गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

नाशिक

देवळांचे शहर

स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणजे नाशिक. हे शहर देवळांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक काळापासून नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून महात्म्य प्राप्त झाले आहे.

देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी दक्षिण भारतात नाशिक व त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे आहेत.दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट पाहण्यासारखे आहेत.

येथील प्रसिध्द ठिकाणे- ‍

1. त्र्यंबकेश्वर

हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात ते वसले आहे. मुख्य ज्योतिर्लिंगाचे मंदिर पहाण्यासारखे आहे. त्याच्या चारही बाजूंनी कोट आहे. पूर्वेला मुख्या दरवाजा आहे. ब्रम्हा, विष्णू व महेशाची तीन लिंगे हे येथील वैशिष्ट्य आहे.

मंदिराजवळच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. मंदिरालालागूनच अहिल्या नदी वाहते. ब्रम्हगिरी पर्वतावरच गंगाद्वार हे ठिकाण आहे. येथे गोदावरी उगम पावते. त्याच्यावर ब्रम्हगिरीला जाण्याचा रस्ता आहे. तेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्याच्या खूणा असल्याचे सांगितले जाते.

त्र्यंबकेश्वर वारकरी भक्तांसाठीही महत्त्वाचे टिकाण आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथांना येथेच गहिनीनातांचा अनुग्रह झाला होता. त्यांची समाधीही येथेच आहे. तेथे मोठा उत्सवही साजरा होतो. शिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या तेरा पैकी दहा आखाड्यांचे आश्रम येथे आहेत.

त्र्यंबकेश्वरात बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी तर लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारण्याची परंपरा आहे. विशेषतः तिसर्‍या सोमवारी त्यासाठी मोठी गर्दी असते. हे स्थळ नाशिकपासून २७ किलोमीटरवर आहे.

2. पंचवटी-

त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. या नदीमुळे नाशिकचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पलिकडील भागाला पंचवटी म्हणतात. पंचवटी भागातच रामाचे वास्तव् होते असे मानले जाते. येथे असलेल्या पाच वडांच्या झाडांवरून या भागाचे नाव पंचवटी पडले.

प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. याशिवाय इतर अनेक मंदिरे येथे आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती, असे म्हणतात. गुहेत जायला फार छोटा रस्ता आहे. आतमध्ये राम लक्ष्मण व सीतेची मूर्ती आहे. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे मानले जाते.

३. रामकुंड-

पंचवटीतील हे सर्वात महत्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यात श्रीराम स्नानासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केले. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून न जाता वितळतात, अशी श्रद्धा आहे. जवळच गांधी तलाव आहे. या तलाव तसेच स्मारक आहे. महात्मा गांधीच्या अस्थी येथे विसर्जित केल्या हो्त्या. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होत असते.

४. काळाराम व इतर मंदिरे

पेशव्यांच्य काळात त्यांचे सरदार रंगवराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बनले आहे. त्याच्याभोवती दगडी कोट असून तो १७ फूट उंच आहे. मंदिरात आत ओवर्‍या आहेत. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिरात राम सीता व लक्ष्मण यांच्या २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत.

हे मंदिर बांधण्यास १७७८ साली सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी जवळच्या रामशेज डोंगरावरून काळा दगड आणण्यात आला. हे मंदिर बांधायला तेवीस लाख रूपये खर्च आला होता. दोन हजार कामगार बारा वर्षे काम करत होते. दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता.

तो बरीच वर्षे चालला होता. काळारामाव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेली मंदिरे या परिसरात आहेत. आकर्षक कलाकुसरीसाठी नारोशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी वसईच्या युद्धात विजय मिळाल्यानंतर काढून आणलेली घंटा याच मंदिरात बसवली आहे. याशिवाय नंदी नसलेली कपालेश्वर मंदिर आहे. प्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे.

५. तपोवन

पंचवटीतच गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर तपोवन हे ठिकाण आहे. तपोवन म्हणजे तप करण्याची जागा. पूर्वीच्या काळी या भागात दोन नद्यांच्या संगमामुळे हिरवळ होती. अतिशय प्रसन्न व मनोहारी वातावरणात साधू तपश्चर्येसाठी येथे येत असत.

रामायणकाळात लक्ष्मण येथे येत असे. त्याने शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग येथे घडला असे मानले जाते. या भागात काही गुहासुद्धा आहेत. नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही पर्यटकांची येथे गर्दी असते. येथे हनुमान व लक्ष्मण यांची मंदिरेही आहेत.

6. अंजनेरी

हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेरी नाशिकपासून २० किलोमीटरवर आहे. या पर्वतावर जैनांची लेणीसुद्धा आहेत. गिर्यारोहणासाठी येथे असलेले सुळके प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच हे ठिकाण आहे. मंदिर डोंगरावर आहे.

7. वणी-

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील जगदंबा देवी आहे. सप्तश्रंृग डोंगरावर हे स्थान आहे. डोंगरावर गेल्यानंतर तेथून नऊशे पायर्‍या चढून गेल्यानंर देवळात जाता येते. डोंगरातच देवीची मूर्ती कोरलेली आहे. अठराभूजा असलेली मूर्ती देखणी आहे. नवरात्र व चैत्रात येथे मोठी यात्रा भरते.

ही देवी अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे भक्त येतात. अनेक भक्त आपल्या गावापासून कावडी भरून आणतात. हे ठिकाण नाशिकपासून ५२.२७ किलोमीटरवर आहे.

8.बौद्धलेणी

नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिकपासून आठ किलोमीटरवर बौद्धलेणी आहेत. (ज्याला स्थानिक भाषेत पांडवलेणी म्हणतात.) पहिल्या वा दुसर्‍या शतकात ती बांधली असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार बांधण्यात आले आहे.

9.फाळके स्मारक-

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके नाशिकचेच. नाशिकमध्येच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देखणे स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आले आहे.

१०. जिल्ह्यातील स्थळे

नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेल्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. येवला हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय १८५७च्या युद्धात पराक्रम गाजविणारे तात्या टोपे येवल्याचेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी त्याच धर्मात मरणार नाही ही घोषणा येवला येथेच केली.

मालेगावजवळील झोडगे येथील गावी असलेले शिवमंदिर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरीजवळील टाकेद हे ठिकाण पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. सीतेला पळवून नेणार्‍या रावणाशी युद्ध करून याच ठिकाणी जटायू पक्षी निपचित पडला होता. त्याच्या स्मृत्यर्थ येथे जटायू मंदिरही आहे.

इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी उभारलेले विपश्यना केंद्र आहे. तेथे जगभरातून लोक येतात. चांदवड येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत अनेक गिर्यारोहणासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाशिकहून घोटीमार्गे जाण्यास जवळ आहे. शिवाय राज्यातील सर्वांत उच्च किल्ला म्हणून गणला जाणारा साल्हेरचा किल्लाही जिल्ह्यातच आहे.


जाण्याचा मार्ग ः

नाशिकला राज्यातील सर्व शहरातून येण्यास बस आहेत. शिवाय नाशिक रेल्वेमार्गावरही आहे. पुण्यापासून नाशिक २१० तर मुंबईपासून २३० किलोमीटर आहे.