गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

हिलस्टेशन... महाबळेश्वर

MH News
MHNEWS
पश्चिम घाटातल्या सह्याद्रीच्या रांगांत वसलेलं महाबळेश्वर... नजर आकर्षित करणार्‍या हिरव्यागार पर्वतरांगा...श्वास रोखावयास लावणार्‍या दर्‍या...मन मोहून टाकणारी विविध रंगांची फुलं... यासोबतच थंडगार व आल्हाददायक हवेमुळे हे हिलस्टेशन पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं...

महाबळेश्वर या मंदिराच्या नावामुळेच या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडलं असावं. ब्रिटीश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी महाबळेश्वरला होती, त्यावरुन या हिलस्टेशनचं महत्त्व अधोरेखित होतं. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लैकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून 1 हजार 372 मीटर उंचीवर सहयाद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी घनदाट वनश्रीची मुक्त उधळण झाली आहे. महाबळेश्वर मंदिर त्याला लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

MH News
MHNEWS
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा- लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंटस् पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. महाबळेश्वराच्या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. त्यामुळे हा परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असे सांगितले जाते. येथील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळं, लाल रंगाचे मुळे प्रसिध्द आहेत. महाबळेश्वरचे मध खूपच चविष्ट आणि प्रसिध्द आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सहवासाबरोबरच रानमेव्याचा देखील चांगलाच लाभ घेता येतो.

महाबळेश्वर दर्शन करताना निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी वेण्णा तलावाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे. बोटिंग, मासेमारीबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात राहून तिथल्या एन्टरटेनमेन्ट सेंटरमधले विविध प्रकारचे स्टॉल्स, खेळ पर्यटकांना वेगळाच आनंद देतात. यासोबत विविध पॉईंटस् महत्वाचे आहेत. त्यात माऊंट माल्कम (1829 मध्ये बांधलेली ही एक प्राचीन वास्तू आहे. गव्हर्नर माल्कम यांचं निवासस्थान असलेली ही वास्तू प्रेक्षणीय आहे) मोरारजी कॅसल (1945 मध्ये महात्मा गांधी इथं काही काळ राहिले होते), एलिफंट्स हेड (6 कि.मी), एलफिस्टन पॉईंट (10 कि.मी.), हेलन्स पॉईंट, हंटर पॉईंट (4 कि.मी.), केट्स पॉईंट (7 कि.मी.), लिंगमाला वॉटरफॉल्स् (6 कि.मी.),लॉडविक पॉईंट (5 कि.मी.), मारजोरी पॉईंट (10 कि.मी.), विल्सन पॉईंट, ओल्ड महाबळेश्वर (5 कि.मी) ,आर्थर सीट ( 12 किमी.), बॉबिंगटन पाँईंट ( 3 किमी.), बॉम्बे पाँईंट ( 3 किमी.) ,कॅनॉट पीक, चीनामानस वॉटर फॉल्स, धोबी वॉटर फॉल आदींचा समावेश आहे.
(महान्यूज)