मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

श्री क्षेत्र कुणकेश्वर

कोकणात श्रद्धास्थानाची कमी नाही. गणपतीपुळे, पावस, पाली यासारख्या देवळांबरोबरच देवगड जवळील दक्षिणकाशी समजले जाणारे श्रीक्षेत्र कुणकेश्वर हे देखील प्रसिद्ध मंदीर आहे .

MHNEWS
















देवगडच्या दक्षिणेस २० कि.मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनार्‍यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असे स्थानिक लोक सांगतात. या मंदिराचे संपूर्ण काम अत्यंत कलात्मक असे आहे. अनेक वर्षे भाविक श्रद्धेने या मंदिराला भेट देत असतात.

या मंदिराविषयी एक दंतकथा सांगितली जाते. कोणे एके काळी एक अरबी व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनार्‍यावरुन जात होता. सारे काही सुरळीत आहे असे वाटत असतानाच अकस्मात मोठे वादळ सुरु झाले. पाहता पाहता काही दिसेनासे झाले. या वादळात त्याचे गलबत कोठे भरकटले ते समजण्यास काहीच मार्ग नव्हता. या भरकटलेल्या जहाजाला थांबविण्यासाठी कोठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेवू लागला. याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्याने आपले गलबत महत्प्रयासाने हाकारले. घोंघावणार्‍या वादळातही न विझता त्या व्यापार्‍याला सुखरुप किनार्‍यावर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातील पणती होती. यामुळे कृतज्ञतेपोटी त्या व्यापार्‍याने यानंतर या ठिकाणी मंदिराची उभारणी केली. मंदिराच्या बाजुलाच एक कबरही आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा एक आदर्श नमुना आहे.

कुणकेश्वराचे मंदीर कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथील शंकराची पिंड भव्यदिव्य असून ती निसर्गनिर्मित आहे, असे सांगितले जाते. श्रावणात दूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी येतात. कोकण दौर्‍यात फिरताना सहजपणे कुणकेश्वराचे दर्शन अवश्य घ्या.

स्त्रोत : महान्यूज