मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

' आथांग सागरावर सत्त्ता गाजवायची तर बेलाग समुद्गदूर्ग उभारायलाच हवेत'

श्री. दिलीप तळेकर

PR
महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. हिरवीगर्द झाडी, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचे लेण लेवून कोकण किनारपट्टी आपल्याला साद घालते आहे. या परशुराम भूमीत काजू, फणस, आंबा आणि कितीतरी झाडं मुक्तपणाने डोंगरात वाढतात. मनाला भूरळ पडावी अशा हिरव्यागार मखमली झालरीची शाल घेवून इथली प्रत्येक वस्ती वसली आहे. इथल्या निसर्ग सौंदर्याबरोबर गड, किल्ले, लेणी, गुहा, प्राचीन मंदीरे, दीपगृह अशी ऐतिहासिक स्थानेही आपल्याला पहाता येतात. कोकणचे रमणीय किनारे तिथली लाल माती, माडा पोफळीच्या बागा, आमराई हे सार नितांत सुंदर आहे. पण त्याचबरोबर कोकणच्या मातीला संरक्षण देणारे जलदुर्ग हेही कोकणचं एक आगळ वैशिष्ट आहे. समुद्गात अवघड ठिकाणी सामरिक व्युहरचनेसाठी बांधलेले हे जलदूर्ग महाराष्ट्राचे वैभवच आहे.

सबब जलदुर्गांच्या सहाय्याने उभ्या असलेल्या वेगळ्या वाटेवरचा कोकण पाहण्याचे उद्दीष्ट ठेवून सचिवालय जिमखाना, मुंबई च्या आम्ही 10 सभासंदानी 5 मोटर बाईक घेवून मोटर सायकल मोहिम 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर, 2009 या कालावधीत आयोजित केली होती. संपूर्ण किनारपट्टीवर मोटारसायकलवरुन फिरताना अनेक दुर्गम ठिकाणी भेटी देता आल्या. त्यामुळे आडवाटेवरच्या कोकणची नव्याने ओळख झाली. या जलदूर्ग सफारीची सुरुवात भाऊचा धक्का (मुंबई) येथून भल्या पहाटे झाली. बोटीत मोटर सायकली ठेवून रेवस धक्क्यावर उतरलो. तेथून भग्न तटबंदी असलेला रेवदंडा किल्ला पाहून थेट कोरलाई किल्ल्यावर गेलो, पुरातत्व विभागाकडून किल्ल्यावर नुतनीकरण संवर्धनाचे काम चालू आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेमध्ये असून किल्याच्या पायथ्याशी समुद्गातील जहाजांना आधार वाटणारी बत्ती (लाईट हाऊस) ताठ मानेने उभी होती. त्यानंतर जाताजाता नांदगावच्या सिध्दी विनायकाचे दर्शन घेवून पदमदूर्ग, सिध्दीमहल पाहत मुरुड जंजिरा पाहण्यासाठी पोहचलो.

PR
किनार्‍यावर बाईक ठेवून लाँचने जंजीरा पाहण्यास गेलो. जंजीरा या शब्दाचाच अर्थ मूळी पाण्यातला किल्ला असा होतो. तथापि, सर्रास
जंजीरा किल्ला असा द्विरुक्तीपूर्ण उल्लेख बहुतेकजण करतात. ' 15 व्या शतकात राजपुरीचा कोळीनायक राम पाटील यांच्याकडून नगरच्या निजामशहाच्या पिरमखान सरदाराने घाताने कसा जंजीरा बळकावला आणि जो शेवटपर्यंत मराठयांना जिंकता आला नाही' या इतिहासाची उजळणी करत करत किल्यावरील कलाल बांगडी आणि लांडा कासम या दोन प्रचंड तोफा पाहिल्या. त्यानंतर बोटीने दिघी जेट्टीवर उतरुन एका अंगाला छोटया छोटया टेकडया, कौलारु घरांची टूमदार गाव आणि दुसर्‍या अंगाला अमर्याद विस्ताराचा किनार्‍यावरच्या खडकांना अखंड धडका देणारा, चंदेरी जलराशींनी भरलेला अथांग सागर न्याहळत दिवेआगर गावात शिरलो. स्नानादी करुन शुभर्चित होवून पवित्र मनाने सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले. दिवेआगरचा सुंदर समुद्ग किनारा पाहता रात्रीचा मुक्काम तेथेच केला.

दुसरा दिवस श्रीवर्धनच्या पेशवे मंदीराच्या दर्शनाने सुरु झाला. तेथून दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर पाशी गेलो. रायगड जिल्हयाचे दक्षिणेकडचे शेवटचे टोक म्हणजे हरिहरेश्वर येथुन वाहणार्‍या सावित्री नदीच्या विस्तीर्ण पात्रामुळे रत्नागिरी व रायगड जिल्हयाची विभागणी झाली आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या पंचगंगेच्या जन्माची कथा आठवत, भक्तीभावाने हरि (विष्णु) - हर (शंकर) यांचे नामस्मरण करीत हरिहरेश्वरचे दर्शन घेतले. भरतीच्या वेळी सागरालाटांच्या तडाख्यांनी डोंगरकडयांवर निर्माण केलेली निसर्गशिल्पे हे एक हरि हरेश्वरच वैशिष्ट आहे. इथल्या समुद्गकिनार्‍यावरुन डॉल्फिनच्या एक मोठया थव्याचे दर्शन आम्हाला घडले. नंतर फेरीने बागमंडला - वेशवी पार करुन बाणकोटच्या हिंमतगडाच्या वाटेला लागालो. जलवाहतुकीच्या दृष्टीने बाणकोटचा हिंमतगड आणि खाडी याला पूर्वी विशेष महत्व होते. जमिनीच्या बाजूस असलेला खंदक आता बर्‍यापैकी बुजत चालला आहे. तटबंदी बरीचशी सुस्थितीत असून त्यावरुन किल्ल्याभोवती फिरता येते. येथुनच खालच्या बाजूस असलेले मॅलेट मेमोरीयल (स्मारक) दिसते. याचा संबंध सुध्दा थेट महाबळेश्र्वरशी आहे. आर्थर मॅलेटची पत्नी सोफीया व ऐलेन व्हैरिएट ही लहान मुलगी मुंबईहून समुद्गमार्गे महाबळेश्वरला सावित्री नदीच्या खाडीतून जात असताना बुडाली. त्यांची दफनभूमी म्हणजेच हे स्मारक. या दु:खद प्रसगांनंतर महाबळेश्र्वरला गेलेला आर्थर मॅलेट सावित्री नदीच्या उगमाशी उंच कडयावर जाऊन ' आपली प्रिय पत्नी व मुलगी याच नदीच्या दुसर्‍या टोकाशी चिरविश्रांती घेत आहेत ' या भावने ने एकांती बसत असे. तोच आजचा महाबळेश्र्वरचा 'आर्थर सीट पॉईंट'.

PR
नंतर वेळासच्या भैरी रामेश्वराला वंदन करुन आणि नाना फडणवीसांच्या स्मारकाला प्रणाम करुन आंजर्ल्यांचा कडयावरच्या गणपतीला जावून मनोभावे नमस्कार केला. येथून हर्णेबंदर आणि समुद्ग किनारा खुपच सुंदर दिसत होता. हर्णे बंदरावरील कणकदूर्ग आणि भूईकोट फतेहगड पाहिल्यानंतर समुद्गामध्ये ठामपणे उभा ठाकलेला, मरांठयाचे सरखेल आग्य्रांची राजधानी असलेला 'सुवर्णदूर्ग' पाहण्यास गेलो. जंजीरा इतकाच विस्तिर्ण पसरलेला, शाबूत तटबंदी असलेला तर काही ठिकाणी पडझड झालेला हा जलदूर्ग ऊन, वारा, पाणी यांना तोंड देत ठामपणे उभा आहे. तटबंदीतून थेट समुद्गाला मिळालेले वैशिष्टपूर्ण भूयार येथे पाहण्यास मिळाले. पाण्याचे मुबलक साठे असून त्यांचा वापर नसल्याने साठे खराब झाले आहेत. तसेच राबता नसल्याने माजलेले रान पाहून मन विषण्ण झाले. तेथून थेट दापोली मार्गे दाभोळच्या स्वयंभू चंडीकेच्या दर्शनास गेलो. दगडी गुहेतील वरदायीनी चंडीकेच्या दर्शनाने मन भारावून गेले. नंतर दाभोळ धोपावे फेरीने पार करुन रात्रीचा मुक्काम वेलदूरच्या नवानगर, रोहीलकरवाडी मधील राममंदीरात केला. नवानगरातील रोहीलकरांच्या आदरातिथ्याने तर आम्ही पुरते भारावुनच गेलो. रात्रीच्या जेवणाचे किती झाले असे विचारले असता सगळे चंबुगबाळे उचला असा सज्जड दमच सौ. रोहीलकर काकूंनी दिला. रात्री झोपताना श्री. नंदकुमार रोहीलकर, सरपंच यांच्या समवेत गप्पा मारताना एक नविनच इतिहास समोर आला. सर्व रोहीलकर मूळचे निंबाळकर, छ. शिवाजी महारांजासमवेत काही काळ कोकणात येवून रोहिल गावी राहू लागले. आणि जमिनीवरची बहादूरी समुद्गावर गाजवू लागले. कैक पिढ्यांपूर्वी वेलदूर येथे आले असता मत्स्यव्यवसाय चरितार्थासाठी स्वीकारुन निंबाळकरांचे रोहिलकर झाले.

तिसरा दिवस अंजनवेलच्या गोपाळगडाच्या वारीने सुरु झाला. बहुतेक सुस्थिती असलेल्या तथापि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला गोपाळगड पाहून वाईट वाटले. बेमुर्त राजकारणी आणि निष्क्रीय नोकरशहा पाहून कमालीची चीड आली. गोपाळगडावरुन समुद्गाचा नजारा विलोभनीय व सुंदर दिसतो. त्यानंतर वेळणेश्वराचे दर्शन घेवून हेदवीच्या दशभुजा गणेशाचे दर्शन घेतले. तेथून शास्त्री नदीच्या मुखावरील तवसाळ येथील विजयगड आणि पलिकडचा जयगड असे वैशिटयपूर्ण जोड किल्ले पाहिले. या जय विजय यांच्या नजरेतून शत्रूची जाहजे शास्त्री नदीत शिरु नयेत याची पूरेपूर काळजी घेतली गेली होती. जयगडची तटबंदी, खंदक, व्दार अजूनही भक्कम अवस्थेत आहे. जयगडनंतरच कर्‍हाटेश्र्वर हे नितांत सुंदर ठिकाण आहे. समोर खार्‍या पाण्याने भरलेला अथांग सागर असतानाही इथल्या गोमुखातून थंडगार गोड पाणी अहोरात्र वाहत असते.

तेथून गणपतीपुळयाच्या गणेशाला नमस्कार करुन रत्नागिरीच्या रत्नदुर्गावर पोहचलो. रत्नगदुर्गावरील भगवतीचे दर्शन घेतल्यानंतर भगवती बंदराचे मनोहर दर्शन करण्यासाठी काही वेळ रेंगाळलो. रात्रौ मुक्काम पावसच्या स्वामी स्वरुपानंद महाराज मठात केला.

भल्यापहाटे आन्हीक उरकून देवदर्शन घेवून पुर्णगडाच्या वाटेला लागलो. मुचकुंदी नदीच्या मुखावरील पूर्णगड अजूनही शाबूत आहे. महादरवाजातील दक्षिणाभूमूखी मारुतीचे दर्शन घेवूनच किल्यात प्रवेश केला. तेथून आडीवरे येथील महाकालीचे आणि एका मोठया वारुळाचे दर्शन घेतल्यानंतर यशवंतगड, आंबोळगड व गगनगिरी महाराजांचा आश्रम पाहिला. राजापूरच्या मुसाकाजी बंदराकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या यशवंतगडाचे प्रवेशद्वार मोडकळीस आलेले आहे. तसेच खाडीपर्यंत ठ्ठोलेली तटबंदी आजही मात्र शाबुत आहे. तथापि, आंबोळगडावर मात्र आस्ताव्यस्त पसरलेल्या वडाच्या झाडांच्या पारंब्याखेरीज काहीच उरलेले नाही. उरले आहे फक्त मोठमोठया दगडांचा ढिगारा. धावलवल्ली येथे गाडया नावेत ठेवून जैतापूर गाठले आणि जैतापूरहून दांडा अनुसर्‍याच्या धक्क्याला लागलो. पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे विविध कसरती करीत पाच बाइक बोटीत चढवल्या. तथापि, डुगडूगणार्‍या बोटीतून केलेला एक तासाचा प्रवास 'प्राण कंठाशी येणं म्हणजे काय ? ' ह्याचा अनुभव देणारा ठरला. विजयदूर्गच्या पायथ्याशी पुन: विविध कसरती करत बाईक उतराव्या लागल्या.

PR
शत्रुची जहाज बुडाशी आपटून त्यांचा खात्मा व्हावा यासाठी बांधलेली पाण्याखालची तटबंदी हे तर विजयदूर्गाच आवाक करायला लावणार आश्चर्य. शिलाहार राजा भोज याने तेराव्या शतकाच्या प्रारंभी निर्मिती केलेला हा किल्ला आजही कणखरपणे उभा आहे. वाघोटण खाडीच्या मुखाशी असलेला हा घेरीया किल्ला, सन 1663 मध्ये छ. शिवाजी महाराजानी त्याचा ताबा घेतला. घेरिया हे त्याचे नाव बदलून विजय संवत्सरात तो जिंकला म्हणून विजयदुर्ग असे त्याचे नामकरण केले. अजूनही उत्तम अवस्थेतील तटबंदी केवळ बघण्यासारखी आहे. गेली 800 वर्ष वार्‍या पावसाला तोंड देत ताठ मानेने उभा असलेला विजयदुर्ग गत वैभवाची साक्ष देत आहे. वाडयाच्या विमलेश्र्वराचे निसर्गसुंदर मंदिर पाहिले. मंदीराच्या (गुहेच्या) आतमध्येच वटवाघळांची वस्ती आहे. त्यानंतर देवगड खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी निर्मित केलेला देवगड-देवदुर्ग पाहिला. अजुनही चांगल्या अवस्थेतील तटबंदी, खंदक शाबुत आहेत. पश्चिमेकडील दिशेने दिसणारा अथांग सागर खूपच छान दिसतो. पश्चिमेकडील तटबंदी म्हणजे उभा काळा कातळच आहे. इथून कुणकेश्र्वर मंदिराकडे कूच केली. “कुणक” म्हणजे कळकाच्या बेटात स्वयंभू शंकराचे स्थान मिळाले म्हणून कुणकेश्र्वर. 11 व्या शतकात यादवांनी निर्मिती केलेल्या या मंदिराचा जिर्णोध्दार शिवरायांनी केला होता. कुणकेश्र्वराचा समुद्गकिनारा नितांत सुंदर आहे. संधी प्रकाशात कालावल खाडीच्या पश्चिमेकडे असलेला आचर्‍यातील भगवंतगड पाहिला. रात्रीचा मुक्काम मालवण येथे केला.

सुर्योदयाबरोबरच साळगावंकरांच्या जय गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर बोटीने सिंधुदुर्गावर धडक मारली. 1664 साली मालवण भेटीत कुरटे बेट शिवरायांच्या चाणाक्ष नजरेत भरले आणि 1667 साली शिशाचा पायासाठी वापर करुन दूर्ग उभारला आहे. शिवरायांचे मंदिर आणि पदचिन्ह असणार हे एकमेव ठिकाण. चाहूबाजूंनी समुद्गाने वेढलेल्या या किल्ल्यात गोड पाण्याची विहिर आहे. सिंधुदुर्गसमोरच असलेला पद्मकोट आणि नैसर्गिक पाषाणांच्या तटबंदीचा राजकोट यांचे दुरुन दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात बिळवसची सातेरीदेवी आणि आंगणेवाडीची भराडीदेवीचे दर्शन घेवून मोहिम विनासंकट पार पाडल्याबद्दल देवाचे आभार मानले. आदल्या दिवशी अंधार पडल्यामुळे पहायला न मिळालेला वाडीकर सावंताचा मसुरेगावातील भरतगड पाहिला. तसेच बेळणामार्गे येथील रामगड पाहून मोहिमेची सांगता केली. मुंबईकडील परतीचा प्रवास महामार्गा 17 वरुन केला.

मुंबई - मालवण ते परत मुंबई अशी ही आमची मोटरसायकल मोहिम एक धाडसी उपक्रम होता. पदोपदी कोकणातल्या साध्याभोळया शहाळांच्या काळजाच्या माणसांच सहकार्य लाभल. या मोहिमेतून सर्व कोकणाकिनारा फिरल्यावर जाणवल की कोकणचा कॅलिफोर्निया वगैरे करण्याची काही गरजच नाही. उलट त्यामध्ये आहे ते निसर्गनिर्मित सौंदर्यच नष्ट होण्याची शक्यता आहे.

कोकणप्रांती सिंधुकिनारी रम्य मनोहर गावे ।
वाटे त्यांच्या भेटीसाठी सदासर्वदा जावे ।