गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

किल्ले दुर्गाडी

- प्रमोद मांडे

MHNEWS
कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.

बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळ नदी येवून मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते.

हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर)च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५४मध्ये घेतला. त्यावेळी कल्याण बरोबर भिवंडीही ताब्यात आणली.

कल्याण सारखे महत्त्वाचे बंद ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवाने येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाही ही दुर्गेचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.

दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. येथे निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिर्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.

कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाता असे. येथे गणेशाची मूर्ती आहे.

दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे.

मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. दुर्गाडीचा किल्ला लहान असल्यामुळे सर्व परिसर पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास पुरेसा आहे.