गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

कृष्णेच्या खोर्‍यातून वन्यजीवदर्शन

MH GovtMH GOVT
सागरेश्वर अभयारण्य हे कृष्णेच्या खोर्‍यातील संपूर्णतया मानवनिर्मित अभयारण्य असून सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा, पळूस तालुक्याच्या सीमेलगत साडेदहा चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. सागरेश्वर अभयारण्य म्हणजे एक दुर्मिळ प्रयोग असून स्थानिकांच्या सहकार्याने परिसराचे नियोजनबद्धरित्या वनक्षेत्रात रूपांतर करण्यात आले आहे.

उजाड माळरानावर प्राणी, पक्षी, वृक्षवल्लींनी समृद्ध अभयारण्य स्थापण्याच्या महत्प्रयासाचा प्रत्यय येथे पोहचल्यावर आल्याशिवाय राहत नाही. अभयारण्याचा परिसर निम, कशिद, सुबाभूळ, गुलमोहर, अंजन, निलगिरी, सिरस यासररख्या वृक्षराजीने समृद्ध आहे.

मात्र बहुतांश वृक्षराजीही लागवड करून संवर्धित करण्यात आलेली आहे. सांबर, चितळ, काळवीट, भेर, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा अभयारण्यात मुक्त संचार आहे. पक्षांचाही येथे मुक्त विहार आढळून येतो. येथे मोरांची संख्या खूप आहे. सागरेश्वरला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला होता.
  अभयारण्यास धार्मिक, सांस्कृतिक, पुरातत्त्वदृष्ट्याही महत्त्व आहे. येथील प्राचीन शिवमंदिरावरून अभयारण्यास सागरेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. अभयारण्यास लागूनच येथे भगवान शंकराचे एक मोठे मंदिर व इतर देवदेवतांच्या सुमारे एकावन्न लहान मंदिरांचा समूह आहे.      

अभयारण्यास धार्मिक, सांस्कृतिक, पुरातत्त्वदृष्ट्याही महत्त्व आहे. येथील प्राचीन शिवमंदिरावरून अभयारण्यास सागरेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. अभयारण्यास लागूनच येथे भगवान शंकराचे एक मोठे मंदिर व इतर देवदेवतांच्या सुमारे एकावन्न लहान मंदिरांचा समूह आहे. मंदिरांचे बांधकाम सातवाहनाच्या काळातील आहे.

सागरेश्वराच्या देवळापासून घाट ओलांडल्याबरोबर अभयारण्यास सुरूवात होते. येथे पर्वत कड्यावर कालभैरवाचे मंदिरही आहे. मंदिरात जायचे झाल्यास चिंचोळ्या बोगद्यातून प्रवेश आहे. कठिण बेसाल्टच्या दगडात हे मंदिर कोरण्यात आले असून पुरात्त्वदृष्टया महत्त्वपूर्ण आहे.

सागरेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ लहान असूनही येथे मोठ्या संख्येत पर्यटक येतात. आठवड्याच्या शेवटी एक दिवस निवांतपणे निर्सगाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी हे अभयारण्य उत्तम आहे. पाठीवर सॅक टाकून प्राणी, पक्ष्यांच्या सहवासात दिवसभर भटकंती करायची आणि सागरेश्वराचे दर्शन घेऊन परतीची वाट धरायची...

कसे पोहचायचे:
सागरेश्वर येथे रेल्वे व रस्ता मार्गाने पोहचता येते. रेल्वेने जायचे झाल्यास कराड रेल्वेस्थानक चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे-बेंगळूरू महागार्वार आहे. कराड येथून बसेस आहे.

राहण्याची व्यवस्था: सागरेश्वर येथे वनखात्याचे विश्रांतीगृह आहे. यासाठी उपवनसंरक्षक, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

मात्र सद्या या अभयारण्याकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याने कदाचित पर्यटकांना उपरोल्लेखित अनुभव येईलच, हे सांगता येत नाही.