गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

आकाशी पहा अग्निपंखांची नक्षी...

WD
प्लेमिंगोला मराठीत रोहित पक्षी, अग्निपंख असेही म्हटले जाते. या पक्षांच्या चार जाती आहेत. भारतात ग्लेटर प्लेमिंगो या जातीचे लाखो पक्षी स्थलांतरित होतात. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातून हे पक्षी भारतात येतात आणि विस्तारतात. सुमारे दोन ते तीन महिन्यांचा त्यांचा मुक्काम असतो. या वैशिष्ट्यपूर्ण पक्षांच्या मुक्कामाची जागाही विशिष्ट असते. आकाराने मोठे असणा-या या पक्षांचे खाद्य मात्र, लहान कीटक, जलपर्णी असते. म्हणूनच ज्या पाणवठ्यावर त्यांची आवडती जलपणीँ आणि कीटक आहेत त्याचठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. हे पक्षी उंच असले तरी भक्ष्य शोधण्यासाठी म्हणून उथळ पाण्यामध्येच त्यांचे थवेच्या दिसून येतात.

स्थलांतरापूर्वी हे पक्षी चोख नियोजन करतात. सुरुवातीस पायलेट पक्षी पाहणी करण्यासाठी निघून जातात आणि जागा निश्चित करतात. त्यानंतर थव्या थव्याने पक्षांचे संमेलनच भरते. धोका जाणवल्यास लगेचच दुस-या तलावावर निघून जाण्यासाठी म्हणून आसपास अनेक तलाव असणा-या भागातच ते मुक्काम करतात. निळ्याशार पाण्यामध्ये पांढ-या आणि गुलाबी छटा असलेल्या या पक्षांचा थवा पाहताना मन भरून येते. या पक्षांची उंची चार ते पाच फूट असते. लांबलचक गुलाबी पाय, पांढ-याशुभ्र पंखाच्या खाली भडक काळी-गुलाबी छटा, उंच मान आणि अणकुचीदार चोच यामुळे हे पक्षी देखणे दिसतात. सूर्योदयापूर्वी या पक्षांचे थवे तलावावर दाखल होतात आणि खाद्य शोधण्याची लगबग सुरू होते. एकमेकांना मानेने ढुशा देत, चिखलात चोच रुतवून ते खाद्य मिळवतात. यावेळी क्व्रा..., क्व्रा.. अशा आवाजाचा गलका करत भक्ष्य पकडणा-या प्लेमिंगोचे दृश्य पाहण्याजोगे असते. उन्ह पडल्यानंतर ते पाण्यातच आराम करतात. ते आपली उंच मान दुमडून पंखांच्या खाली खोचतात. हजारो पक्षी मान खाली घालून नतमस्तक झाल्यासारखेच वाटते. दिवसभर मौज-मस्तीनंतर सूर्यास्तावेळी पुन्हा पक्षी हवेत झेपावतात. एका मागोमाग एक असा शिस्तबध्द उडणा-या या पक्षांचा हा थवा थक्क करणारा असतो.

मुंबईतील शिवणी, ठाण्याची खाडी, एरोली, उरण त्याचबरोबर मायणी, कातरखटाव, रंकाळा आदीं तलावांमध्ये प्लेमिंगोंचे दर्शन घडते. कच्छचे रण हे त्यांच्या विणीच्या हंगामासाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. विणीच्या हंगामात हे पक्षी समुद्राकाठीच घरटी करतात. अंड्यातून बाहेर पडणारी राखाडी रंगाची पिले जन्मजात पोहण्यात तरबेज असतात. त्यांना उडता येऊ लागल्यावर हजारो पक्षांचे थवे परतीच्या प्रवासासाठी आकाशात झेपावतात.

पक्षांचे निरीक्षण कसे कराल -
निरीक्षणासाठी दुर्बिण आणि आवश्यक असल्यास चांगल्या दर्जाचा कॅमेरा बरोबर घ्यावा. पांढरे अथवा भडक रंगाचे कपडे घालू नयेत. बहुतेक करून लोकवस्तीपासून दूर असणा-या तलावावरच या पक्षांचा रहिवास असतो. माणसांची चाहून लागताच ते सतर्क होतात आणि थवा उडून जातो. या पक्षांच्या शिकारीचे प्रमाण वाढले असल्याने या पक्षांची संध्याही कमी होत आहे. धोका टाळण्यासाठी तलावाच्या मधोमध त्यांचा थवा उतरतो. त्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी जेणेकरून त्यांना आपल्या उपस्थितीची चाहून लागू नये अशा दृष्टीने तलावाकाठी मचाण तयार करून घ्यावे. मोठा आवाज होऊ नये याची काळजी घ्यावी. दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांचे ‍निरीक्षण करावे.