शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

स्पेनमध्ये दुपारी तीन तास झोप अनिवार्य

दुपारच्यावेळी घराबाहेर पडाल तर खैर नाही. गुपचूप घरात बसून राहायचे. कोठेही जाण्याची गरज नाही. आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत हमखास अशा प्रकारची तंबी मिळत असे. उन्हाळ्याच्या दिवसात आजी-आजोबांकडून बोल ऐकावे लागत. सध्या स्पेनमधील नागरिक त्याचा प्रत्यय घेऊ लागले आहेत.
 
स्पॅनिश शहर अडोरच्या रहिवाशांना लहानपणीचे दिवस आठवले नसतील तरच नवल. त्यामागील कारण ठरले आहे मेयरचे आदेश. नागरिकांनी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यत घराबाहेर पडू नये. सांयकाळपर्यंत घरातच बसून राहावे. अगदीच महत्त्वाचे काम असल्यास तो अपवाद, परंतु घरी बसून राहणे अनिवार्य करण्यात येत असल्याचे फर्मान काढण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मेयर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कंपनी, कार्यालयांच्या प्रमुखांनादेखील याबाबत सवलत देण्याची भूमिका घेण्यास बजावले आहे. या काळात प्रत्येक गोष्ट बंद ठेवण्यात यावी . 2 ते 5 या दरम्यान प्रत्येकाने घरी झोप काढली पाहिजे, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या काळात उष्णतेचे प्रमाण सर्वाधिक असते, असे या नगरपरिषदेच्या प्रशासनाला वाटते. त्यामुळे आजारी नागरिकांची संख्या वाढू शकते.
 
मेयर जॉन फाऊसर व्हिटोरिया यांनी नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. मुलांनाही घरातच बसवून ठेवावे. दरम्यान कोणत्याही प्रकारचे काम करू नका. जेणेकरून इतरांनाही विश्रांती घेण्याची संधी मिळू शकेल. शहरातील शॉपिंग मॉल, बार, दुकाने, स्विमिंग पूल 2 ते 5 पर्यंत बंद ठेवण्यात येऊ लागले आहेत. त्याचबरोबर फुटबॉलच्या निमित्ताने मुलांचे आता मस्ती करण्यासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे. त्यामुळे हे फर्मान वयस्कर आणि घरातील बड्या मंडळींच्या पथ्यावर पडले आहे. त्यांना काही वेळ का होईना दिलासा मिळाला आहे. आता मोठ्यांच्या दुपारच्या डुलकीत व्यत्यय येत नाही. या आदेशाचा फायदा शेतकर्‍ांनाही होऊ लागला आहे. त्यांनाही कडक उन्हात कामातून काही वेळ विश्रांती दिली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही.
 
भूमध्य आणि दक्षिण युरोपात ही एक परंपराच राहिली आहे. त्यामुळे हा आदेश इतिहासाला अनुसरूनच आहे, शिवाय दुपारची वामकुक्षी आरोग्यासाठी सकारात्मक प्रभाव टाकणारी असते, असा दावाही काही शोधांतून होतो.