कॅनडामध्ये एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्या
टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ शिवांक अवस्थी या भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
मिळलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये शिवांक अवस्थी या आणखी एका भारतीय नागरिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शिवांक २० वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले. ही घटना टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांकला प्रथम गोळी मारण्यात आली. गोळीबारानंतर स्थानिक लोक जमले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिवांकला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी शिवांकचा फोटो शेअर केला आहे आणि लोकांकडून अधिक माहिती मागितली आहे. तो विद्यार्थी होता की नाही हे अद्याप कळलेले नाही. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
Edited By- Dhanashri Naik