शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (13:31 IST)

सामाजिक जाणिवेच्या कथा

Ambedkar Nagar Book reviews
प्रसिध्द लेखिका प्रज्ञा बागुल यांचा नुकताच आंबेडकरनगर हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. तो आज वाचण्यात आला. त्या कथासंग्रहाचे शिर्षक इतके प्रभावी आहे की सारा समाज डोळ्यासमोर उभा राहिला. समाजाचे अंतरंग उलगडत राहिले. इथला कष्टकरी, शोषित, पिडीत, उपेक्षित समाजाचे दु:ख, वेदना, जगण्याचा संघर्ष आणि भूकेवाचून तडफडणारी माणस दिसू लागली. फुलेनगर, गौतमनगर, भिमनगर, क्रांतीनगर, सारख्या वस्त्या समोर तरळू लागल्या. या साऱ्याच वस्त्यात डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या तात्विक विचाराने प्रत्येक माणसात प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडवली. त्यांच्या कार्याने इथल्या समाजाचे जीवन गतिमान झाले. आणि ही सारी नगरं डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी इतकी प्रेरित झाली की पुढे आंबेडकरनगर समाजाचे ऊर्जाकेंद्र बनले. पोटाला पीळ देत काबाडकष्ट करणारी माय इथेच जन्मली आणि तिने आपली मुलं शाळेत पाठवली. हीच मुलं पुढे विषमतावादी व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारू लागली. कथा, कविता, कादंबरीतून प्रश्न उपस्थित करू लागली. स्वातंत्र्य, समता, बंधुता याची भाषा करु लागली. कथा, कविता, कादंबरीतून प्रश्न उपस्थित करू लागली. लोक हो तूमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे. कुणीतरी मला न्याय द्याल का? कवयित्री हिरा बनसोडे यांची ही फिर्याद कविता इथल्या व्यवस्थेला हादरे देऊ लागली. बाबुराव बागुल यांची कथा, कादंबरी ज्वलंत प्रश्नांची भाषा बनली. आंबेडकरनगरमधील सुशिक्षित तरुण डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पेटून उठला. सामाजिक, राजकिय लढे उभे राहिले. बुध्द, फुले, कबीर आणि डॅा. बाबासाहेबांच्या विचारांच्या संस्काराने ही भूमी पुन्हा एकदा पेरल्या गेली त्या संस्काराचे मूळं इतकी खोलवर रूजली की जोपर्यंत जग आहे तोपर्यंत क्रांतीचे स्त्रोत पाझरत राहणारे आहे.
 
लेखिका प्रज्ञा बागुल ह्या आंबेडकरी विचार संस्काराच्या विचारानेच प्रेरित झालेल्या दिसून येतात. त्यामुळेच आंबेडकर नगरातील ज्वलंत प्रश्नांचे मूळं त्यांच्या कथेत दिसून येते. समाजातील शुरवीर सुशिक्षित बनलेल्या माणसाने इथल्या पारंपारिक रूढी, परंपरेला मूठमाती दिली. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या दिमाखाने पहिल्यांदाच समाजात साजरी केली. समानतेचे वारे याच दलित समाजातून दाही दिशा चौफेर फिरले. लेखिका प्रज्ञा बागुल यांच्या आंबेडकरनगर शिर्षक असलेल्या कथा संग्रहावरून समाजाचे दाहक चित्रण नजरेसमोर उभे राहिले. प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो.
 
सदरील कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. कथा लघू असो की दिर्घ त्यातील आशय महत्वाचा आहे. प्रज्ञा बागुल यांची कथा लघूकथेच्या प्रकाराची आहे. आशय मात्र गहन व मनाला चिंतेत टाकणारा आहे. कथेतील वर्णन शैली व पात्राची अभिव्यक्ती सहज सुसंगत व प्रभावी दिसून येते. वाचकाला ती कथा भावते. व एक धक्का मनाला देऊन जाते. लेखिका प्रज्ञा बागुल आपल्या मनोगतातच स्पष्ट करतात की, आपण लिहू शकतो मात्र प्रत्यक्ष जीवन जगण्याची कला शिकलो का? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात त्या चिंतन, मनन करतात आणि जे सुचत गेल जे अनुभवल जे निरीक्षणात आल त्यातूनच कथेचा जन्म झाला. त्या कथा परिवर्तनाकडे वाटचाल करतात. समाजात घडणारे आजचे वास्तव सडेतोडपणे त्या चित्रित करतात‌. या सर्व कथेचा प्रवास त्यांनी अतिशय समर्थपणे मांडला आहे. समाजातील आजचे ज्वलंत वास्तव त्या उजागर करतात. समाजात निर्माण झालेला सुशिक्षित कालांतराने तो सधन कॉलनीत स्थिरावतो याची खंत लेखिका करतात. ज्या आंबेडकरनगरात आंबेडकरी संस्काराने मुल वाढलेली असतात. आजूबाजूला जगण्याची तडफड व संघर्ष त्यांनी बघितला असतो. त्याच वातावरणातून हा सुशिक्षितांचा वर्ग पुढे जातो. नोकरदार बनतो. त्याच नगराला हा वर्ग विसरून जातो. याच्यापासून काय आदर्श घ्यावा? तेल, मिठाचे प्रश्न याच नगराने मिटवले. त्याच आंबेडकरनगराचा ह्या सुशिक्षित वर्गास विसर पडतो. कथेतील रावसाहेब भान न विसरता मित्राच्या भेटीसाठी आंबेडकरनगर विसरत नाही. मयतीला हीच माणस आपली माणस राहणार दुसर कोणी राहणार नाही. या विचाराने रावसाहेब विचार करतात. आंबेडकरनगरातील सुशिक्षित वर्ग सदन कॉलनीत राहो की एखाद्या उच्चभ्रु नगरात राहो त्याच्या मयतीला आपलीच माणस असतात हे विसरता विसरत नाही. रो हाऊस, फ्लैट, बंगल्यात जीवाभावाची माणस भेटत नसून ती मात्र आंबेडकरनगरातच राहतात याची जाणीव रावसाहेबाला होते. लेखिका प्रज्ञा बागुल यांनी समाजातील बदलत गेलेल मानवी मनाच वास्तव प्रखरतेने प्रकट केले आहे. पक्ष्याप्रमाणे सुशिक्षितांचे थवे या आंबेडकरनगरातून उडून गेलेत ते कधी मागे परतलेच नाहीत याची खंत लेखिका करते. माणस बदलली, ती बदलत जातील यात शंका नाही. परंतू मायेची हाक देणारी माणसं ह्या आंबेडकरनगरातच भेटतील. आंबेडकरनगर या कथेतून लेखिका निर्भिडपणे व्यक्त होतांना दिसते.
 
एका सुईच्या टोकावर या कथेत लेखिकेने स्त्रीचे आजचे दाहक वास्तव बेधडकपणे व्यथित केले आहे. आतून मनाला तोडत जाणारी स्त्री जीवनाची त्रासदीची ही कथा आहे. स्त्रीच्या आंतरिक ऊर्जेवर आघात करणारी ही कथा दिसून येते. दत्तक असलेली पाणेरी मुलगी लग्न झाल्यानंतर तिची सर्व मालमत्ता, संपत्ती तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जाते. नवऱ्यात अहंकार निर्माण होऊन वाटेल त्या पध्दतीने तो वागत राहतो. गावची सरपंच पाणेरी होते पण नवराच तिची सर्व कामे करू लागतो. ती फक्त कागदोपत्री सह्या करते. सरपंचाची सारी जबाबदारी नवराच सांभाळतो. पाणेरीची हेळसांड होऊ लागते. मनात घालमेल सूरू होते. अन् एकदाची ती महिला अधिकाराविषयी बघा अशी चिडक्या आवाजात नवऱ्याला बोलते तर काय डोक्यावर परिणाम झाला का? आदिवासी बाया बघ जशा होत्या तशाच आहेत. नवऱ्याचे हे सडेतोल बोल पाणेरीच्या कानात आदळताच ती सयंम ढळू देत नाही. नवरा म्हणेल त्या रितीने ती वागते. स्वत:ला सावरते. जिथे पर्यायच नसतो तिथे स्वत:च स्वत:सोबत तडजोड करत जगाव लागत ही जाण तिला होते. तशी सवय तिला होऊन जाते. स्त्री जीवनावरचा आघात किती मनाला त्रासदायक वाटतो. अन भाषणात मात्र स्त्रियांचे अधिकार, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समानता या विषयी जोरदारपणे भाष्यकार म़चावरून प्रबोधन करीत असतात. घरात मात्र स्त्री अजूनही बंधनात दिसून येते. स्त्रीवादी ही कथा मनाला भुरळ टाकते‌. स्त्री ही जरी समाज परिवाराची धुरा असली तरी तिच्यावर असंख्य प्रहार होतांना दिसून येते. त्याला इथली परंपरावादी रूढी व्यवस्था कारणीभूत आहे‌. ही कथा मनाला अस्वस्थ करून जाते. तसेच सत्तेच्या अहंकाराने सत्ताधारी माणूस स्त्रीला दासी गुलाम समजतो. त्याची आवडती नटी मेली तर त्याला दु:ख होते. त्याच्या कुत्र्याला कुणी दगड मारला तर तो त्याच्या वर धावून जातो. दारूच्या नशेत बेधु़ंद होऊन कामांध बनतो. पण सामान्य माणूस आपल्या मुलीला डॅाक्टर बनवतो. सामान्य माणूस आणि सत्ताधारी माणूस या दोघांमधील वैचारिकता स्पष्ट करण्यास लेखिका प्रज्ञा बागुल कमी पडत नाही. 
 
माणसातील माकड आणि माकडातील माणूस सामाजिक चिंतन करणारी ही कथा असून बुध्दीजीवी माणूस कसा पिसाळलेल्या अवस्थेसारखा जगतो‌. हिंसा दंगली पेटवून माणसामाणसात द्वेष निर्माण करतो. ढोंगीपणाचा आव आणून बंधुप्रूमाची भाषा करतो. माकडीन मात्र कुत्र्याच्या भुकेल्या पिलाला दूध पाजते. यातील माकड व माकडीन यामधील संवाद मनाला अगदी चटका लावून जातो. पुतळे आणि कावळे मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडविते. आणि नव्या जाणिवा निर्माण करते. 
 
सदरील कथासंग्रहातील सर्व कथा चिंतनशील असून वैचारिकता हा कथेचा गाभा आहे. कथेतील म्हणी, प्रतीकं, कथेचा गंभीर आशय निर्माण करणाऱ्या आहेत. वर्ण, जात, धर्म, संस्कृती आणि शिक्षणावर भर देणाऱ्या कथा मानवी मनावर प्रकाश टाकणाऱ्या दिसून येतात. समानता, प्रकाशवाट, ऐकावे जनाचे करावे मनाचे, भूक, डोहाळे, ऑपरेशन, एक चुकीचे इंजेक्शन, निळा गणपती, शरणागत, व बाईमाणूस ते बाईसाहेब ह्या सर्व कथा दिशादर्शक असून चिंतन करायला भाग पाडतात. कथासंग्रहावरील मुखपृष्ठ अतिशय सुंदर झाले असून प्रा. डॅा. आशा थोरात यांची प्रस्तावना चित्तवेधक झाली आहे. कथासंग्रहास डॅा. योगीराज वाघमारे, डॅा. इंदिरा आठवले यांचे मौलीक अभिप्राय आहेत. अहमदाबाद येथील शॉपीजन प्रकाशनाने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.
 
कथेत काही तूरळक उणीवा दिसत असल्या तरी कथेचा आशय निसटत नाही. पहिल्याच प्रयत्नात लेखिका प्रज्ञा बागुल कथेच्या प्रांतात यशस्वी झाल्या आहेत. त्या़ंचे पुन्हा एकदा अभिनंदन करून पुढील साहित्य प्रवासास शुभेच्छा देतो.
 
कथासंग्रह: आंबेडकरनगर
लेखिका: प्रज्ञा बागुल
किंमत: १६५₹
पृष्ठे: ८८
समिक्षण:एकनाथ खिल्लारे
औरंगाबाद
9158150156