शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2015 (15:54 IST)

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग

vijay durga
विजयदुर्ग हा शिवकालीन अभेद्य किल्ला आहे. याची साक्ष पटवणार्‍या अनेक खुणा आजही इथे सापडतात. हा किल्ला पाहताना क्षणोक्षणी मन नतमस्तक होते ते शिवरांच्या दूरदृष्टीला आणि या किल्ल्याच्या स्थापत्य शैलीला!
 
शिवरायांनी संरक्षण आणि व्यापाराच्या दृष्टीने या सागरी किल्ल्यांचं महत्त्व जाणलं आणि काही सागरी दुर्गाची नव्याने उभारणी केली. शिवाय काहींची पुनर्बाधणी केली. 
 
या किल्ल्याला तीन बाजूंनी सागरानं संरक्षण दिलं आहे. एका दिशेने जमिनीवरून प्रवेशमार्ग आहे. किल्ल्याकडे निघताच समोर गोमुखी शैलीचा हणमंत दरवाजा आहे. आत जाताच डाव्या बाजूला हनुमंताचं सुंदर देवालय दृष्टीला पडते. अप्रतिम बांधकाम असलेल बुरूजांनी युक्त  दुसरं प्रवेशद्वार आहे. 
 
या परिसराची स्थापत्यशैली प्रशंसनीय आहे. उजवीकडे महाद्वारापर्यंत भक्कम तटबंदी आहे. डावीकडे उंच असा तट आहे. या ठिकाणी तोफा  ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली आहे. इतिहासावरून असे दिसून येते की शिवरायांनी प्रत्यक्ष हजर राहून याची पुनर्बाधणी करवून घेतली आहे. इथल्या प्रत्येक वास्तुत शिवरायांच्या आठवणी दडलेल्या आहेत. 
 
महाद्वारातून आत गेल्यावर प्रत्यक्ष किल्ल्याला सुरुवात होते. पुढे देवडय़ाचं बांधकाम, डावीकडे तोफ आणि उजवीकडे शिवरायांचा पुतळा आहे. पुढे मोकळ अंगणात हवेशीर कोठार आणि इतर उपयोगी बांधकाम आहे. थोडे पुढे गेल्यावर एका भक्कम बुरुजावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. 
 
vijay durga 1
काही अंतर पुढे गेल्यावर सदर, दारू कोठार, शस्त्रागार, धान्य कोठार आणि इतर उपयोगी बांधकाम आहे. या शिवाय राजवाडा, भवानी मातेचं मंदिर, जखिण्याची तोफ, अवाढव्य असा खुबलढा बुरुज, घनची बुरुज, भुयारी मार्ग, घोडय़ांचा पागा, निशाण काठीची छोटी टेकडी दिसते. 
 
गोविंद, मनरंजन, गगन, शिवाजी, सर्जा, व्यंकट, शाह, दर्या, सिखरा, तुटका, वेताळ इत्यादी 27 बुरुज विजय दुर्गाच्या भक्कमतेची साक्ष देतात. युद्धासाठी उपुक्त अशी दूरगामी स्थापत्यशैली पाहताना मती गुंग होते. विजयदुर्ग किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगड आणि विटांच्या सहाय्याने केलेले आढळते. 
 
समुद्राच्या अविरत लाटांपासून आणि शत्रूच्या तोफ्यांच्या मार्‍यापासून संरक्षण व्हावे म्हणून या दुर्गाची तटबंदी साधारण 20 फूट जाडीची आढळते.
 
म. अ. खाडिलकर