडळी मुंबईची होती. या सगळ्याचजणांशी छान मैत्र निर्माण झालंय. घरात...'माझ्या माणसांमधे' परतल्यावर मनात विचार यायला लागला, 'घरच्या उबदार वातावरणात परतल्याखेरीज प्रवास किती सुंदर होता याची जाणिवच होत नसते नाही!' 

असं म्हणतात की 'वॉंडरींग वन गॅदर्स हनी'...! खरंच आहे की तेही! या सगळ्या प्रवासात माझ्या कानावर पडलेली नवीन भाषा, माझ्या डोळ्यांनी पाहिलेली संस्कृती आणि निसर्ग, माझ्या जीभेनं चाखलेलं आगळं असं चविष्ट अन्न याचे पडसाद माझ्या उभ्या व्यक्तीमत्वातच उमटायला लागलेले मला जाणवतील तेंव्हा माझा हा प्रवास यथार्थानं सफल होईल. मी कधीही ठरवून प्रवास करीत नाही...माझा प्रवास हा प्रवासासाठीच असतो...माझ्यासाठी महत्त्वाचं असतं त्याचत्याचपणाच्या कंटाळवाण्या चक्रातून बाहेर पडणं! 'एसपीआर गिरिरत्न हायकर्स' च्या सोबतीनं आम्ही केलेल्या या प्रवासाचं वर्णन शब्दात करत बसण्यापेक्षा त्याचा अनुभव तुम्हीही त्यांच्यासोबत प्रवास करुनच घेऊन पहा...साखरेचा गोडवा उगीचच शब्दबंबाळपणे वर्णन करण्याऐवजी ती चाखूनच पहावी हेच अधिक योग्य नाही का...! तरीही अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर 'एसपीआर गिरिरत्न हायकर्स' मधील शिल्पा-प्रकाश-राजेंद्र या त्रिकूटाला या  खडतर प्रवासातल्या सगळ्या प्रोज् आणि कॉन्स् यांची इत्यंभूत माहिती असल्यानं कुठेही नियोजनातली कसूर जाणवत नाही. फारफार मनापासून ही सफर आयोजित करतात हो हे तिघंहीजण! 

शिल्पा सर्वात पुढे असलेल्या गाडीतून प्रवास करत असताना, त्यापुढे कोणीही बायकर जाणार नाही यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन असते. प्रकाश तर सगळ्या बायकर्ससोबतच स्वतःही बाईकवरच असतो. राजेंद्रबद्दल तर काय बोलावं?

कमालीचा संयमी आहे तो! सगळ्या बायकर्सच्या मागे असलेल्या युटीलिटी व्हॅनमधे तो असतो आणि त्या व्हॅनमागे चुकून कोणी राहीलेलं नाहीये ना यावर तो लक्ष देत असतो. बायकर्स वाटेत कितीदाही फोटो काढायला थांबले तरीही तेवढ़्याच वेळेस राजेंद्रही व्हॅन थांबवतो...अगदी दर दोन-तीन मिनिटांनीही जरी कोणी फोटो काढायला किंवा इतर काही कारणासाठी थांबत असेल तर तोही तितक्याच वेळा कोणताही त्रागा न करता व्हॅन थांबवतो. आयुष्यात कधीही बॅट हातात न धरलेल्या व्यक्तीला जर नॅशनल टिमची निवड करायला सांगितली तर तो त्यात कायकाय घोळ घालून ठेवेल हे काही वेगळं सांगायलाच नको. पण इथे 'एसपीआर गिरिरत्न हायकर्स' मधे मात्र परिस्थिती अगदी (चांगल्या अर्थानं) 'विपरित' आहे...कारण या तिघांचा स्वभावच मुळात एका अस्सल प्रवाश्याचा आहे...त्यामुळे प्रवासात काय असायला हवंय आणि काय नकोय याचं त्यांना खडान् खडा ज्ञान आहे. बायकर्सची कोणतीही आबाळ होऊ नये यासाठी हे तिघंही जण अत्यंत प्रामाणिकपणे आणि अथकपणे प्रयत्न करताना मी या सर्व प्रवासभर त्यांना पाहिलंय. मी इथे 'माहिती' या शब्दापेक्षा जाणिवपूर्वक 'ज्ञान' हा शब्द  वापरलाय कारण 'माहिती' हून 'ज्ञानाची' व्याप्ती असीम आहे. 'एसपीआर गिरिरत्न हायकर्स' तर्फे संपूर्ण भारतभर गिर्यारोहणाच्या अश्याच अभिनव मोहिमांचं सातत्यानं आयोजन होत असतं.

अधिक माहितीसाठी संपर्कः
सौ. शिल्पा जोशी-चिमाड, ०९९२०३६०३३६