गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

किल्ले निवती

- प्रमोद मांडे

MHNEWS
निवतीला जाण्यासाठी मालवण कडून २० कि.मी. अंतरावरील परुळे हे गाव गाढावे लागते. परुळे येथे आपण मुंबई पणजी महामार्गावरील कुडाळ मधूनही येवू शकतो. तसेच वेगुर्लाकडूनही आपल्याला परुळे येथे येता येते. निवती नावाची दाने गावे असून दोन्ही सागराकिनार्‍यावर आहेत. आणि दोन्ही गावांना जाणारे मार्ग वेगवेगळे आहेत हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला परुळे गावातून किल्ले निवती कडे जायचे आहे हे लक्षात ठेवावे.

परुळे हे गाव मालवण वेंगुर्ले या गाडीमार्गावर आहे. परुळे मधून किल्ले निवती कडे जाणारा गाडी मार्ग आहे. हा सहा-सात कि.मी. चा प्रवास निसर्ग रम्य आहे. किल्ले निवती गावापर्यंत गाडी रस्त्याने गेल्यावर सागर किनार्‍यावर सध्यातरी पाणी नाही. त्यामुळे खाली गावातून पाणी घेऊन गडाकडे वाटचल करावी.

दहापंधरा मिनिटांच्या चढाईत आपण झाढीने झाकलेल्या तटबंदीपर्यंत येऊन पोहोचतो. जांभ्या दगडाच्या काही पायर्‍या चढून आपण दरवाजा जवळ येतो. दरवाजा मात्र कालौघात नष्ट झालेला आहे. दाराच्या खूणा दिसतात डावीकडील बुरुजही ढासळत चाललेला आहे. उजव्या हाताला खंदकात जेमतेम डोकावून पहाता येते. खंदकाला लागूनच एक बुरुज उजवीकडे आहे. खंदकापलीकडे मोठे पठार पसरलेले आहे. या पठारावर आणि किल्ल्याच्या आत करवंदाच्या जाळ्या मोठय़ा प्रमाणावर आहेत. या जाळ्यांमध्ये येणारी करवंदेही मोठय़ा आकाराची टपोरी असून गोड चवीची आहेत. मात्र त्यांची चव चाखायची झाल्यास आपल्याला एप्रिल मे मधे किल्ले निवतीला भेट द्यावी लागेल.

किल्ले निवतीवर चढाईचा रस्ता बर्‍यापैकी रुंद केला गेला आहे. त्यामुळे गावकर्‍यांची जनावरेही चरायला गडावर येतात. या जनावरांमुळे गडावरील बांधकामानांही हानी पोहोचते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून सरळ येणार्‍या मार्गाने उत्तर बाजूला आल्यावर एक बुरुज दिसतो. या अवशेष रुपात राहीलेल्या बुरुजावर चढल्यावर कोकणच्या सौंदर्याचे एक वेगळे दालन आपल्यासमोर खुले होते. डावीकडे अथांग पसरलेला सिंधूसागर ऊर्फ अरबी सागर आपल्याला मंत्रमुग्ध करतो. सागराच्या अथांगपणामुळे त्यावर आलेली निळाईची झाक आणि किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांची धवल किनार आपल्याला खिळवून ठेवते. या पार्श्वभूमीवर नारळी पोफळीच्या उंच झाडांनी साथ सोबत केलेली भोगवेची पुळण अतिशय देखणी दिसते.

कोकणच्या किनार्‍याचे आरसपाणी सौंदर्य आणि त्या मागे बलदंड असा सिंधुदुर्ग किल्ला आपल्या मनात घर करुन रहातो. मोह टाळून आपण पुन्हा गड फेरीला सुरवात करतो. गडाच्या पश्चिम अंगाला सागर किनारा आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या खडकांवर सागराच्या लाटा अविरत धडका देत असल्याने या खडकाचे आकार मोठे मनोहारी दिसतात. सागरात मच्छिमारी नौका आणि डॉल्फीन मासे पहाण्यासाठी पर्यटकांना घेऊन फिरणार्‍या बोटी ही दिसतात. सागर लाटांची गाज îकतच आपण गडावरील मोठय़ा वाडय़ाच्या आत प्रवेश करतो. तटबंदीने युक्त असेलल्या या वाडय़ात मोठा चौथरा आपल्याला दृष्टीत पडतो. तटबंदी मधून मधून ढासळलेली असल्यामुळे तटावरून पुर्णवेळ फिरता येत नाही. तटबंदी वरुन दक्षिणकडील किनारा आणि सागरात उठवलेले खडक मोठे विलोभनिय दिसतात. सागरात शिरलेल्या खडकावरील सुळका छान दिसतो. भुगर्भ शास्त्रातील तज्ञांच्या मते हा खडक ६० ते ७० कोटी वर्षापुर्वीचा आहे. स्थानिक लोक याला जुनाखडक असल्याने जुनागड असेही म्हणतात.

निवती किल्ल्यावरुन मालवण ते वेंगुर्ले असा किनारा दृष्टीपथात येत असल्यामुळे खूप दूर अंतरापर्यंत टेहाळणी करण्यासाठी निवती किल्ला महत्त्वाचा होता. शिवकालीन बांधणीचा निवती पुढे सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. पोर्तूगिजांनी ही काही काळ यावर ताबा मिळवला. त्यांच्या कडून सावंतांनी पुन्हा निवती हिसकावून घेतला. इ.स.१८१८ मधे निवती विनासायास इंग्रजांच्या हाती पडला.

काही दुर्गावशेष आणि निसर्गसंपन्न परिसराचा वारसा मिरवणारा निवतीचा किल्ला दिर्घकाळ स्मरणात रहाणारा असाच आहे.