शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By वेबदुनिया|

पॉली उम्रीगर

WD
जुन्या काळातील पॉली उम्रीगर हे एक श्रेष्ठ क्रिकेटपटू. त्यांचा जन्म 28 मार्च 1926 रोजी सोलापूर येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव पहलान रतनजी उम्रीगर. त्यांच्या वडीलांची कापडाची कंपनी होती. नंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले.

पॉली उम्रीगर यांचे शिक्षण मुंबईत झाले. 1944मध्ये झालेल्या बॉम्बे पेंटॅग्युलर स्पर्धेत ते पारसी संघातर्फे खेळले. हा त्यांचा प्रथम श्रेणीतील पहिला सामना. त्यावेळी ते अठरा वर्षांचे होते. भारतीय कसोटी संघात त्यांची निवड झाली 1948मध्ये. वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या कसोटीसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली.

1955 ते 1958 याकाळात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. पॉली उम्रीगर मध्यम फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. 1962मध्ये ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा अधिक कसोटी म्हणजे 59 खेळल्या होत्या. त्यांची धावसंख्याही त्यावेळच्या भारतीय फलंदजांपेक्षा अधिक होती. त्यांनी एकूण 3,631 धावा काढल्या. त्यात बारा शतकांचा समावेश होता. त्यावेळी भारतात सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावे होता. पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते. 7 नोव्हेंबर 2006 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.