शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By मनोज पोलादे|

नवेगांव बांध अभयारण्य

प्राणी, पक्ष्यांच्या सानिध्यात

नवेगाव येथील अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात जगभरातील स्थलांतरित पक्षी भेट देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी निम्म्याअधिक प्रजाती नवेगांव बांध परिसरात आढळतात. नवेगावच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेला आहे.

नवेगाव तलाव येथील निवांत व नीरव शांततेत पक्षी निरिक्षणाचा आनंद अवर्णनीय आहे. आपली दुर्बिण घेऊन तलावाच्या नजीक असलेल्या मनोर्‍यावर टेहळणी करता येते. सभोवतालचा परिसर न्याहाळत, विविध पक्ष्यांचे निरिक्षण करताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.

पक्ष्यांच्या हालचाली, सवयी, वैशिष्ट्ये टिपत नोंदी घेता येतात. जराही खळबळ केली की चाहूल लागून प्राण्यांनी पळ काढलाच म्हणून समजा. हे दुर्मिळ क्षण कॅमेर्‍यात टिपल्यास आठवणींच्या देशात कधीही जाता येते. या तलावास एकीकडून मोठी भिंत बांधण्यात आली आहे.

भितीच्या पलिकडे बघितल्यास प्रचंड जलाशयाचा साठा दृष्टीस पडतो. क्षितिजापर्यत निळेशार पाणी. धरणास सभोवताली टेकड्यांनी वेढले असून हिरव्यागार वनश्रीने त्या नटलेल्या आहेत. येथील जंगलात अस्वल, सांबर, चितळ, चित्ता यासारखे प्राणी आढळतात.

प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ सलिम अली पक्षी अभयारण्य, हरणांचा पार्क व सुंदर बगिचे येथे आहेत. अभयारण्यात रात्रीचा प्रवेश दिला जात नाही, तेव्हा सकाळीचे गेलेले बरे. येथे येण्यासाठी आधी येथील अभयारण्य व्यवस्थापनाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

साहसी पर्यटकांसाठी तलावातून नौकानयन करण्याची सुविधाही आहे. सगळीकडे हिरवाईने नटलेल्या टेकड्यांच्या मध्यभागी शांत निळ्याशार पाण्यावरून वाहणारा थंडगार वार्‍याचा स्पर्श अनुभवत वल्हवत रहाणे यासारखे सुख नाही.


जाण्याचा मार्ग ः

नवेगाव बांध येथे जाण्यासाठी विमानाने जवळच्याच नागपुर विमानतळावर उतरावे लागेल. तेथून हे अभयारण्य 150 किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास देऊळगांव रेल्वे स्टेशन येथून अवघ्या दोन किलोमीटरवर आहे. नवेगावपासून अभयारण्य 10 किलोमीटर आहे.