गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

विजयदुर्गखालील भिंत प्रथमच दृष्यरुपात

PR
शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन्ही सागरी किल्ल्यांचे बांधकाम हे स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते. हे दोन्ही किल्ले पर्यटनप्रेमींचे खास जिव्हाळयाचे तर आहेतच परंतु इतिहासप्रेमींना आणि बांधकामतज्ञांना पडलेले ते एक कोडे आहे. असेच एक कोडे विजयदुर्गच्या खाली असलेल्या दगडी भिंतीबाबत अनेक इतिहासकांना पडले आहे. विजयदुर्ग किल्ल्याजवळच्या वाघोटन खाडीत पाण्याखाली असलेल्या शिवकालीन भिंतींची तज्ञांनी नोंदवलेली नोंद आजवर केवळ ग्रंथांमध्येच माहितीच्या रुपात सिमित होती. चित्रफित किंवा दृश्यरुपात त्या भिंती आता प्रथमच लोकांसमोर येत असून झी मराठीवरील 'बजाज डिस्कव्हर महाराष्ट्र' या कार्यक्रमाअंतर्गत या समुद्राखालील भिंतीचे चित्रीकरण करुन त्या लोकांसमोर आणल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात समुद्राखालील या भिंतींचे प्रथमच हाती लागलेले छायांकन हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल.

राष्ट्रीय सागरी संशोधन संस्था आणि नौसेना यांच्या द्वारे केलेल्या संशोधनात या भिंतींचा अभ्यास केला, तेव्हा विजयदुर्ग हा किल्ला शिलाहारांच्या साम्राज्याच्या काळात राजा भोजने बांधलेला असल्याचे निष्पन्न झाले. पुढे तो किल्ला विविध साम्राज्याचा भाग होत शिवकालाशी जोडला गेला. या किल्ल्याचे मूळ नाव घेरिया असे होते आणि मराठा साम्राज्याशी या किल्ल्याचा संबंध जोडला गेल्यावर ‍शिवाजी महाराजांनी त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. विजयदुर्गवर मराठा साम्राज्याच्या नाविक दलाचे मुख्य केंद्र होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याभोवती तिहेरी तटबंदी उभारली. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या आणि युरोपियन सत्तांना या किल्ल्याने चीत केले. युध्दकाळात युरोपियन बनावटीच्या नौका इथल्या समुद्रात फुटून बुडाल्या. हे असं का होतं याचा शोध घेतला गेला तेव्हा किल्ल्याच्या पश्चिमेला पाण्याखाली भक्कम दगडी बांधकाम असल्याचे निष्पन्न झाले. सागरी संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात लहान मोठे दगड एकमेकांवर अडकवून केलेली एक दगडी रचना आढळली. त्यांच्या अहवालातही ही भिंत मराठा कालीन असून त्याचा हेतू शत्रूंची जहाजे बुडवणे हाच होता, अशी नोंद आहे. या भिंतीची पाण्याखालील बांधणी हा त्या काळातील प्रगत स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.

PR
लॉजिकल थिंकर्सची निर्मिती असलेल्या 'बजाज डिस्कव्हर महाराष्ट्र' या झी मराठीवरील कार्यक्रमाचे दिग्दर्शन संतोष कोल्हे करत असून निवेदन मिलिंद गुणाजी करत आहेत. या कार्यक्रमात आत्तापर्यंत निसर्गसंपन्न महाराष्ट्रातील विविध दुर्गम पर्यटन स्थळांबरोबरच अनेक ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठवडयात सिंधुदुर्ग जिल्हयातील सागरी जीवसृष्टीचे विहंगम चित्रण पाहण्याचा योग मराठी प्रेक्षकांना प्रथमच लाभला. या आठवडयात शिवकालापूर्वीचा ऐतिहासिक दुर्मिळ ऐवज असलेली आणि इतिहासप्रेमी तसेच सागरी संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय असलेली ही समुद्राखालील भिंत प्रथमच प्रेक्षकांना पाहता येणार आहे, येत्या शनिवारी ८ मे रोजी रात्री साडे दहा वाजता! स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षक आणि प्रसिध्द सागरी जीव संशोधक सारंग कुलकर्णी यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने ही अजस्त्र भिंत पहिल्यांदाच चित्रीत केली असून महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सागरी जीव संशोधन संस्थेने दिलेली ही खास भेट झी मराठीच्या प्रेक्षकांना खास पर्वणी ठरणार आहे.