शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

अभेद्य 'लोहगड'

प्रमोद मा. मांडे

MH NewsMHNEWS
मुंबई रेल्वेमार्गावर कामशेत व लोणावळे यांच्यामध्ये मळवली रेल्वेस्थानक आहे. मळवली रेल्वे स्थानकापासून दक्षिणेला लोहगड हा बलदंड किल्ला आहे.या किल्ल्याला लागूनच काही अंतरावर विसापूरचा किल्ला आहे. त्यामुळे नेहमीच लोहगड विसापूर असाच उल्लेख नेहमी केला जातो. मळवली स्थानकापासून दक्षिणेला दोन कि.मी. अंतरावर भाजे गाव आहे. या गावातून विसापूर तसेच लोहगडाकडे जाणारा रस्ता आहे.

भाजेगावातून लोहगडाकडे निघाल्यावर डाव्या हाताला विसापूर किल्ला तर समोर लोहगड दृष्टिक्षेपास येतो. विसापूर आणि लोहगड यांना जोडणार्‍या भल्यामोठ्या खिंडीतून लोहगडाकडे जाणारा रस्ता आहे. पर्यटकांची नेहमीच गर्दी असल्यामुळे ही पायवाट चांगलीच रुंद बनली आहे. या वाटेने लोहगड किल्ल्याच्या पदरामधील लोहगडवाडी येथे पोहोचण्यास सुमारे तासभराचा कालावधी लागतो.

या वाडीमध्ये चहा-फराळाची उत्तम सोय आहे. येथील पवनाधरणाजवळील काळे कॉलनी येथूनही एक पायवाट जाते. याठिकाणी येण्यासाठी लोणावळ्यातूनही एक कच्चा वाहनमार्ग आहे. वाडी सोडताच लोहगडाची उभी चढण सूरु होते. लोहगड किल्ल्यावर चढण्यासाठी हाच एक उत्तम आणि एकवेक मार्ग आहे. लष्करीदृष्ट्या सक्षम रचना आपल्याला इतरत्र आढळत नाही. या मार्गावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा आहे.

हनुमान दरवाजा प्राचिन आहे. बाकीचे तिनही दरवाजे व पायर्‍यांचे मार्ग हे पेशवाईमध्ये नाना फडणिस यांनी बांधले आहेत. याबाबत एक कथाही सांगितली जाते. गणेशदरवाजा भक्कम करण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला बलदंड बुरुज बांधणे आवश्यक होते. बुरुजांचे बांधकाम केले की, ते सारखे ढासळत असे, वारंवार असे झाल्यामुळे कामगारही अचंबित झाले. ही वार्ता नाना फडणिस यांच्या कानावर गेली. नेमके त्याचवेळी नानांच्या स्वप्नात एक पुरुष आला एका नवदांपत्याचा बळी दिल्यास बांधकाम पुर्णत्वास जाईल असे त्याने सांगितले. नानांनी तो साक्षात्कार मानला आणि कार्यवाही सूरु केली. साबळे नावाच्या माणसाने आपल्या मुलाला व सुनेला बळी देण्यासाठी तयार केले. या दोन जिवांच्या उरावर हे दोन्ही बुरुज आज मस्तवालपणे दिमाखात उभे असल्याचे आपल्याला दिसतात. पुढे नानांनी लोहगडवाडीची पाटीलकी साबळे यांना बहाल केल्याचा उल्लेख आहे.

गणेश दरवाजातून आत गेल्यावर तटाला लागूनच गोलाकार वाट आहे. येथून पुढे नारायण आणि हनुमान दरवाजा आहे. या दरवाजामधील भुयारांमध्ये पूर्वी धान्य साठवून ठेवले जात असे. सर्वात वरच्या महाव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर तेथे एक घुमट आहे. त्यात कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्या मुलीची आहे, असे सांगितले जाते पण, याला ऐतिहासिक पुरावा नाही. याच्याच उजव्या बाजूस गुहा आहेत. जवळ पाणी आणि थोडे पुढे गेल्यावर पठार आहे. या पठारावरील कबर शेख उमर या अवलीयाची असल्याचे सांगितले जाते. टेकडीच्या वरच्या बाजूला पाण्याचे तळे आहे. या तळ्यात संपत्ती लपवली, असावी या संशयाने इंग्रजांनी हे तळे फोडले.

गडाच्या पश्चिमेला अतिशय देखणी माची आहे. तिला विंचूकाटा असे म्हणतात. डोंगराचा सुळका पुढे गेलेला आहे आणि तिला दोन्ही बाजूने तटबंदीकरुन बंदिस्त केले आहे. विंचूकाट्यावर जाण्यासाठी थोडे खाली उतरावे लागते. थोडे नागमोडी जात आपण टोकावर पोहचू शकतो. या माचीवर पाण्याचे टाके आहे. विंचूकाटा टोकाला काही जण कडेलोट असेही म्हणतात. ही माची पाहून आपण परत फिरुन गडाच्या सर्वोच्य माथ्यावर येतो. येथून आपल्याला विस्तृत प्रदेश पहायला मिळतो. येथून विसापूर, भातराशी, तुंग, तिकोणा, कोरीगड, मोरधन, सिंहगड, तोरणा, रायगड आपल्याला पहाता येतात. पवनाधरणाच्या परिसराचे उत्तम दर्शन येथून होते.

लोहगड हा प्राचिन दुर्ग आहे. तो नेमका कोणी बांधला हे आजही कोणास ज्ञात नाही. बहमनी आदिलशाही नंतर हा किल्ला शिवशाहीमधे आला. महाराजांनी सुरतेवर छापा मारुन जी संपत्ती गोळा केली ती सर्व संपत्ती प्रथम लोहगडावर आली व नंतर ती राजगडाकडे रवाना झाली. पुढे हा किल्ला तहामधे मोगलांना द्यावा लागला. पुढे तो पुन्हा स्वराज्यात सामिल झाला. महाराजांच्या मृत्युनंतर तो पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे कान्होजी आंग्रे यांनी त्यावर ताबा मिळवला. १८१८ मध्ये तो इंग्रजांनी जिंकला आणि त्यावर काही काळ शिबंदी ठेवली होती.

नाणेमावळ आणि पवनमावळावर प्रभुत्व गाजवणार्‍या लोहगडाची मुशाफिरी मनाला आनंद देवून जाते. विंचूकाटयाची भेदकता आणि दरवाजांचा सर्पाकृती मार्ग नजरेत साठवतच आपण गड उतरायला सुरवात करतो.


महान्यूजकडून साभार...