शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

चेन्नई सुपर‘किंग’

WD
आयपीएलच्या ५४ व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर माईक हसी आणि सुरेश रैना या दोघांच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे सनरायजर्स हैदराबादविरुद्ध चेन्नईने ७७ धावांनी शानदार विजय मिळविला. अवघ्या ५२ चेंडूत ९९ धावा करणारा सुरेश रैना सामनावीरचा मानकरी ठरला.

२२४ धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात अतिशय धक्कादायक झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर कर्णधार संगकाराही काही कमाल दाखवू शकला नाही. तोही अवघ्या तीन धावांवर असताना अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. दोन विकेट लवकर गेल्याने हैदराबादला सुरुवातीलाच जबरदस्त धक्का बसला. धावफलकावर अवघ्या ५५ धावा असताना आठव्या षटकात विहारी बाद झाला. त्यानंतर मोहित शर्माने डेरेन सामीलाही लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठविले. तो अवघ्या सात धावा करून तंबूत परतला. पार्थिव पटेलने उत्कृष्ट फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्ऱयत्न केला. मात्र, ४४ धावांवर असताना त्यालाही मोहित शर्माने मुरली विजयच्या हाती झेल देण्यास भाग पाडून तंबूत पाठवले. त्याने ३० चेंडूंत ६ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. हैदराबादची बिकट अवस्था असताना के. व्ही शर्मा आणि परेरा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तथापि, परेरा २३ धावांवर असताना ब्राओच्या गोलंदाजीवर बद्रिनाथच्या हाती झेल देऊन बाद झाला. शर्माने जोरदार फटकेबाजी केली. त्याने ३३ चेंडूंत ३९ धावा करून नाबाद राहिला. तत्पूर्वी मिश्राही काही वेळ तग धरण्याच्या प्ऱयत्नात होता. तथापि, अवघ्या सहा धावांवर असताना तो जडेजाच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. स्टेननेही थोडी फटकेबाजी केली. तथापि, त्याला मॉरिसने झेलबाद केले. हैदराबादसमोर मोठे आव्हान असताना २० षटकांत ते १४६ धावांपर्यंत मजल मारू शकले. त्यामुळे त्यांना तब्बल ७७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने तीन गडी गमावून २२३ धावांपर्यंत मजल मारली. सुरेश रैनाने जोरदार फलंदाजी करताना ५२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने तब्बल ९९ धावा ठोकल्या. चेन्नईला पहिला झटका मुरली विजयच्या रूपाने बसला. परेराने त्याचा बळी घेतला. मुरलीने २० चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकाराच्या जोरावर २९ धावा केल्या. त्यानंतर माईक हसी आणि सुरेश रैना ही जोडी चांगलीच जमली. त्यांनी जोरदार फटकेबाजी करीत हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. ही जोडी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जात असतानाच १८ व्या षटकात माईक हसी बाद झाला. त्याला परेराने बाद केले. हसीने ४२ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्यावेळी धावफलकावर १७८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच धोनी मैदानात उतरला. त्यामुळे धोनी आणि रैना फटकेबाजी करून मोठी धावसंख्या उभारतील, असे वाटत होते. तथापि, महेंद्रसिंग धोनी चार धावा करून परेराच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर रैनाच्या साथीला जडेजा आला. त्यानेही शेवटच्या टप्प्यात उत्कृष्ट फलंदाजी करून रैनाला सुरेख साथ दिली. ६ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १४ धावा केल्या.

दुस-या बाजूने रैनाने सातत्याने फटकेबाजी केल्याने तब्बल ९९ धावांपर्यंत मजल मारली. तोपर्यंत डाव संपल्याने त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तथापि, हैदराबादसमोर तब्बल २२४ धावांचे आव्हान उभा ठाकले. शेवटी हैदराबादला हा डोंगर पार करता न आल्याने त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने इशांत शर्मा आणि परेरा यांची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. इशांत शर्माने चार षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळविता आला नाही. परेरानेही चार षटकांत ४५ धावा केल्या. तथापि, तीनही बळी त्यानेच मिळविले. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही. मिश्रानेही चार षटकांत ४१, तर सामीने दोन षटकांत ३३ धावा दिल्या. हैदराबादने आतापर्यंत ११ सामने खेळले असून, एकूण १४ गुण आहेत.