1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (12:09 IST)

Dev Ananad: देव आनंद यांच्या प्रेमाखातर चाहते जेव्हा स्वत:चे दात तोडून घ्यायचे...

Dev Ananad: "एका मुलीने मला अनेक पत्रं लिहिली होती आणि मी दहा-बारावेळा त्या पत्रांना उत्तरही दिलं पण नंतर मी तिच्या पत्रांना उत्तर देणं थांबवलं. तिने मी पाठवलेली सगळी पत्रं मला परत पाठवली. तिने मला कायमचा निरोप दिला होता, तिचा प्रेमभंग झाला होता.
 
माझ्या चाहत्यांची अशी हजारो पत्रं मला यायची. एकदा मी माझ्या एका चाहत्याच्या पत्राला उत्तर दिलं आणि त्यानंतर मी कधीतरी पुन्हा बोलेन या अपेक्षेत त्यानं मला तब्बल 3720 पत्रं पाठवली."
 
हा काल्पनिक किस्सा नाहीये, सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या 'रोमान्सिंग विथ लाईफ' या आत्मकथनात त्यांनी हा किस्सा सांगितलेला आहे. आज देव आनंद असते तर ते शंभर वर्षांचे असते.
 
केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, नेपाळ आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात देव आनंद यांचे चाहते आढळून येतात. डेविड लीन, ग्रेगरी पेक, फ़्रैंक कॅप्रा सारखे दिग्गज हॉलिवूड कलाकार त्यांचा आदर करत असत.
 
देव आनंद यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाब प्रांतात झाला होता. लाहोरमधून पदवी मिळवल्यानंतर, जुलै 1943 मध्ये, खिशात 30 रुपये घेऊन, ते फ्रंटियर मेलने मुंबईला आले आणि काही वर्षांतच ते भारतातील एक मोठे स्टार बनले.
 
त्यावेळी मुंबईला येताना त्यांना याची कल्पनाच नव्हती की पुन्हा लाहोरला परतायला त्यांना तब्बल पंचावन्न वर्षे वाट बघावी लागेल. लाहोरमध्येही देव आनंद यांनी हजारो चाहते कमावले होते.
 
दरवाज्याला कवटाळून देव आनंद ढसाढसा रडले होते तेंव्हा
1999 मध्ये भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत देव आनंद पाकिस्तानात गेले होते तेंव्हा लाहोरमध्ये पत्रकार गौहर बट उपस्थित होत्या.
 
तब्बल 55 वर्षांनी देव आनंद त्यांच्या मूळ शहरात आणि महाविद्यालयात परतले होते तेंव्हाचा प्रसंग सांगताना गौहर बट म्हणतात की,
 
"आम्ही महाविद्यालयात पोहोचलो आणि मी तिथल्या चौकीदाराला म्हटलं की देव आनंद आले आहेत. हे ऐकून तो चपापला आणि म्हणाला की 'देवानंद भारतातून खरंच आलाय का?' त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश करताच देव आनंद प्रचंड भावुक झाले होते, त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागले.
 
दरवाजाला कवटाळून देव आनंद तिथेच ढसाढसा रडू लागले. तिथे शिकत असताना उषा नावाच्या एका मुलीवर देव आनंद यांचं प्रेम होतं. तिच्या नावाने हाक मारून ते रडत होते."
 
"मंचावर बसूनही ते रडतच होते. त्या इमारतीच्या प्रत्येक भिंतीजवळ ते रडले. हे महाविद्यालय सोडत असताना शेवटच्या दिवशी उषाचा निरोप घेत असताना ते काय म्हणाले होते हे त्यांनी सांगितलं."
 
जेव्हा दिग्दर्शकांनी देव आनंद यांच्या दातांमध्ये फट असल्याचं सांगितलं होतं
 
1943 मध्ये देव आनंद मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी कधी कारकून म्हणून काम केलं, तर कधी इंग्रजी सैन्याच्या ऑफिसमध्ये किरकोळ नोकरी केली पण हे सगळं करताना अभिनेता होण्याचं स्वप्न मनात सतत रुंजी घालत होतं.
 
देव आनंद तेंव्हा संगीताच्या शिकवणीला जात असंत. तिथे सोबत शिकणाऱ्या एका मित्राने बाबुराव पै यांच्या चित्रपटाबद्दल देव आनंद यांना सांगितलं.
 
तिथे गेल्यावर चौकीदाराने देव आनंद यांना मध्ये जाऊ दिलं नाही. पण स्टुडिओच्या गेटजवळ बसलेल्या या रुबाबदार तरुणाच्या चेहऱ्याकडे देव आनंद दुर्लक्ष करू शकले नाहीत.
 
त्यानंतर चित्रपटाच्या ऑडिशनसाठी त्यांना पुण्याला पाठवण्यात आलं आणि 1946 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम एक हैं' या देव आनंद यांच्या पहिल्या चित्रपटाचा प्रवास सुरु झाला.
 
पहिल्याच चित्रपटात त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली. याबाबत देव आनंद यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे की, "मला सांगण्यात आलं की तुझ्या दातांमध्ये फट आहे त्यामुळे आम्हाला फिलर द्यावा लागेल. माझ्या दातांमध्ये खरंच फट आहे की नाही हे तपासण्यासाठी मी जीभ फिरवू लागलो. मी फिलर घेऊन शूट करू लागलो, पण मला नैसर्गिक वाटत नव्हतं.
 
नंतर माझ्या विनंतीवरून माझ्या दातांमधला फिलर काढून टाकण्यात आला. माझ्या प्रेक्षकांनी मी जसा होतो तसा मला स्वीकारलं याचा मला आनंद वाटतो."
 
'देव आनंद'साठी चाहते त्यांचे दात तोडून घ्यायचे
देव आनंद यांच्या 'हरे राम हरे कृष्णा', 'जॉनी मेरा नाम' आणि 'इश्क़ इश्क़ इश्क़' यांच्या चित्रपटांचं शूटिंग नेपाळला झालं होतं. त्यामुळं तिथेही त्यांच्या चाहत्यांची मोठी संख्या होती.
 
नेपाळचे ज्येष्ठ पत्रकार बसंत थापा हे लहानपणापासूनच देव आनंद यांचे चाहते आहेत.
 
ते सांगतात की, "नेपाळमध्ये देव आनंद यांची प्रचंड क्रेझ होती. त्यांच्यासारखे केस करण्यासाठी नेपाळी तरुण बांबूच्या लाकडापासून बनलेलं तेल गरम करून डोक्याला लावत असत.
 
देव आनंद यांच्या दातांमध्ये फट होती. त्यामुळे त्याच्या तरुण चाहत्यांना त्यांचे दात तोडून देव आनंद यांच्यासारखे दात बनवायची हौस होती, अनेकजण तसा प्रयत्नही करत असत. हरे रामा हरे कृष्णा चित्रपटाच्या शूटिंगला अख्ख शहर जमा झालं होतं."
 
"एकेदिवशी रात्री आम्हाला कळलं की 'दम मारो दम' हे गाणं काठमांडूमध्ये शूट होणार होतं. देव आनंद आणि झीनत अमान यांना प्रत्यक्ष बघण्यासाठी एवढी गर्दी जमली होती की शेवटी धक्काबुक्की होऊ लागली. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
 
लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मीही एकदोन दगड मारले असतील, हे दुसरं तिसरं काही नसून देव आनंद यांची ती जादू होती.
 
त्याकाळात मी दार्जिलिंगला गेलो होतो तेंव्हा पाहिलं की सगळे पर्यटक देव आनंद यांनी 'ज्वेल थीफ' चित्रपटात जी हॅट वापरली होती अगदी तशीच हॅट घालून फिरत होते. त्यांनी त्या चित्रपटात जे ब्लॅक अँड व्हाईट बूट वापरले होते तसेच बूट सगळ्यांनी घातले होते."
 
देव आनंद आणि त्यांचा काळ्या रंगाचा शर्ट
बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, जुगारी, गाईड यांसारख्या चित्रपटांसाठी देव आनंद जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढीच त्यांची स्टाईलही लोकप्रिय आहे.
 
त्यांची ती किंचित झुकलेली मान, ती टोपी, गळ्यात रंगीबेरंगी स्कार्फ आणि त्यांची न थांबता बोलण्याची ती पद्धत अनेक लोक त्यांच्या या शैलीचे चाहते होते.
 
याबाबत बोलताना देव आनंद यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "मी खरोखर पुढे वाकून चालत असायचो. मला चित्रपटात लांबलचक संवाद दिले जायचे आणि हे संवाद म्हणत असताना मी थांबलो पाहिजे की नाही याबाबत गोंधळात पडायचो. त्यामुळे अनेकदा एका दमात मी ते संवाद म्हणून जायचो आणि कालांतराने तीच माझी स्टाईल बनली."
 
देव आनंद जर काळ्या रंगाचा शर्ट घालून बाहेर पडले तर त्यांना बघून मुली बेशुद्ध पडतात अशी एक अफवा त्याकाळी पसरली होती. देव आनंद यांचं वेड किती होतं हे त्यावरून कळतं.
 
काला पानी नावाच्या एका चित्रपटात त्यांनी काळ्या रंगाचे कपडे वापरले होते आणि त्यानंतर ही अफवा सुरू झाल्याचं देव आनंद यांनी सांगितलं होतं.
 
इंडोनेशियाचे राष्ट्रपती देव आनंद यांच्या शूटिंगला उपस्थित होते तेंव्हा
देव आनंदच्या चाहत्यांमध्ये चंबळच्या डाकूंपासून देशांच्या प्रमुखांपर्यंत सर्वांचा समावेश होता. 'काला पानी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे शूटिंग पाहण्यासाठी खास आले होते.
 
रोमँसिंग विथ लाईफ या त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केलेला आहे. "'हम बेख़ुदी में तुमको पुकारे चले गए' या गाण्याचं चित्रीकरण होणार होतं आणि
 
सगळेजण राष्ट्रपतींच्या येण्याची वाट बघत होते. दोन तास झाले तरी ते आलेच नाहीत आणि म्हणून आम्ही शूट सुरू केलं. आमचं शूटिंग सुरू झालं आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती आल्याची बातमी मिळाली. झालं संपूर्ण गाणं पुन्हा शूट करावं लागलं.
 
राष्ट्रपतींनी खूप टाळ्या वाजवल्या, हिंदी गाण्याचं शूटिंग बघून त्यांना खूप आनंद झाला होता. मला काला पानीसाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला, जो मला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल नासेर यांच्या हातून देण्यात आलेला होता.”
 
जेव्हा डाकूंनी देव आनंद यांच्यासोबत फोटो काढले
देव आनंद यांनी लिहिलंय की, "शूटिंग आटोपल्यानंतर आम्ही त्या परिसरातल्या डाक बंगल्यात थांबलो होतो. आम्हाला कुणीतरी सूचना दिली की डाकू आमची भेट घेण्यासाठी येणार आहेत.
 
जो माणूस आम्हाला डाकूंबद्दल सांगायला आला होता त्याला मी सांगितलं की त्यांना माझा ऑटोग्राफ हवा असेल तर त्यांनाच वह्या घेऊन यायला सांग आणि फोटो हवा असेल तर कॅमेरे सोबत घेऊन यायला सांग. कारण त्यांच्या आवडत्या नटासोबत फोटो काढण्याची ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची संधी असेल."
 
"दुसऱ्या दिवशी जेंव्हा शूटिंग होत होतं तेंव्हा मी एका ट्रकवर उभा राहिलो आणि डाकूंकडे बघून म्हणालो, "कैसे हो मेरे देश वसियों?".
 
हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. कुणी माझा हात हातात घेत होतं तर कुणी येऊन गळाभेट घेत होतं.
 
देव आनंद यांच्या सहकाऱ्यांनाही ते तेवढेच आवडत होते
 
2011 मध्ये अभिनेता मनोज कुमार यांनी बीबीसीच्या मधू पाल यांच्यासोबत हा किस्सा शेअर केला होता. ते म्हणाले होते की, "जेव्हा माझे वडील वारले, तेव्हा मी खूप दुःखी होतो. नंतर दीड महिना देव साहेब माझ्यासोबत दिवसातून दोन तास घालवत असत, मग ते सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ काहीही असो त्यांनी नेहमी मला साथ दिली."
 
मनोज कुमार सांगतात की, "एकदा मला एक फोन आला आणि त्यावर मला त्या व्यक्तीने विचारलं की 'हरे रामा, हरे कृष्णा' नावाचा चित्रपट तू केला आहेस का? त्यावर मी हो म्हणालो तर तो व्यक्ती म्हणाला की आजपासून हे टायटल माझं आहे. तो फोन देव आनंद यांचा होता."
 
धोका पत्करणारे देव आनंद
देव आनंद एक सुपरस्टार तर होतेच पण ते एक द्रष्टे अभिनेतेदेखील होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक धोके पत्करले.
 
1943 मध्ये जवळपास रिकाम्या हाताने मुंबईत आलेल्या या मुलाने 1949 मध्ये नवकेतन फिल्म्सचे नवीन प्रॉडक्शन हाऊस स्थापन केले यातूनच त्यांचं धाडस दिसून येतं.
 
त्यांनी 'टॅक्सी ड्रायव्हर', 'काला बाजार', 'हम दोनो' सारखे मुख्य प्रवाहातील चित्रपट केले पण गाईड (1965) च्या रूपात एक धाडसी विषय देखील त्यांनी निवडला होता. प्रेमाचं एक वेगळं चित्रण त्या चित्रपटात केलेलं होतं.
 
चाहत्यांनी नायक म्हणून प्रेम केलेल्या देव आनंद यांनी गाईडमध्ये थोडी नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटात ते शेवटी एक साधू बनतात आणि त्यांचा मृत्यू होतो. चित्रपटात नायकाचा मृत्यू होण्याची ती बहुधा पहिलीची वेळ होती.
 
त्यावेळी गाईड चित्रपट खरेदी करण्यास कुणीही तयार नव्हतं. मात्र आता अनेक दशकानंतर लोक गाईड या चित्रपटाला त्यांचा सर्वोत्तम चित्रपट मानतात.
 
त्यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लंडनमध्ये मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती.
 
त्या मुलाखतीमध्ये अगदी टिपिकल देव आनंद स्टाईलमध्ये ते म्हणाले की, "जर लोक म्हणत असतील की गाईड हा माझा सर्वोत्तम चित्रपट होता तर मला ते मान्य करावंच लागेल पण मात्र आता मी त्यापेक्षा चांगला चित्रपट करूच शकणार नाही असं म्हणणं देखील बरोबर असणार नाही. मी सुद्धा देव आनंद आहे."
 
सुरैया आणि देव आनंद यांची प्रेमकहाणी
देव आनंद यांचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या खुल्या पुस्तकासारखं होतं. ते अभिनेत्री सुरैयाच्या प्रेमात होते पण धर्माच्या अडथळ्यांमुळे त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही आणि सुरैया आयुष्यभर एकट्याच राहिल्या.
 
ज्येष्ठ पत्रकार अली पीटर जॉन हे देव आनंद यांचे मित्र आणि चाहतेही होते.
 
'माय देव मेमरीज ऑफ एन इमॉर्टल मॅन' या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, "देव आनंद मला म्हणत असत की आमच्या गोष्टीचा शेवट काहीसा वेगळा व्हायला हवा होता.
 
मी त्यावेळी स्क्रीनसाठी काम करायचो आणि 2002 मध्ये स्क्रीनने सुरैय्या यांना 'लाईफ टाईम अवॉर्ड' देण्याचा निर्णय घेतला. सुरैया माझा सहकारी पिरोज देव येणार का असं सतत विचारत होती. पिरोज म्हणाले की देव कधीही स्क्रीन फंक्शन चुकवत नाहीत, परंतु देव आनंद मला म्हणाले की अली हे बरं नाही वाटणार.
 
चाळीस वर्षे झाली मी तिच्याशी कधीही बोललो नाही, तिला साधं पाहिलंही नाही. यावेळी राहूदे, मला माहिती आहे की आम्हा दोघांनाही ते सहन होणार नाही."
 
 
नंतर देव आनंद यांना सुरैया त्या कार्यक्रमात कशा दिसत होत्या, त्यांनी कशी साडी नेसली होती आणि केसात फुलं माळली होती का हे विचारत असत.
 
सुरैया यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्यादिवशी त्यांनी मला बोलावलं. त्यांचं घर बंद होतं. घराच्या गच्चीवरील तंबूत ते एकटेच बसले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते."
 
देव आनंद यांचं एक गाणं आहे, 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया' त्याच गाण्याप्रमाणे देव आनंद थांबले नाहीत, त्यांनी पुढे अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याशी लग्न केलं.
 
चाहते थकले पण देव आनंद कधीच थकले नाहीत
आयुष्याच्या शेवटपर्यंत देव आनंद चित्रपट बनवत राहिले. वसंत थापा म्हणतात, "आम्ही सगळे चाहते त्यांचे चित्रपट पाहून पाहून थकलो होतो पण त्यांनी चित्रपट बनवणं थांबवलं नाही."
 
ज्येष्ठ सिनेपत्रकार भारती दुबे यांनी देव आनंद यांचं दीर्घकाळ वार्तांकन केलंय. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "देव आनंद यांच्या शेवटच्या टप्प्यातील चित्रपट अनेकांना आवडले नाहीत. मात्र देव आनंद चित्रपट बनवत राहिले, त्यांना प्रेक्षकांच्या कौतुकाचा किंवा टीकेचा काहीही फरक पडला नाही.
 
ते मला सांगायचे की मला काम करत करतच मरायचं आहे. त्यांनी केलेले शेवटचे काही चित्रपट देव आनंद यांची व्याख्या करू शकत नाहीत."
 
भारताचे ग्रेगरी पेक देव आनंद
भारती दुबे म्हणतात की, देव आनंद हे स्वतंत्र भारताचे खरेखुरे पहिले शहरी नायक होते. ते ग्रामीण बाजाची पात्रं करू शकत नव्हते मात्र त्यांची स्टाईलच वेगळी होती. त्यांना भारताचे ग्रेगरी पेक असं म्हटलं जायचं.
 
पुन्हा आपण देव आनंद यांच्या बालपणात जाउया. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की एकदा लहान असताना ते अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ सरबत पीत होते.
 
ते सरबत विकणाऱ्याने देव आनंद यांना सांगितलं की, "तुझ्या कपाळावर मोठा सूर्य आहे आणि एक दिवस तू खूप मोठा माणूस होशील."
 
आता याला नशीब म्हणा, मेहनत म्हणा, आवड म्हणा किंवा योगायोग म्हणा, सुवर्ण मंदिराबाहेर सरबत पिणारा तो लहान मुलगा खरोखर मोठा झाला आणि एवढा मोठा झाला की कालातीत बनला.
 
यामुळेच युवराज शाह नावाच्या देव आनंद यांच्या पुण्यातल्या चाहत्याने देव आनंद यांच्यासाठी एक उद्यान बनवलं होतं आणि त्याला नावंही अगदी साजेसं दिलेलं होतं, 'सदाबहार देव आनंद उद्यान.'
 Published By- Priya Dixit