गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

निसर्गरम्य काळेश्वर

-डॉ.किरण मोघे

MH News
MHNEWS
श्रीक्षेत्र काळेश्वर..नांदेड शहराला लागून असलेले शांत निवांत तिर्थक्षेत्र...दीड वर्षानंतर या परिसराला रविवारी भेट देत होतो. इथल्या निसर्गाचे आकर्षण मला पुर्वीपासूनच होते. नांदेडला माहिती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतांना अनेकदा या ठिकाणाला भेट दिली होती. आजही तीच शांतता अनुभवण्यासाठी काळेश्वरला जात होतो.

नांदेडला चार दिवसापासून पावसाच्या सरी अधूनमधून बरसत आहेत. पावसाने बर्‍याच काळ दडी मारल्याने वातावरणातील हा 'ओलावा' सर्वांना सुखावणारा असाच आहे. पावसाचा हा आनंद बळीराजासह संपूर्ण सृष्टीला झाल्याचे परिसरातील हिरव्या सृष्टीच्या दर्शनाने जाणवले. त्यातच सकाळची वेळ..आकाशात ढग दाटलेले..अन् मंद गार वार्‍याचा हळूवार स्पर्श..यामुळे सृष्टीतला हा उत्साह शरीरात संचारल्यागत झाले.

श्री सचखंड साहिबचे दर्शन घेवून जुन्या मोंढ्यातील टॉवरला वळसा घालीत गोदावरीवरील जुन्या पूलावर पोहचलो. हिरव्यागार तटामधील गोदामाईचे पात्र आणि तटावरील गुरुद्वार आणि मंदिरांचे मनोहारी दृष्य पाहून काही काळ त्याच ठिकाणी थांबावेसे वाटले. या गोदातटाला धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्व आहे. पुलावरुन पुढे जात विद्यापीठाच्या रस्त्याला (पुणे रोड) लागलो. सभोवतालची माना टाकलेली पिके पुन्हा नव्या उमेदीने उभी राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिसरातील शिवारात दिसत होते. सृष्टीने तर जणू हिरवा शालू पांघरला होता.

अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ गाडी येताच उजव्या बाजूला भव्य कमान दिसली. कमानीवर श्रीक्षेत्र काळेश्वर असे नाव कोरलेले आह. कमानिवरील नक्षीकामही अत्यंत आकर्षक असेच आहे. वरच्या बाजूस शंकर-पार्वतीची मूर्ती आणि स्तंभावर इतर देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. कमानितून जाणार्‍या रस्त्यावरून गाडी पुढे गेली. बाजूच्या असलेल्या घरांमधील मोकळ्या जागेतून विष्णूपूरी प्रकल्पाचा बंधारा दिसू लागला. या कमानितून मंदीरापर्यंत पोहोचण्यास केवळ दोन ते तीन मिनिटे लागतात. जातांना श्री लक्ष्मी नृसिंह मंदीराचे दर्शन घेतले.

काळेश्वर मंदिरापाशी येताच अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाले. समोरच विस्तीर्ण शंकरसागर जलाशय, हिरव्यागार टेकड्यांमधून वळसा घालून येणारी गोदामाई, दाट वनराई, जलाशयातून मधूनच चमकणारी सुर्य किरणे... केवळ अद्भूत असेच या दृष्याचे वर्णन करता येईल. ते पाहतांना 'हिरवे हिरवे गार गालिचे, अथांग पाणी निळे...' या ओळी आठवल्या. वेळ केवळ सकाळची होती इतकाच काय तो फरक. हे सौंदर्य डोळ्यात साठवित मंदीराकडे गेलो.

मंदिर अत्यंत प्राचीन आहे. त्याच्या उभारणीचे संदर्भ मध्ययुगातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर यादवकालीन कलेचा अप्रतिम नमुना आहे. मुळ मंदीर १३ व्या शताकतील असून २० व्या शतकात त्याचा जिर्णोध्दार करण्यात आला. त्याबाबतच्य़ा पुराणकाळातील कथाही येथे प्रचलित आहेत. इंद्राचे राज्य अन्य इंद्ररुपी पुरुषाने बळकावल्यानंतर इंद्रदेव विष्णूला शरण गेले. श्री विष्णूने त्यांना गीतेच्या अठराव्या अध्यायाचे महत्त्व सांगितले. तेव्हा इंद्राने त्यावेळच्या कालिका नगरीत श्री काळेश्वराची आराधना करीत अठराव्या अध्यायाचे पठण केले आणि त्याला दिव्यलोकाची प्राप्ती झाली. अशी कथा याठिकाणी सांगितली जाते.

मंदिराच्या मुळ गाभार्‍याभोवती मोठा सभामंडप आहे. त्यात सुंदर नक्षीकामाने घडविलेला नंदी प्रवेशद्वारासमोर आहे. आत गेल्यावर प्रार्थनेसाठी बसण्याची मोकळी जागा आहे आणि त्यापलिकडे मुख्य गाभारा. गाभार्‍याच्या अरुंद दारातून खाली उतरून गेल्यावर श्री काळेश्वरांची नाग धारण केलेली पिंड दृष्टीपथास येते. या पिंडीखाली आणखी एक पिंड असल्याचे सांगितले जाते. काळेश्वराचे दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणामार्गावरून पुढे जातांना जलाशयाच्या बाजूने येणारा गार वारा आणि समोरील हिरवा निसर्ग भाविकांना आनंदाचा अनुभव देतो. मुख्य मंदिरांवर जुन्या काळातील कोरीव काम आहे. जलाशयापर्यंत उतरायला दगडी पायर्‍या आहेत. त्याच्या बाजूस घाटही बांधण्यात आला आहे. भाविक श्रध्देने इथे स्नान करतात.

मंदिराभोवती सर्वत्र पाणी आणि हिरवी वृक्षराजी दिसते. पलिकडे टेकाड्यावर जुने विष्णुपूरी गाव वसलेले आहे. तर जलाशयाच्या सांडव्याजवळ एक गुरुद्वारही आहे. शहराच्या गजबजाटातून या ठिकाणी आल्यावर चित्त शांत आणि मन प्रसन्न होते. सोबत असतो तो केवळ निसर्ग, आनंद देणारा..उत्साह वाढविणारा. त्यासोबतच निर्मलता, गतीचा संदेश देत अनेकांना सुखावणारी गोदामाई!