गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By विकास शिरपूरकर|

संत्र्याची नगरीः नागपूर

MH GOVT
संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि राज्याच्या उपराजधानीचे केंद्र असलेल्या नागपूर जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टीनेही वेगळे महत्त्व आहे. सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये वसलेल्या नागपूरचे सौंदर्य नवेगाव बांध, सीताबर्डीचा किल्ला, दीक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस, अंबाझरी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय यामुळे अधिकच खुलले आहे.

नाग नदीच्या तिरावर वसलेल्या आणि सुमारे 9 हजार 890 स्के. किलोमीटर परिसरात पसरलेल्या नागपूरची स्थापना 1702 मध्ये देवगडचा गौंड राजा बख्त बुलंद शहा याने केली. शहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान याने १७०६ साली त्याची राजधानी नागपूरला हलविली. त्याच्या काळात नागपूरचा चांगलाच विस्तार झाला. पुढे मराठ्यांनी ती ताब्यात घेतली १७४२ मध्ये रघूजीराजे भोसले सत्तेवर आले. पुढे इंग्रज राजवटीच्या काळातही नागपूरची चांगलीच भरभराट झाली.

भौगोलिकदृष्ट्या देशाच्या नकाशावर पाहिल्यास भारताच्या मध्य भागातच शून्य मैलाचा दगड असल्याने त्यास शून्य मैलावरील शहर असेही संबोधले जाते. संत्र्याची मोठी बाजारपेठ असल्याने 'ऑरेंज सिटी' म्हणूनही नागपूरची ओळख आहे. मध्यंतरीच्या काळात भौगोलिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूरला देशाची राजधानी करण्याची मागणीही पुढे आली होती.

येथील वैशिष्ट्यपूर्ण नागपुरी संत्र्यामुळे या भागाची मोठी ओळख आहे. या संत्र्याने विदर्भाला ख-या अर्थाने वैभव प्राप्त करून दिले आहे. नागपुरी संत्र्यांचा इतिहासही तितकाच रोचक आहे. येथील तत्कालीन राज्यकर्ते रघूजी राजे भोसले यांनी आपल्या घरगुती बागेत सहज म्हणून संत्र्याची लागवड केली. फळ उगवून आल्यानंतर ते नेहमीच्या फळापेक्षा अधिक रसाळ व आकारानेही मोठे होते. हे पाहून त्यांनी आपल्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याची लागवड केली. तेथील हवामानामुळे येथे संत्रे उत्पादन चांगले यायला सुरुवात झाल्याने येथील शेतक-यांनी ते सुरू केले. आज नागपूरच्या संत्र्यांना जगभर मोठी मागणी आहे. त्यापासून जॅम, स्क्वॅश, ज्यूस आदींचे उत्पादन घेत इथल्‍या शेतक-यांनी आर्थिक स्‍वावलंबन साधले आहे.

पर्यटनाचे केंद्र

सातपुडा राणीने आपल्या दोन्ही हातांनी मुक्तपणे नागपूरवर निसर्ग सौंदर्याची उधळणं केली आहे. त्यामुळेच नागपूर शहरात नेहमीच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येते.

अभयारण्य

WDWD
विदर्भात वनांची काही कमी नाही. आणि जंगलात भटकंती करणे कुणाला आवडत नाही. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय अभयारण्य म्हणजे वन्य जीवांना त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानी जाऊन पाहण्याची इच्छा असणा-यांसाठी मेजवानीच. पर्यटकांसाठी रम्य परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्य जीवांचे वास्तव्य असून पक्ष्यांच्या अनेक जाती येथे पाहावयास मिळतात. जंगलात भटकंती करताना या सर्वांची सोबत म्हणजे अवर्णनीय आनंद.

नवेगाव बां

नवेगाव बांध हे विदर्भातील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य आणि साहसी पर्यटकांना साद घालणारे ठिकाण आहे. जंगलात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरच चित्ता, सांबर, हरीण, चितळ किंवा हूपहूप करीत येणा-या वानरांचे सहज दर्शन घडून आल्यास आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. जंगलात वन्यजीवांची दाट वस्ती आहे. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या अनेक पाणवठ्यांमुळे येथे वन्यजीवांचे हमखास दर्शन घडते. त्यासाठी खास निरीक्षण मनोरेही उभारण्यात आले आहेत. जंगलात गेल्यानंतर येथील हरीण संवर्धन केंद्र आणि पक्षिमित्र डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य पाहायला विसरू नका. देशात आढळणा-या पक्ष्यांच्या 60 टक्के जाती येथे सहज पाहता येतील.

सीताबर्डीचा किल्ला

MH GOVT
नागपूरला आला आणि सीताबर्डीचा किल्ला पाहिला नाही तर नागपूर पाहिलेच नाही असे सामान्यतः पर्यटकांमध्ये समजले जाते. दोन डोंगरांच्या मधोमध वसलेल्या या किल्ल्याचे बांधकाम 1857 मध्ये एका ब्रिटिश अधिका-याकडून केले गेले. पावसाळी पर्यटनासाठी हा 'हॉटस्पॉट' आहे. १८१७ साली ब्रिटिश व भोसले साम्राज्यात मोठे युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळविला आणि त्यानंतर नागपूर त्यांच्या ताब्यात गेले.

दीक्षाभूमी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेकडो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेले ही पावन भूमी. या घटनेची आठवण म्हणून येथे दीक्षाभूमीवर एका स्मारकाची स्थापना करण्यात आली आहे. रामदास पेठजवळ असलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी दररोज जगभरातून शेकडो बौद्ध बांधव येत असतात. या ठिकाणी भिक्खू निवास, पदव्युत्तर महाविदयालय आणि जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. सुमारे 6 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या विहारांमध्ये बुद्धाच्या जीवनातील अनेक कथा मांडण्यात आल्या आहेत. एका विहारात 5000 भत्ते बसू शकतील एवढी त्याची भव्यता आहे. स्तूपाची उंची सुमारे 120 फूट आहे. स्तूपासाठी संगमरवर व ढोलपूरच्या दगडांचा वापर करण्यात आला असून त्याचे रात्रीचे सौंदर्य सहज डोळयात भरते.

जादू मह

शहरातील विश्वकर्मा नगरात असलेला जादू महाल ही जागाही नागपूरकरांसाठी अभिमानास्पद वास्तू आहे. नागपूरमधील रहिवासी
असलेले प्रसिद्ध जादूगार स्व. सुनील भावसार यांनी या जादूच्या महालाची निर्मिती केली. कदाचित भारतातील जादू या विषयाला वाहिलेली ही एकमेव वास्तू असावी. या वास्तूमध्ये वेगवेगळ्या जादुई करामतींचा वापर केल्याने पर्यटकांना धमाल येते. पर्यटकांचा ओघ पाहून जादू महाल रविवारीही सुरू असतो.

MH GOVT
शहरात अनेक हिंदू प्रार्थनास्थळे असून पोद्दारेश्वर राम मंदिर हे त्यापैकी सर्वाधिक जूने आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. कोराडी येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमीच गर्दी असते. कॅथॉलिक सेमिनरी, बौद्ध ड्रॅगन प्लेसदेखील प्रसिद्ध आहेत. दिवसभराच्या भटकंतीनंतर आपोआपच पावले वळतात ती निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या अंबाझरी तलावाकडे. अत्यंत सुंदर उद्यान हे पर्यटकांचा थकवा घालविणारे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. संगीताच्या तालावर पदन्यास करणरे कारंजे आणि बोटींगची सुविधा असल्याने येथे बच्चे कंपनीही चांगलीच रमते. निसर्गाचा आनंद घेत तलावाच्या काठाकाठाने चालत जाण्यासाठी उद्यानातून छोटीशी पाऊलवाट आहे.

या शिवाय प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पुनीत झालेले रामटेक, महाकवी कालिदासाला 'मेघदूत' सारख्या महाकाव्याची निर्मिती
करण्यासाठी प्रेरित करणारीही हीच भूमी याच ठिकाणी सुमारे 600 वर्षे जुने श्रीरामाचे मंदिर आहे. तेलंगखेडी, गांधीसागर, गोरेवाडा व सोनेगाव हे तलावही पर्यटकांची अधिक आवडती ठिकाणे आहेत.

कसे जाल

रेल्वे
नागपूर हे रेल्वेचे सर्वांत मोठे जंक्शन असल्याने देशभरातून कुठूनही नागपूरला सहज पोचता येते. मुंबई, दिल्ली, चेन्नई व
कोलकाता या महानगरांना जोडणाऱ्या गाड्याही येथूनच जातात.

रस्ते
MH GOVT
भारतातील दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग (कन्याकुमारी-वाराणसी क्र. ७) व (हाजिरा- कोलकाता क्र. ६) हे नागपुरातून जातात. तर नागपूर-भोपाळ हा महामार्ग येथूनच सुरू होतो. आशियाई महामार्ग क्र. ४७- आग्रा-मटारा (श्रीलंका) व ४६ खरगपूर-धुळे येथून जातात.

विमान वाहतूक
देशांतर्गत व देशाबाहेरील अनेक विमानतळे नागपूरशी जोडली गेली आहेत.