शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

वाघ नाही पाहिला !

-जगदीश मोरे

MHNEWS
मुंबईत जाणवणारी बोचरी थंडी बडनेरा रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तडाखा दाखवू लागली होती. अमरावतीवरून पहाटेपहाटे मेळघाटाच्या दिशेने जाताना स्वेटर आणि डोक्यावर माकड टोपी घालूनही अंग कुडकुडत होते. तरीही ड्रायव्हर जोशी सांगत होता, ``साहेब आता तर थंडी कमी झाली आहे`` आमचा विश्र्वास बसत नव्हता. अमरावती... संत गाडगेबाबांचे वलगाव... परतवाडा पार करीत आमची जीप हळूहळू मेळघाटाच्या कुशीत शिरू लागली. सूर्य बर्‍यापैकी वर आला होता. विशालची चिमुकली तनिष्का आणि माझ्या पाच वर्षाच्या चार्वीची झोप पूर्ण उघडली होती. वर्षा आणि हेमाच्या चेहर्‍यावरील रात्रभराच्या प्रवासाचा शीण कमी झाला होता. उंचउंच वृश्रराजींमधून वाट काढत कोवळी किरणं जीपची काचं भेदत सर्वांना ऊब देत होती. सिंमेंटच्या जंगलातील माणसांना निर्सग आपला एकएक पैलू दाखवत होता.

रस्ता आणि सिपना नदीत नागमोडी वळणाची जणू स्पर्धा लागली होती. सेमाडोहच्या अलिकडे सिपना नदीवरच्या लहानशा धबधब्याने आमचे लक्ष वेधून घेतले. हेमाला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. वर्षानेही सुरात सूर मिसळत गाडी थांबविण्याची सूचना केली. विशाल फारसा उत्साही नव्हता, पण गाडी थांबविण्यास त्याचा नकारही नव्हता. माझी इच्छा नसूनही विरोध करणं अवघड होतं. मला निसर्ग आवडत नाही असं नाही. पण ही केवळ मेळघाटाची झलक होती. संपूर्ण टागर सफारी बाकी होती. वाघोबाच्या दर्शनासाठी आतूर होतो. शिवाय मुंबईहून आलो म्हणून मी काही मुंबईकर नव्हतो. हायस्कूलमध्ये असताना दुसर्‍याच्या शेतावर दहा रुपये रोजाने कापूस वेचणीस जाताना `दुपारच्या भाकरी` नाल्याकाठीच लहामोठ्या धबधब्यांच्या साक्षीने फस्त व्हायच्या आणि त्याच्याच पाण्याने तहानही भागायची. म्हणून मला या धबधब्याचं अप्रुप नव्हतं. तो तर जणग्याचा भाग होता. मी मुंबईत आलो म्हणून... पण आजही असंख्य ग्रामीण जनतेचं तेच जीवन आहे. माझी पत्नी वर्षाला मात्र त्याचं फार अप्रुप होतं. सहाजिकच आहे. कारण तीच आख्खं बालपण मुंबईलगत गेलं. विशाल आणि त्याची पत्नी हेमा कोल्हापूरकडचे असले तरी शहरातच वाढले- घडलले. ट्रीपची सुरवात विक्षिप्तपणानं नको म्हणून अखेर मीही सगळ्यांएवढाच धबधब्याचा मनसोक्त आनंद घेतला.
धबधब्याच्या पुढील प्रवास सुरू झाला. आमचं कोलकाज विश्रामगृहाचं आरक्षण होतं. सेमाडोहवरून पुढे 22 किलोमीटरवर ते आहे. मनमोहक निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करत आम्ही कोलकाजला आलो. निसर्ग सौंदर्यानं नटलेला आणि जैविक विविधतेनं संपन्न परिसरातील कोलकाज विश्रामगृह म्हणजे वनराईतला स्वर्गचं. उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेला गच्च झाडी तर पूर्वेला सिपना नदीचं विस्तीर्ण पात्र. माणूस साचलेपणाला कंटाळतो. डोहात साचलेलं पाणी मात्र सिपनाचं सौदर्य खुलवतं होतं. डोहाच्या पुढे दगड गोट्यांवरून खेळत जाणार्‍या पाण्याच्या प्रवाहचं संगीत कानात गोडवा ओतत होतं. सोबतीला पक्षांचा किलबिलाट होता. सूर्य डोक्यावर आला होता. पण गारठा कायम होता. भराभर आंघोळी आटपून दुपारी तीन वाजता टायगर सफारी सुरू करायची होती. तत्पूर्वी दुपारच्या जेवणासाठी विश्रामगृहालगतच्या कॅन्टिमध्ये जेवणावर भरपेट ताव मारला. खूप दिवसानंतर चुलीवरच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेत होतो. बाजूलाच कॅन्टिनवाल्यांची म्हैस होती. विशालनं चार्वी अन्‌ तनिष्काला `बफेलो सफारी` घडविली. गावी कधीकाळी शेतातून म्हैसींना हुसकून लावण्याची `ड्युटी` करावी लागत होती. आज त्याच म्हशीचंही अप्रुप होतं. हे सगळंच जुनं तरी नवीन भासत होतं. फरक एवढाच की हे विदर्भातलं होतं. मी खानदेशातील जीवन अनुभवलं होतं.


अखेरीस दुपारी तीनच्या सुमारास टायगर सफारी सुरू झाली. एका पुस्तकात वाचलेलं होत, ``मेळघटातील वृक्षलतांवर सुरू असते पक्षिकुळांचं जीवनचक्र. अरण्यभूमीवर पडलेल्या पानापानाखाली पाहायला मिळतं कीटकांचं विश्र्व. आणि तेथील जंगलात सुरू असते व्याघ्रराजाची शाही भटकंती. कशासाठी पोटासाठी, वंशवेल वाढविण्यासाठी. अरण्य जीवंत ठेवण्यासाठी. कारण वाघ हा अरण्याचा प्राण आहे. आत्मा आहे. सुर्याशिवाय सबंध सृष्टीला आधार नाही. हवा- पाण्याशिवाय पृथ्वीचं अस्तित्व नाही. तसचं वाघाशिवाय अरण्य नाही. भारतातील 28 व्याघ्र प्रकल्पात मेळघाट प्रकल्पाचा आठवा क्रमांक लोगतो. महाराष्ट्राचा मेळघाट म्हणून त्याचा सार्थ अभिमान वाटतो.

सुमारे 3 हजार 27 चौरस किलोमीटरच्या मेळघाट परिसरात अतिसंरक्षीत गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट अभयारण्य, नरनाळा अभयारण्य, अंबावरबा अभयारण्य आणि वान अभयारण्यांचा समावेश आहे. मेळघाटचे वन दक्षिण उष्ण प्रदेशीत पानगळीचे शुष्क वन म्हणून ओळखले जाते. साग हा या वनातील प्रमुख वृक्ष आहे. त्याचबरोबर हल्दू, तेंदू, ऐन, धावडा, साजड, लेंड्या, तिवस, बाबू आदी वृक्षही आहेत. कळलावी, शतावरी, चुर्णी, मालकांगणी, ब्राम्ही, दुधीया, तिखाडी, रक्तचंदन, नागरमोथा, अश्र्वगंधा, अर्जून आदी वनौषधीयुक्त वनस्पतीही या परिसरात विपुल प्रमाणात आहेत. जगात ठराविक ठिकाणी असणारी दुर्मिळ अशी कंदिल पुष्प (Ceropegia) वनस्पती 1973 मध्ये मेळघाटातील तारुबांदा अरण्यात आढळल्याचं वाचण्यात आलं आहे. त्याचं वर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचीही स्थापना झाली होती.

हे सगळं आज प्रत्येक्ष अनुभवण्याचं होतं. सगळे आतूर होतो. जंगलाच्या राज्याच्या दर्शनाची ओढ होती. उत्सुकता शिगेला पोचली होती. जणू आम्ही त्याच्या गळाभेटीलाच चाललो होतो. डांबरी रस्त्यावरून आमची गाडी आडवटेला दाट- गर्द जंगलाच्या दिशेने निघाली. बैलगाडीही चालवणं अवघड असलेल्या रस्त्यावरून गाडी चालू लागली. पावसाळ्यानंतर तयार केलेल्या या रस्त्यावरून अद्याप फारशी पर्यटकांच्या गाळ्यांची ये-जा झालेली नव्हती. प्रत्येक पावसळ्यात हा रस्ता वाहून जातो. दरवर्षी तो नव्यानं तयार करावा लागतो. अद्याप तो 'सेट' व्हायचा होता. उंच- उंच सागाच्या जंगलातून प्रवास सुरू होता. गवताची किंवा झाडांच्या पानाची कुठे लवलव झाली तरी कान आणि डोळे सतर्क होत असतं. असंच एका वळणावर पानांची सळसळ होत असल्याचा आवाज आला आणि ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी करत ``डावीकडे बघा``, असं हळूच म्हणाला. आमची उत्सुकता वाढली. 'बघ... बघ...' म्हणत पेंगणार्‍या चार्वीला वर्षाला सावध केलं.

तनिष्काला अजून वाघ काय कळत नव्हता तरीही ``पिल्लू! बघ... बघ... टागर बघ!``हेमा म्हणाली. वनराज जणू प्रकटच होणार होता. मी आणि विशालनं लगबघीनं कॅमेरा ऑन केला. अर्धवट वाळलेल्या गवतातून आणि सागांच्या झाडांआळून वाट काढत `तो` आमच्या दिशेनं येऊ लागला. ड्रायव्हरनं गाडी थोडी मागं घेतली. आपण भाग्यवान आहोत. आपल्याला वाघ दिसणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. रस्त्याच्या कडेच्या गवताताली सळसळ वाढली आणि त्यातून दिमाखात अवाढव्य गवा समोर आला. क्षणभर धस्स झालं! वाघ नाही. पण गव्याच देखणं रूपही आनंद दऊन गेलं.

विविध वैशिष्ट्ये असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आमची टायगर सफारी सुरू होती. 1973 मध्ये या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली होती. संपूर्ण मेळघाटचा परिसर 3 हजार 27 चौरस किलोमीटरचा असला तरी व्याघ्र प्रकल्पाचा प्रत्यक्ष परिसर 1 हजार 677 चौरस किलोमीटरचा आहे. 2006च्या व्याघ्रगणनेनुसार मेळघाटात 69 वाघ आणि 94 बिबटे आढळले आहेत. त्याचबरोबर गवेसुद्घा मोठ्या संख्येने आढळले. वाघांबरोबरच या परिसरात बिबटे, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चौसिंगा आदी वन्यजीवही आढळतात. 800 ते 1200 किलो वजनाचा रानगवा हासुद्घा मेळघाटाचे एक वैशिष्ट्य आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य रोख पर्यावरण संतुलनाशीनिगडीत आहे. आर्थिक, सौंदर्यात्मक, सांस्कृतिक व पर्यावरण मूल्यांसाठी वाघांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्याच मानवाच्या हिताचं असल्याचं मेळघाटात फिरताना पदोपदी जाणवतं. पुस्तकातलं निसर्गचक्र आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. गाडीच्या शेजारून चोचीतल्या किड्यासह भूर्रकन उडून गेलेला देखणा किंगफिशर मनात घर करून गेला. घनदाट जंगल, नागमोडी नदी- नाले, काहीसा गवताळ भाग ही मेळघाटची विविध रुपे. गवताळ भागातून गाडी जाताना आवाजाने विचलित होणारे हरणांचे कळप सुसाट धावत होते. एका कळपातला सांबर धाडसाने उभा होता. तो फोटोसाठी जणू पोज देत होता. काही काळविट मात्र सावध पावलं टिकत होते. जागोजागी दिसणारी माकडं आणि त्यांच्यावर टपून बसलेली रानकुत्री... तुरू... तुरू... धावणार्‍या रानकोंबड्या... हे सगळं केवळ वनराजाच्या भेटीला निघालेलो असताना अवघ्या वन्यजीवसृष्टीचं जीवनचक्रच दिसू लागलं होतं.

सिपना, गडगा, डोलार, खंडू, खापरा, तापी आदी नद्या, असंख्य वन्यजीव आणि दुर्मिळ झाडं अशी विपुल जैवसंपदा मेळघाटात पाहायला मिळाली. जीवनाच्या सर्वांना स्पर्शून जाणारी जैवविविधता या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव येथेच घेता येतो. निसर्गाची साखळी अनुभवताना त्यातील सर्वोच्च स्थानी असलेला जंगलाचा राजा वाघ पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. वाघाला धुडाळण्याचा बराच प्रयत्न केला. वाघोबांचं दर्शन झालं असतं तर सफारीचा परमोच्च आनंद झाला असता. पण वाघाच्या निमित्तानं निसर्गाची विविधता अनुभवता आली. निसर्गाविषयीचं प्रेम आणखी `गहिरं` झालं. म्हणून तर वाघ पाहिला नाही म्हणून दुःख झालं नाही. उलट निसर्गाचा आनंद लुटला याचं अधिक अप्रुप वाटलं.