शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

सागरी लाटांवर 'स्नॉर्कलिंगचा' रोमांच

सतीश लळीत

WD
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण प्रसिध्द आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गासाठी. पण समुद्राखालच्या विश्वाची सफर घडविणारी स्नॉर्कलिंगची सुविधा अलिकडेच मालवणला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरु केली आहे. मालवणला एक नवी ओळख देणार्‍या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणार्‍या या थरारक आणि रोमांचकारी पर्यटन उपक्रमाचा प्रत्यक्ष थरार अनुभवण्याची मजाच काही वेगळी आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने स्नॉर्कलिंगचा उपक्रम सुरू केल्याचे ऐकिवात आले होते. कामानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन-तीनदा जाण्याचा योगही आला, पण मालवणला जाणे झाले नाही. कणकवलीच्या एका पर्यटन परिषदेत डॉ. कुलकर्णींची भेट झाली. त्यांचा पॉवर पॉईंट शो पाहिला आणि लक्षात आले की, आपण एका फार मोठ्या संधीकडे उगाचच दुर्लक्ष केलयं. परिषद चालू असतानाच ताबडतोब मालवणला जाण्याचा निर्णय घेतला आणि ती संपताच थेट मालवणची जेटी गाठली.

अगदी स्पष्टच सांगायचं तर स्नॉर्कलिंगच्या माध्यमातून सागरी जीवसृष्टी न्याहाळण्याचा माझा अनुभव शब्दबद्ध करण्याचा हा माझा एक अल्पसा प्रयत्न आहे. कारण हा अनुभव शब्दात मांडणं शक्यच नाही. तो प्रत्यक्षच घ्यायला हवा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टी अतिशय स्वच्छ आणि 'व्हर्जिन' आहे. मालवण जवळचा तारकर्ली बिच, निवती, भोगवे, वायंगणी, सागरेश्वर, मोचेमाड असे स्वच्छ पांढर्‍या नितळ वाळूचे मोहक किनारे हे या जिल्ह्याचे वैभव आहे. मी आतापर्यंत या किनार्‍यावरील वाळूत थांबून अथांग सागराचे दर्शन घेत होतो, किनार्‍यावर डुंबण्याचा आनंद घेत होतो. पण आता या रत्नाकराच्या पोटात दडलेलं एक अनोखं विश्व 'कोकण डायव्हिंग ड्रिम' या पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून आता माझ्यासाठी खुलं झालं होतं. रंगीबेरंगी मासे, भव्य प्रवाळ (कोरल), समुद्रतळाच्या दगडांवरील आगळ्यावेगळ्या पाणवनस्पती अशा प्रकारची दृष्ये मी आतापर्यंत 'डिस्कवरी' किंवा 'नॉशनल जिऑग्राफिक' अशा वाहिन्यांबर बघत होतो. पण आता समुद्रातळाचे हे विलोभनीय दृष्य पाहण्याचा क्षण जवळ आला होता.

डॉ. सारंग कुलकर्णी आणि त्यांच्या प्रशिक्षित वीस डायव्हर्सची टीम मालवणच्या जेटीवर सज्ज होती. तिथल्या बुकींग ऑफिसमध्ये नोंदणी करून प्रतिव्यक्ती रु. २५० एवढं शुल्क भरून आम्हा आठ पर्यटकांचा गट मोटराईज्ड बोटीतून समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडे 'किंग्ज गार्डन' असे नामकरण केलेल्या ठिकाणी निघाला. सिंधुदुर्ग किल्ल्याला वळसा घालून आमची बोट इच्छित स्थळी पोचली. या ठिकाणी पोचेपर्यंत मार्गदर्शकांनी स्नॉर्कल कसे वापरावे, याची माहिती दिली.

स्नॉर्कलिंग हा प्रकार आपल्याकडे अगदीच नवीन आहे. किंबहुना मालवणचा हा प्रकल्प भारतीय उपखंडातील पहिलाच प्रयत्न आहे. स्नॉर्कलिंग म्हणजे चेहर्‍यावर विशिष्ट प्रकारचा मास्क लावून पाण्यावर तरंगत समुद्राखालील विश्व न्याहाळणे होय. स्नॉर्कलिंग मास्क म्हणजे चेहर्‍याला चपखलपणे फिट बसणारा व उच्च दर्जाच्या काचा असलेला एक मुखवटा असतो. त्यामुळे आपण डोके पाण्यात बुडविले तरी डोळे उघडून बघू शकतो. मास्क बसविल्यावर नाक बंद होते, म्हणजे नाकाने श्वासोच्छवास करता येत नाही. श्वास घेण्याची सोय म्हणून या मास्कला जोडलेली एक नळी (स्नॉर्कल) तोंडात घ्यायची असते. या नळीचे वरचे टोक पाण्याच्या पृष्ठभागावर असते. त्यामुळे आपण सहजपणे श्वास (मात्र तोंडाने) घेऊ शकतो. तुम्हाला पोहायला येत असेल तर पोहत पोहत डोके पाण्यात बुडवून तुम्ही पाण्यात ' बघु ' शकता. पोहायला येत नसेल तर शरीराभेवती रबरी ट्यूब घेऊन तरंगत तरंगत हा आनंद लुटू शकता. आपण भरलेल्या शुल्कात मोटराईज्ड बोटीतून समुद्रात नेणे, परत आणणे, स्नॉर्कल व सुरक्षासाहित्य पुरविणे व प्रत्येकासोबत एक प्रशिक्षित गाईड देणे याचा समावेश असतो.

इच्छित स्थळी पोचल्यावर बोट थांबली. नांगर टाकून ती स्थिर झाली. बोटीला जोडलेल्या शिडीतून आपण आता पाण्यात उतरायचे होते. सोबत गाईड होताच. चेहर्‍यावर स्नॉर्कल मास्क लावण्याआधी एकदा सिंधुदुर्ग किल्ल्याकडे नजर टाकली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला आणि (गाईडच्या भरवशावर) समुद्रात उडी टाकली. इथे समुद्राचे पाणी अतिशय स्वच्छ असून समुद्रतळाची खोली ५ ते २५ मीटर आहे. समुद्रतळ खडकाळ असून विविध प्रकारच्या समुद्री वनस्पती व प्राण्यांनी समृध्द आहे. गाईड वेळोवेळी माहिती देत होता. कमळाप्रमाणे फुललेले प्रचंड आकाराचे तपकिरी रंगाचे प्रवाळ (कोरल) पाहून मी थक्क होऊन गेलो. प्रवाळांच्या भिंती, दगडांना चिकटलेले शेवाळ, पाणवनस्पती, सारगॉसम पाणवनस्पतीचे जंगल, रेड स्नॉपर्स, एन्जल फिश, बटरफ्लाय, ब्लु लाईन ग्रुपर्स, सी कुकुंबर, लॉबस्टर असे विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे, प्राणी आणि वनस्पती माझे लक्ष वेधून घेत होत्या. काय पाहू आणि काय नको, अशी अवस्था झाली. या सगळ्या निरिक्षणात एवढा रमलो की वेळेचेही भान राहिले नाही. शेवटी आपली वेळ संपल्याची खूण गाईडने केली आणि मी भानावर आलो. पुन्हा बोटीत चढून आणि एका वेगळ्याच धुंदीत जेटीवर परतलो.

कोणीही सर्वसामान्य पर्यटक स्नॉर्कलिंग सुविधेच्या माध्यमातून हे पाण्याखालचे विश्व स्वत: प्रत्यक्ष पाहू शकतो. अगदी पोहायला अजिबात न येणारी व्यक्तीसुध्दा हा आनंद मनमुराद लुटू शकते. गेल्यावर्षीच्या हंगामात हजारो पर्यटकांनी हा आनंद लुटला आहे. पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते ७४ वर्षांच्या आजीबाईपर्यंत अनेकांचा यात समावेश आहे. कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नसणे आणि पोहायला येण्याचीही गरज नसणे यामुळे हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. शिवाय सुरक्षेची पूर्ण खबरदारी अािण माफक शुल्क याही जमेच्या बाजू आहेत. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.

स्नॉर्कलिंगपेक्षा थोडासा वेगळा आणि कठीण असा प्रकार म्हणजे स्कुबा डायव्हिंग. यासाठी तीन ते चार दिवस प्रशिक्षणाची गरज आवश्यक असते. स्कुबा डायव्हिंग म्हणजे पाणबुड्याचा वेश घालून, पायांना बदकाच्या पायांसारखे स्कुबा शुज घालून आणि पाठीवर प्राणवायूचा सिलिंडर बांधून समुद्रतळाशी जाणे होय. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात ही सुविधाही सुरु होणार आहे. म्हणूनच यापुढे पर्यटनाचे नियोजन करतांना त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अवश्य समावेश करा आणि मालवणच्या समुद्राखालचे अनोखे समुद्री विश्व पाहण्याचा आनंद आणि थरार मनमुरादपणे लुटा.

महान्यूजवरून साभार...