शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: सोमवार, 24 मार्च 2014 (17:03 IST)

वेरुळची जगप्रसिद्ध लेणी

जागतिक वारसा लाभलेली वेरुळची जगप्रसिद्ध लेणी संभाजीनगर पासून 30 कि. मी. वर आहेत. यातील कैलास लेणे जगातील सर्वात मोठय़ा लेण्यांमध्ये गणले जाते. हिंदुस्थानी शिल्पकलेचा अप्रतिम देखावा म्हणून या स्थळाची जगात ख्याती आहे. केवळ छिन्नी आणि हातोडय़ांच्या जोरावर मूर्तिकारांनी ही अद्भुत लेणी निर्माण केली आहेत. बौद्ध, हिंदू (ब्राह्मणी) आणि जैन अशा तिन्ही धर्माचे प्रतिबिंब या लेण्यांमध्ये आहे. 
 
आधी कळस मग पाया अशा स्वरूपाची ही लेणी म्हणून ओळखली जातात. आठव्या शतकातील राष्ट्रकुल राजांच्या राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली. बेसॉल्ट रॉकमध्ये कोरलेले कैलास लेणे घडविण्यास 200 वर्षे लागली असं मानलं जातं. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हे काम हस्तांतरित करण्यात आले. कैलास लेणे दुमजली असून ते एक शिवमंदिर आहे. सुरवातीला कुबेराचं शिल्प आपले स्वागत करते. त्यानंतर गजलक्ष्मीचं चित्र एका दर्शनी भागात कोरलेलं आहे. यातील दगडाला नागमोडी खणून पाण्याचा आभास निर्माण केलेला आहे. मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूस दोन भव्य हत्ती आणि कोरीव स्तंभ आहेत. या मंदिराचं स्वरुप एखाद्या रथासारखं असून दोन्ही बाजूस प्राण्यांची चित्रं कोरलेली आहेत. (हत्ती आणि सिंह) उत्तर दिशेला महाभारतातील आणि दक्षिण दिशेला रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. आठ दिशांना आठ दिशांचे स्वामी अष्ट दिक्पाल कोरलेले आहे. 
 
यातील एका प्रसंगात रावणाने कैलास पर्वत उचलेलं शिल्प आहे. हे शिल्प पाहताना कविराज भूषणाने छत्रपती शिवरांवर लिहिलेल्या एक छंदाची आठवण होते. आणि मग साडेतीनशे वर्षे मागे आपले मन इतिहासात डोकावू लागते. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांनी या लेण्यांना  भेट दिली असेल का? वेरुळजवळच अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले घृष्णेश्वराचे बारा जेतिर्लिगापैकी एक असलेले शिवमंदिर आहे. भोसले कुलोत्पन्न मालोजी राजाचा प्रतीकात्मक स्वरूपातील वाडा वेरुळमध्ये आहे. जैन शिल्पकलेचा मुकुटमणी, बौद्ध शिल्पकला असलेली वेरुळची लेणी एकदा तरी पाहावीत, अशी आहेत.