'मनसे'ने दिला कॉंग्रेसला 'हात'
हाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या मराठी माणसासाठीच्या भांडणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगलेच फावले असून मुंबई व परिसरात शिवसेना व भाजप युतीला जोरदार धक्का बसला आहे. मुंबईतील सहाच्या सहा जागांवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर मध्य मुंबईतून कॉंग्रेसच्या प्रिया दत्त ३ लाख १९ हजार ३५२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी महेश जेठमलानी यांना १ लाख ४४ हजार ७९७ मते मिळाली. जेठमलानी यांच्या विजयात मनसेच्या शिल्पा सरपोतदार अडथळा ठरल्या. त्यांनी तब्बल १ लाख ३२ हजार ५५५ मते मिळवली. वायव्य मुंबईत कॉंग्रेसचे गुरूदास कामत २ लाख ५३ हजार ८९९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांचा ( २ लाख १० हजार ५७२ मते) पराभव केला. इथेही मनसेच्या शालिनी ठाकरेंनी १ लाख २३ हजार ८८५ मते मिळवली. सपाचे करोडपती उमेदवार अबू आझमी ८४ हजार मतांचे धनी ठरले. इशान्य मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईतील एकमेव उमेदवार संजय पाटील २ लाख १३ हजार मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरीट सोमय्या यांना २ लाख १० हजार ५७२ मते मिळाली. सोमय्या यांच्या विजयात मनसेचे शिशिर शिंदे १ लाख ९५ हजार ८८५ मते मिळवून आड आले. दक्षिण मुंबईतून कॉंग्रेसचे मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड व उत्तर मुंबईतून संजय निरूपम विजयी झाले. या तिघांच्या विजयातही मनसेचा मोठा 'हात' आहे. मिलिंद देवरांना कडवी लढत देताना मनसेचे बाळा नांदगावकर दुसर्या क्रमांकावर पोहोचले. उत्तर मध्य मुंबईतून शिल्पा सरपोतदारांनी १.३१ हजार, तर उत्तर पूर्व मुंबईतून शिशिर शिंदे यांनी १.९४ हजार मते घेतली हे महत्त्वाचे आहे. नाशिक या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहिला. त्याला २.१७ लाख मते मिळाली.ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजीव नाईक ३ लाख १ हजार मते मिळवून विजयी झाले. तर शिवसेनेच्या विजय चौगुलेंना २ लाख ५१ हजार ९८० मते मिळाली. मनसेच्या राजन राजे यांनी येथे १ लाख ३४ हजार ८४० मते घेतली. भिवंडीतही कॉंग्रेसचे सुरेश टावरे १ लाख ८२ हजार ७८१ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे जगन्नाथ पाटील यांचा (१ लाख ४१ हजार ६१६ मते) पराभव केला. येथेही मनसेचे देवराज म्हात्रे यांनी १ लाख ७ हजार मते मिळवली.