शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2016 (10:48 IST)

वाचकाला समजेल असा सर्वोत्तम रंजक कथासंग्रह: उद् बोधन

माझे साहित्यिक मित्र श्री. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य हे व मी श्री. बाहुबली विद्यापीठात दीड तपाहून अधिक काळ एकत्रितपणे अध्यापनाचे काम करीत होतो. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून व मराठीच्या अध्यापनातून त्यांच्यातला वक्ता प्रकर्षाने दिसून येत असे. लाघवी बोलणे स्पष्ट शब्दोच्चार, मुद्देसूद बोलणे यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच विद्यार्थ्यांची व श्रोत्यांची मने काबीज करीत असत. श्री. बाहुबली विद्यीपीठाचे माजी संचालक आदरणीय भिसीकर गुरुजींनी श्री. प्रविणकुमारांच्या मधला लेखक हेरला होता म्हणूनच ‘सन्मती’ मासिकात श्री. प्रविणकुमार यांना त्यांनी सहसंपादक केले. 
 
प्रविणकुमारांचे वडील श्री. हेमचंद्र वैद्य हेही एक कसलेले कथाकार व लेखक होते. सलग ३५ वर्षे त्यांनी सन्मती मासिकात कसदार लेखन केले. विशेषतः ‘दृष्टान्त कथामाला’ या शीर्षकाखाली त्यांचे प्रसिद्ध होणारे लिखाण एवढे वाचकप्रिय झाले की, बरेच वाचक आम्ही या सदरासाठीच सन्मतीचे वर्गणीदार झालोय असे बोलत. तर असा वसा व वारसा असणा-या श्री. प्रविणकुमार यांचा उद् बोधन  कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे या वार्तेने मला वैयक्तिक खूप आनंद झाला कारण त्यांच्या साहित्यिक कला गुणांचा लाभ मी संभाजीपूर व जयसिंगपूर या दोन्ही ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांना या ना त्या रूपाने देत आलो आहे. ज्या ज्या वेळी आम्ही श्री. प्रविणकुमार वैद्य यांना कथाकथन, सूत्रसंचालन, अध्यक्षीय भाषण, पाहुण्यांची ओळख इत्यादी करण्यास विचारणा केली त्या त्या प्रत्येक वेळी ती विनंती त्यांनी तात्काळ मान्य करून आपल्या सुमधुर वाणीचा लाभ उपस्थितांना दिला आहे. 
 
तर अशा साहित्यिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे श्री. प्रविणकुमार वैद्य एके दिवशी माझ्याकडे आले आणि उद् बोधन  हा कथासंग्रह प्रसिद्ध करत असल्याचे शुभवर्तमान सांगितले. प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी त्यास दुजोरा दिला व विनंती केली की, या कथासंग्रहाबाबत मी माझे हृद् गत लिहावे. अर्थात मी त्यास आंनदाने होकार दिला. कारण अलीकडील एक दोन वर्षात आम्ही तिघेही ब-याच वेळा एका व्यासपीठावर कांही कार्यक्रम पार पाडले आहेत. जयसिंगपूर परिसरात डॉ. सुनील दादा पाटील यांनी साहित्यिकांची एक मांदियाळी उभी केली आहे. ८९ वर्षाच्या अशोक दादा पाटील यांचे पासून ते शिरढोण येथील इयत्ता १० वीत शिकणारी कु. आरती राजेंद्र खोत हिच्या काव्यसंग्रहापर्यंत मराठी - हिंदी - इंग्रजी आणि कन्नड भाषेतून शेकडो पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. प्रथितयश साहित्यिकांची बरोबरी गाठण्यास अजून थोडावेळ लागेल कदाचित पण ती वाट आत्मविश्वासाने चालण्यास डॉ. सुनील दादा पाटील आणि ‘कंपनी’ यांनी सुरुवात केली आहे हे नि:संशय...
  
उद् बोधन  या कथासंग्रहात कसदार कथा आहेत. प्रत्येक कथा उत्कृष्ट असून उत्तम कथाबीज असणारी आहे. श्रद्धेचं महत्व भक्तांकडून पटवून देण्यात श्रद्धा या कथेत लेखकाचे कसब दिसते तर प्रत्यक्ष परमेश्वरालाही ‘स्मरणशक्तीचं’ ब्रेन टॉनिक घेणेस प्रवृत्त करणारा लाकुडतोड्या श्रोत्यांची चांगलीच करमणूक करून जातो. सन्यास कसा, केव्हा व कोणी घ्यावा याचे अभ्यासपूर्ण पण रोचक विश्लेषण ‘सन्यास’ या कथेत आहे. सर्वसाधारण वाचक श्रावक यांचेपासून ते सन्यासदीक्षा घेण्याच्या मन:स्थितीत आलेले श्रावक ते थेट दीक्षागुरु यांचेपर्यंत सर्वांनाच अंतर्मुख करणारी ही एक सुंदर कथा आहे. 
 
दोन विद्वान वक्ते एकमेकांचा कसा द्वेष करतात हे ‘विद्वानद्वय’ या कथेत तर स्वप्न या मिश्कील कथेत पतिराजासमोर त्याच्या स्वतःच्या मरणाचा प्रस्ताव ठेवणारी पत्नीची मैत्रीण कसा यक्ष प्रश्न उभा करते हे कथा वाचूनच समजून घ्यावे हे बरे.
 
औचित्याचा अतिरेक या कथेत घराला आग लागल्यानं म्हातारी भाजते. तिला दवाखान्यात नेण्यासाठी घोड्याने हेलपाटे एवढे मारले की, त्यात तो मरतो. घोड्याची हाडं घश्यात आडकून टिपू कुत्रा मेला हे उलट्या क्रमाने नोकराने सांगितले आणि हे ऐकून शेवटी मालकही गतप्राण होतो. हे गंभीर कथाबीज फारच बहारदारपणे लेखकाने फुलवलं आहे. उर्वरित कथांमधून असंच उत्कंठावर्धक कथाबीज घेऊन लेखकाने हा कथासंग्रह आकर्षक व उद् बोधनपर केला आहे.
 
‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हा ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांच्यामधील वाद ‘फडके-खांडेकर’यांच्या काळात गाजला होता. त्यातील ‘जीवनासाठी कला’ ही बाजू प्रस्तुत लेखकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. प्रत्येक कथा रोचक तर आहेच पण प्रत्येक कथेतून एक महत्वपूर्ण ‘उद् बोधन’ लेखकाने अत्यंत बहारदार शैलीत केले आहे. भविष्यकाळात ‘उद् बोधन’ हा कथासंग्रह साहित्याच्या प्रांगणात निश्चितपणे चमकत राहील याबद्दल खात्री आहे. लेखक श्री. प्रविणकुमार वैद्य आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांच्या हातून भविष्यातही अशीच साहित्य सेवा घडत राहो अशी शुभेच्छा!