बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

बिकीनीचा एवढा बाऊ का- मुग्धा गोडसे

चंद्रकांत शिंदे

WD
ND
मधुर भांडारकरच्या फॅशनमधून रुपेरी पडद्यावर आलेली मुग्धा गोडसे आता बॉबी देओलबरोबर हेल्प नावाच्या एका भयपटात दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटातील मुग्धाच्या बिकीनीमधील छायाचित्रांनी धुमाकूळ घातलेला आहे. हेल्प १३ ऑगस्टला सगळीकडे प्रदर्शित होत आहे. मुग्धाने आपल्या या नव्या चित्रपटानिमित्ताने वेबदुनियाशी पूर्णपणे मराठीत विशेष गप्पा मारल्या.

हेल्पमध्ये तुझी भूमिका काय आहे?

हेल्पमध्ये मी बॉबी देओलच्या फॅशनेबल पत्नीची भूमिका साकारीत आहे. लग्नानंतर आमच्या दोघांमध्ये काही वाद निर्माण होतात. बॉबी चित्रपटात चित्रपट दिग्दर्शकाची भूमिका साकारीत आहे. आमच्या दोघांमध्ये नेहमी वादावादी होत असते, परंतु बॉबीला जेव्हा कळते की मी गरोदर आहे तेव्हा त्याला खूप आनंद होतो. आमच्या दोघांमधील वाद संपुष्टात यावा म्हणून आम्ही दोघे बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे ठरवतो. आम्हा दोघांनाही मॉरिशस आवडत असतो म्हणून आम्ही दोघे मॉरिशसला जातो. तेथे एकांतात असलेला बंगला आम्हा दोघांना खूप आवडतो. आम्ही तेथे रहाण्यास सुरुवात करतो. तेथे रहायला गेल्यानंतर अशा काही घटना घडतात की त्यामुळे आमच्या दोघांच्याही जीवनात वादळ निर्माण होते.

काहीतरी भयंकर आणि अघटित घडू लागते. घडणा़र्‍या घटनांशी आमचा काहीतरी संबंध असतो तो संबंध काय असतो हे चित्रपट पाहिल्यावरच तुला कळेल, मात्र मी एक निश्चित सांगू शकेन कि हा एक अत्यंत चांगला भयपट आहे जो प्रेक्षकांना गुंगवून ठेवेल, भयपटाला स्पेशल इफेक्टची खूप गरज असते आणि या चित्रपटात जे स्पेशल इफेक्ट आहेत ते हॉलीवुडच्या भयपटांच्या दर्जाचे आहेत. प्रेक्षकांना एक चांगला आणि दर्जेदार भयपट पहाण्याचे समाधान हा चित्रपट देईल.

बॉबी देओलबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

खूपच छान. बॉबी चांगला कलाकार तर आहेच तो एक चांगली व्यक्ति ही आहे. तो जसा दिसतो तसा नाही. तो सेटवर खूपच गमती जमती करतो. सेटवर त्याने कधीही असे जाणवू दिले नाही की मी नवीन आहे आणि तो स्टार आहे. प्रत्येक वेळेला त्याने मला सांभाळून घेतले. या चित्रपटापूर्वी बॉबीशी माझी हाय-हैलो इतपतही ओळख नव्हती परंतु या चित्रपटाच्या वेळेस मला असे जाणवले की आम्ही खूप जुने मित्र आहोत. असे कलाकार असतील तर काम करायला खूप मजा येते.

तू सुरुवात मधुरसारख्या यशस्वी दिग्दर्शकाबरोबर केलीस. नव्या दिग्दर्शकाबरोबर काम करावे असे का वाटले?

हे खरे आहे की मी सुरुवात मधुर भांडारकरबरोबर केली. फॅशन आणि जेलमध्ये मधुरने चांगल्या भूमिका दिल्या. परंतु त्याने जेव्हा मला काम दिलेतेव्ही मी ही नवीनच होते. चित्रपटसृष्टीत नवीन आणि जुने असे काही नसते. मधुरने मला एकदा सांगितले होते की मला जर चांदनी बार तयार करण्याची संधी मिळाली नसती तर मी आज इथवर पोहोचलोच नसतो. हेल्पचा दिग्दर्शक राजीव वीरानी ने मला चित्रपटाबद्दल विचारणा करून जेव्हा कथा ऐकवली तेव्हा मला ती खूपच आवडली. कथा ऐकवल्यानंतर त्याने मला माझी भूमिका ऐकवली. माझी भूमिकाही खूपच चांगली होती त्यामुळे मी लगेचच होकार दिला. राजीव जेव्हा कथानक ऐकवत होता तेव्हाच मला त्याच्या कामाची कल्पना आली आणि मला विश्वास वाटला की राजीव खूपच उत्कृष्टरित्या या चित्रपटाचे सादरीकरण करेल. आणि मला आज हे सांगायला आनंद होत आहे की त्याने खरोखरच उत्कृष्टरित्या चित्रपट सादर केला आहे.

हॉरर चित्रपट तुला आवडतात का?

हो. हॉरर चित्रपट मला खूपच आवडतात. त्यामुळेच मला जेव्हा हेल्पची ऑफर आली तेव्हा मी तो स्वीकारला. मला घाबरायला प्रचंड आवडते परंतु घाबरायला होईल असे हॉरर चित्रपट फार कमी बनतात. हॉलीवुडचे काही चित्रपट आहेत ज्यांनी मला घाबरवले आहे. हिंदीतही काही चित्रपट आले आहेत. रामगोपाल वर्माचा रात मला खूपच आवडला होता. परंतु तांत्रिक दृष्ट्‌या आपण हॉलीवुडच्या खूपच मागे आहोत. मात्र हेल्पने ही कसर भरून काढलेली आहे असे मला वाटते.

चित्रपटातील बिकीनी दृश्याने सध्या चांगलीच धूम माजवलेली आहे..

हो ना. मी जेव्हा बिकीनी दृश्य दिले तेव्हा मला कल्पनाही आली नाही की या दृश्याची एवढी चर्चा होईल, खरे तर मला अजून कळत नाही की लोकांनी या गोष्टीचा इतका बाऊ का केला? मी काही पहिली नायिका नाही जिने बिकीनीमध्ये दृश्य दिले आहे. ब्लॅक एंड व्हाइटच्या जमान्यापासून नायिकांनी बिकीनी दृश्ये दिली आहेत. परंतु माझे बिकीनी दृश्य इतके चर्चित झाले की त्यामुळे चित्रपटाचे खरे प्रमोशन बाजूलाच राहिले. काही जण म्हणतात की मी जाणून बुजून बिकीनीत दृश्य दिले. मात्र मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की मला असल्या गिमिकची जराही आवश्यकता वाटत नाही. माझा माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे आणि मला ठाऊक आहे कि माझे कामच मला पुढे घेऊन जाणार आहे

मग हे बिकीनी दृश्य तू का दिलेस? माझ्या माहितीप्रमाणे हे दृश्य स्क्रिप्टमध्ये नव्हते.

खरे आहे तुझे म्हणणे. स्क्रिप्टमध्ये हे दृश्य नव्हते. परंतु तुला एक गोष्ट सांगू कधीही कोणत्याही स्क्रिप्टमध्ये नायिकाच्या बिकीनी दृश्याची योजना केलेली नसते. कथेला नायिकेच्या बिकीनीची काहीही गरज नसते. ज्या नायिका म्हणतात की कथेची मागणी होती म्हणून मी तसले दृश्य दिले तर ते पूर्ण खोटे असते. आता तुझा दूसरा प्रश्न असा कि मी हे दृश्य का दिले? खरे आहे हे दृश्य कथेत नव्हते. आम्ही मॉरिशसला शूटिंग करीत होतो. मॉरिशसचे समुद्र किनारे खूपच सुंदर आहेत. चित्रिकरण संपायला दोन दिवस बाकी होते. एक दिवस लंच टाइममध्ये दिग्दर्शकाने म्हटले की आपण एक बिकीनी दृश्य चित्रित करूया. मलाही ती कल्पना आवडली. मॉरिशसच्या समुद्र किनार्‍यावर येऊन बिकीनीत दृश्य द्यायचे नाही म्हणजे मॉरिशसवर अन्याय करण्यासारखे आहे. माझी शरीरयष्टीही बिकीनी घालण्यास अत्यंत योग्य असल्याने मी लगेच होकार दिला आणि आम्ही ते दृश्य चित्रित केले. एका गाण्यामध्ये माझे बिकीनीचे दृश्य आहे.

तू मराठी चित्रपटात काम करणार का?

सध्या तरी मराठी चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा नाही. मी अगोदर हिंदीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू इच्छिते. त्यानंतर मी मराठी चित्रपटांचा विचार करीन. मराठी चित्रपटांच्या मला ऑफर येत आहेत परंतु मी त्या नाकारीत आहे.

तुझा आगामी चित्रपट?

हेल्पनंतर माझा विल यू मॅरी मी चित्रपट येणार आहे. ही एक रॉमॅटिक कॉमेडी आहे. या चित्रपटात राजीव खंडेलवाल माझा नायक आहे.

हिंदी चित्रपटातील तुझी सगळ्यात आवडती भूमिका कोणती?

मोगले आजम चित्रपटातील मधुबालाची भूमिका. मोगले आजमची रिमेक होणार असेल तर त्यातील मधुबालाची भूमिका साकारण्याची संधी मिळावी यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन.