सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: नागपूर , मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (17:19 IST)

भांडेवाडीच्या धर्तीवर राज्यात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा विचार

- मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय 
भांडेवाडी येथे उभारण्यात आलेला १३० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प हा एक पथदर्शी आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अभिनव प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शहरांत जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत लवकरच सकारात्मक विचार केला जाईल असे मत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केले. क्षत्रिय यांनी भांडेवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पास नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
 
नाल्यातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून १२०० मिमी व्यासाच्या १९ किमी लांबीच्या पाईपलाईनद्वारे महानिर्मितीच्या कोराडी येथील ३x६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पात गेल्या चार महिन्यांपासून पाणी नेण्यात येत असून कोराडी येथे नव्याने उभारण्यात आलेला हा वीज प्रकल्प शुद्धीकरण केलेल्या पाण्यावर चालविण्यात येत आहे.  या प्रकल्पाची ९० दिवसांची प्राथमिक परिपूर्ती चाचणी सुरु झाली असून या प्रकल्पांतर्गत १३० एमएलडी पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. 
 
अशाप्रकारचे जलशुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रातील अन्य औष्णिक वीज केंद्रालगतच्या मोठ्या शहरांत राबवून, प्रक्रिया केलेले पाणी वीज प्रकल्पात घेण्यासंबंधीचे सर्वेक्षण सुरु आहे. दरम्यान नांदेड जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी महानिर्मितीच्या  परळी औष्णिक वीज प्रकल्पात घेण्याची निविदा काढण्यात येत असल्याचे महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन माळी यांनी सांगितले. या वेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महानगर पालिकेचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, महानिर्मितीचे मुख्य अभियंता अनंत देवतारे यांच्यासह महानिर्मिती आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.