गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

पाडव्याच्या दिवशी पिकपाण्याची भविष्यवाणी

- किरण जोशी

WD
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षांची सुरूवात... कुणी या दिवशी जोरदार खरेदी करतो तर कुणी नवीन संकल्प सोडतो. पण, या सणासंदर्भात अनेक चाली रीती, परंपराही जोडल्या गेल्या आहेत. मुख्यत्वेकरून ग्रामीण भागामध्ये परंपरेप्रमाणेच सण साजरे केले जातात.

सांगली जिल्ह्यातील भावळणी या छोट्याशा गावात अशाच आगळ्यावेगळ्या परंपरेप्रमाणे गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. पाडव्याच्या दिवशी सायंकाळी गावातील हनुमान मंदिरात सारे गाव लोटते आणि मंदिराचे पुजारी पंचांग वाचन करतात. पंचांग वाचन एवढ्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादीत नसतो, तर पुढील वर्षांतील पिकपाण्याचे अंदाज देण्यात येतात आणि त्याप्रमाणेच शेतकरी पिकांचे नियोजन करतात. विशेष म्हणजे या गावातील शेतकरी प्रगतशील असले तरी त्यांचा यावर तितकाच विश्वास आहे.

पंचांग वाचन आणि पिकपाण्याचा अंदाज वर्तविण्याची ही परंपरा गेल्या 150 वर्षांपासून सुरू आहे. ग्रामजोशी शिवानंद कुलकर्णी यांची ही पाचवी पिढी सध्या गावची परंपरा पुढे चालवत आहे. याबाबत माहिती देताना शिवानंद कुलकर्णी म्हणाले, पूर्वीच्या काळात आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान नसायचे. त्यावेळी वर्ष भविष्य आणि पंचांगात दिलेल्या भविष्यावरच विश्वास असायचा आणि त्यामधील पर्जन्यविषयक दिलेले अंदाजही तंतोतंत जुळायचे पण, गावातील लोकांना पंचांगाची माहिती नसायची म्हणून ही परंपरा सुरू झाली.

गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी सगळे गाव मंदिरात लोटते. देवाचे दर्शन घेतल्यानंतर एकमेकांना नाम ओढल्यावर लोक भविष्य ऐकायला बसतात. सारे वातावण भारावून जाते.

पंचांगात दिलेल्या माहितीला अनुसरून द्राक्ष, स, गहू, ज्वारी आणि इतर पिकांच्या आणेवारीचा अंदाज दिला जातो. पिकांची जात, रास आणि गुरूबल यावरून आम्ही पिकपाण्याचा अंदाज काढतो. हा अंदाज 70 ते 80 टक्के खरा ठरतो त्यामुळे शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्यानुसार पिक घेतात. गेल्या काही वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ आणि त्यानंतरच्या अतीवृष्टीचा अंदाज आम्ही दिला होता असेही कुलकर्णी यांनी सांगितले.