शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...
Written By वेबदुनिया|

साईबाबाच्या भूमिकेने जीवन बदलले -जॅकी श्रॉफ

- चंद्रकांत शिंदे

WD
सुभाष घईंच्या हीरोमधून हीरो बनून आलेला जॅकी श्रॉफ गेले अनेक दिवस चित्रपटातून दिसला नव्हता. परंतु आता त्याचा नवा चित्रपट मालिक एक लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ एका वेगळ्या म्हणजेच चक्क साईबाबांच्या भूमिकेत दिसणार आहे. जॅकीच्या या नव्या भूमिकेविषयी, त्याच्या आगामी योजना आणि त्याचा मुलगा टायगरसंदर्भात त्याच्याशी मारलेल्या गप्पांचा सारांश-

साईबाबांची भूमिका करावी असे का वाटले?
मला साईबाबांची भूमिका करावी असे वाटले नाही तर साईबांबाची मर्जी होती की मी त्यांची भूमिका साकारावी. आपण ठरवून काहाही होत नसते. साईबाबा जे ठरवतात तेच होते. मी कच्च्ी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की मी साईबाबांची भूमिका साकारीन. दिग्दर्शक दीपक बलराज विज माझ्या सतत मागे लागला होता. त्याने माझ्यात काय पाहिले ते मला ठाऊक नाही परंतु तो मला रोज साईबाबांच्या भूमिकेबद्दल विचारत असे. सुरुवातीला तर मी त्याला टाळलेच होते. कारण मला ठाऊक होते की या भूमिकेसाठी मी योग्य नाही. माझी एक वेगळी इमेज आणि प्रेक्षक प्रत्येक कलाकाराची इमेज डोळ्यासमोर ठेऊनच चित्रपट पाहायला जातात. एक दिवस दीपक माझ्या घरी आला. सोवत त्याने साईबाबांची दाढी मिशी आणली होती. त्याने मला सांगितले कि, फक्त एकदा ही दाढी मिशी लावून बघ जर योग्य वाटले तर तू भूमिका कर. दीपकबरोबर पूर्वी मी अनेक चित्रपट केलेले आहेत त्यामुळे त्याचे मन मोडावे असे मला वाटेना. मी त्याच्याकडून दाढीमिशी घेतली आणि लावली. घरातच समोर आरसा होता. मी त्या आरशात स्वतःला पाहिले आणि माझा स्वतःवरच विश्वास बसला नाही. मला वाटले की खरोखरीच साईबाबा माझ्या पुढ्यात उभे राहिले आहेत. एका क्षणात मला स्वतःत बदल जाणवला आणि मी दीपकला लगेच होकार दिला.

या भूमिकेसाठी काय तयारी केली? मनोजकुमार साईबाबा चित्रपट पाहिलास का?
मुळीच नाही. मी साईबाबांवर तयार झालेला कोणताही चित्रपट पाहिला नाही आणि त्यांची जीवनगाथाही वाचली नाही. दीपकने मला जे कथानक वाचायला दिले तेच फक्त मी वाचले. आणि सेटवर जाऊन कॅमेर्‍यासमोर उभा राहिलो. मला काहीही करावे लागले नाही. साईबाबा स्वतःच माझ्याकडून सर्वकाही करून घेत होते. मी त्या भूमिकेत खूपच खोलवर शिरलो होतो. संपूर्ण शूटिंग दरम्यान मी चप्पल वापरली नाही. उन्हात, चिखलात, दगडात मी अनवाणी फिरत होतो परंतु मला काहाही त्रास झाला नाही. मला तर वाटते की साईबाबांनाच वाटत होते की मी ही भूमिका साकारावी आणि म्हणून त्यांनीच मला कॅमेर्‍यासमोर उभे केले. माझी भूमिका प्रेक्षकांना आवडली तर त्याचे संपूर्ण श्रेय साईबाबा आणि दिग्दर्शक दीपकला देता येईल.

शूटिंगच्या दरम्यान तू म्हणे दारू आणि सिगरेटच्या त्याग केला होतास?
मी दारू कधी तरी पितो त्यामुळे मी दारू सोडली असे म्हणू शकत नाही. शूटिंगच्या वेळेसच नव्हे तर पूर्वीपासून आणि आताही मी दारू आणि सिगरेटपासून दूर आहे. मला या नशेची गरजच वाटत नाही. मी कपालभाती योग करतो. जेव्हा कपालभाती करतो तेव्हा जेव्हा मी श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो ती एक वेगळीच नशा असते. आणि तसेही आपण मुंबईत राहतो. मुंबईत प्रदूषण किती आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मुंबईतील विषारी वायू आपण पोटात घेतोच तेव्हा आणखी वेगळे विष पोटात घ्यायची गरजच काय?

शूटिंगच्या दरम्यान एखादा अविस्मरणीय अनुभव
एक खूप आहेत. संपूर्ण शूटिंगच माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. मात्र मला तेव्हा खूप वाईट वाटत असे जेव्हा बायाबापड्या येऊन माझ्या पाया पडत असत. साईबाबांच्या गेटअपमध्ये शूटिंग करीत असताना शिर्डीतील मंडळी शूटिंग पाहायला येत असत. मला पाहताच वृद्ध मंडळी माझ्या पाया पडू लागत. तेव्हा मी त्यांना थांबवत असे परंतु माझ्या पायाला हात लावल्याशिवाय ते थांबत नसत. केवळ गावकरीच नव्हे तर एकदा सेटवर एक जज आले होते. त्यांनीही मला नमस्कार केला. मी त्यांना म्हटले की मी एक कलाकार आहे, तर ते म्हणाले तू साईबाबा आहेस म्हणून तुला नमस्कार करीत आहे. मी आजवर अनेक भूमिका केल्या परंतु या भूमिकेने मला जे समाच्चन दिले ते कोणत्याही भूमिकेने दिले नाही. साईबाबांच्या भूमिकेने माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले आहे.

मिशन कश्मीरमध्ये तू खलनायक होतास आणि आता येथे देव झाला आहेत. प्रेक्षक तुला स्वीकारतील?
मी तुला मगाशीच सांगितले की प्रेक्षक कलाकाराची एक इमेज डोळ्यासमोर ठेऊन चित्रपट पाहायला येतात. मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. परंतु ही भूमिका वेगळीच आहे. प्रेक्षकांना माझी ही भूमिका नक्कीच आवडेल यात शंका नाही. प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहायला येतील तेव्हा त्यांना जॅकी श्रॉफ नव्हे तर साईबाबाच दिसतील. येथे मला तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी एका चाळीत राहाणारा मुलगा होतो. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी कच्च्ी चित्रपटात काम करीन. परंतु मला देव भेटला. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. देव म्हणजे देव आनंद. देस-परदेसमध्ये मी एका छोट्याशा भूमिकेने सुरुवात केली. त्यानंतर सुभाष घईंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी हीरो झाले. हा सगळा योगायोग आणि वर जो बसला आहे तो हे सगळे करीत असतो. आपण फक्त त्याच्या इशार्‍यावर नाचत असतो. त्यामुळे मी कच्च्ीच कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. मी प्रचंड यश पाहिले, अपयशही पाहिले. चित्रपट निर्मिती, मालिका निर्मितीही केली, पैसे कमवले आणि घालवलेही. प्रेक्षकांनी मला स्वीकारले आणि नाकारलेही परंतु येथे मी नक्कीच सांगेन की प्रेक्षक साईबाबांना स्वीकारतील.

आज सगळे मोठे कलाकार छोट्या पडद्यावर आले आहेत. याची सुरुवात तू केली होतीस. त्याबद्दल काय वाटते? (खूप कमी जणांना ठाऊक आहे की जॅकीची सोनी टीव्हीमध्ये भागीदारी होती आणि त्याने काही मालिकांची निर्मितीही केली होती.)
हो खरे आहे. १५-२० वर्षांपूर्वीच मी या माध्यमाची ताकद ओळखली होती आणि छोट्या पडद्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती केली होती. मिसिंग कार्यक्रमात मी छोट्या पडद्यावर आलो होतो तेव्हा मला अनेकजण म्हणाले होते की छोटा पडदा आपल्यासाठी नाही. आज तेच सर्वजण छोट्या पडद्यावर दिसत आहेत. त्यांना पाहताना असे वाटते की ते छोट्या पडद्याचेच कलाकार आहेत कारण जवळ जवळ रोज ते छोट्या पडद्यावर दिसतात. मी मालिकांची निर्मितीही बंद केली आहे. आज छोटा पडद्याने मोठ्या पडद्याला व्यापून टाकले आहे.

मुलगा टायगर सध्या काय करतो आहे?
तो बारावीला आहे. फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये त्याला खूपच रुचि आहे. त्याला या खेळांमध्ये देशाचे नाव रोशन करायचे आहे.

परंतु मध्ये बातमी आली होती की सुभाष घई त्याला लाँच करतायत?
त्याला अभिनयाची आवड आहे. मी त्याला सांगितले की चित्रपटसृष्टीत तू सगळ्या प्रकारच्या म्हणजेच डॉक्टर, इंजीनियर, पायलटच्या भूमिका साकारू शकतोस. आणि हेच आपले क्षेत्र आहे. फक्त सुभाष घईच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, विधु विनोद चोप्रा यांनीही त्याला लाँच करावे.

तुझे आगामी चित्रपट?
एक इंग्रजी, एक तामिळ, एक तेलुगु आणि एक हिंदी चित्रपट आहे. माझ्याकडे काम नाही असे समजू नकोस. माझ्याकडे चांगले काम आहे आणि मी बर्‍यापैकी व्यस्तही आहे.