शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

ऐतिहासिक ठेवा अवचित गड!

प्रमोद मा. मांडे

MH News
MHNEWS
रायगड जिल्ह्यामध्ये रोहे तालुका आहे. रोहे हे तालुक्याचे गाव असून कुंडलिका नदीच्या तीरावर बसलेले आहे. रोहे हे मुंबई-पणजी महामार्गाच्या पश्चिमेला असून पुणे मुंबईशी गाडीमार्गाने जोडलेले आहे. मुंबई -पणजी मार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे येथे जाता येते.

नागोठणे कडे जाणार्‍या गाडीरस्त्यावर साधारण ५ कि.मी. अंतरावर पिंगळसई गाव आहे तसचे ६ कि.मी. अंतरावर मेढा गाव असून ही दोन्ही गावे अवचितगड किल्ल्याच्या पायथ्याला वसलेली आहेत.

रोहे येथून अथवा नागोठणे येथून खाजगी वाहनातूनही पिंगळसई अथवा मेढापर्यंत पोहोचता येते. मेढा येथून गडावर जाणारी पायवाट ही चांगली रुळलेली आहे. या वाटेने तासाभरात आपण गडावर पोहोचू शकतो. समुद्र सपाटीपासून ३९४ मी. उंच असलेला अवचितगड पूर्वेकडून डोंगराशी जोडलेला आहे तसेच पश्चिमेकडे याचे कडे असल्यामुळे तिकडून तो अभेद्य पूर्व बाजूनेच गडावर पोहोचतात.

अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते. पुढे निजामशाहीच्या राजवटीमध्ये हे सुभ्याचे ठिकाण म्हणून वापरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवचितपणे येवून हा किल्ला ताब्यात घेतला. म्हणून याला अवचितगड असे नाव मिळाले असे म्हणतात. पण याचे पूर्वीचे नाव काय होते ते मात्र कळत नाही. मोसे खोर्‍यातील बाजी पासलकर यांचा संबंध या किल्ल्याशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यावर याची लष्करीदृष्ट्या पुर्नबांधणी केली. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने याने हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये जिंकून घेतला.

लांबुळक्या आकाराचा अवचितगड तटबंदी आणि बुरुजांनी परिवेष्टीत आहे. या भक्कम तटबंदीच्या आत पाण्याच्या टाक्यांचा समुह असून, एक उत्तम बांधणीचा तलाव आहे. गडावर पासलकरांची घुमटी आहे. गडावर महादेव मंदिर, दिपमाळ, गणपती, पार्वती, विष्णू यांच्या स्थानांबरोबर दक्षिणेकडील बुरुजावर शिलालेख ही पहायला मिळतो.

गडाच्या माथ्यावरुन कुंडलिका खोर्‍याचे तसेच कोकण रेल्वेचे दृष्य उत्तम दिसते. सूरगडाचेही दर्शन होते. अवचितगडावरुन पिंगळसईच्या मार्गाने उतरुन गावातील गणेश मंदिर पाहून रोहेकडे जाता येते.

(महान्यूज)