शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग

ShrutiWD
ठरवता एक आणि घडते दुसरेच असे कुणाच्या आयुष्यात घडत नाही? पण यासाठी तुम्ही ग्रहांना जबाबदार धराल? काही जण म्हणतील हा सगळा मुर्खपणा आहे. पण काहीजण मात्र यावर ठामपणे विश्वास ठेवतील. तर असे हे अनिष्ट घडवून आणणारे ग्रह तुमच्या कुंडलीत येऊन बसले की त्याला कालसर्प योग असे म्हणतात. आणि या ग्रहांना शांत करण्यासाठी म्हणे कालसर्पाची शांती करावी लागते. श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात याचाच शोध घेण्याचे ठरविले. त्यासाठी नाशिकजवळचे त्र्यंबकेश्वर गाठले.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आता ज्योतिर्लिंगापेक्षाही कालसर्पयोग शांती, नारायण नागबली यांच्या पूजेसाठी जास्त प्रसिद्ध झाले आहे. हजारो लोक येथे कालसर्प शांतीसाठी येतात. म्हणूनच मीही तेथे गेले. नाशिकला पोहोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरसाठी वाहनाची शोधाशोध सुरू होती. तेव्हा एका टॅक्सीवाल्याने त्र्यंबकेश्वरला येण्याची तयारी दर्शवली.

गणपत नावाचा हा टॅक्सी चालक चांगलाच बोलका होता. टॅक्सी
ShrutiWD
त्र्यंबकेश्वरच्या दिशेने धावू लागताच, त्याने बोलायला सुरवात केली. कुणाकडे जायचंय, पासून सुरू झालेली चर्चा अनपेक्षितपणे कालसर्प योगापर्यंत गेल्यानंतर त्याची कळी खुलली. मग त्याने माझीच उलटतपासणी घ्यायला सुरवात केली. तुम्हाला काय अडचण आहे? पूजा करायचीय का? कालसर्प योग शांती करायची की नारायण नागबली? अशी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. एवढे विचारूनही तो थांबला नाही. येथील कुणी भिक्षुक (ब्राह्मण) माहिती नसल्यास माझ्या परिचयातील एक भिक्षुक आहेत. ते सगळं व्यवस्थित करतील. त्याने अगदी विश्वासाने सांगितलं.

त्याच्याशी बोलताना त्र्यंबकेश्वरला रोज शेकडो लोक कालसर्प योगापासून सुटका करण्यासाठी येत असल्याचे कळले. याविषयीची इतर रंजक माहितीही त्याच्याकडून समजली. बोलता बोलता आमची गाडी त्र्यंबकेश्वरमध्ये कधी आली ते कळलेच नाही. गावात शिरताच महामृत्युंजय जप, शिवस्तुतीच्या आवाजाने आसमंत भारून गेला होता. सुरवातीला येथील पवित्र कुशावर्त कुंडावर गेले. तेथे भाविकांची चांगलीच गर्दी होती. स्नानानंतर सर्वजण अंगाभोवती पांढरे वस्त्र गुंडाळत होते. नारायण नागबली किंवा कालसर्प योगासाठी शुभ्र वस्त्रच आवश्यक असते, असे चर्चेत कळले होते. त्यामुळे हे सर्व त्यासाठीच येथे आल्याचे जाणवत होते.

ShrutiWD
यासंदर्भात खाडे नावाच्या एका कुटुंबाशीच बोलले. हे कुटुंबीय यवतमाळहून कालसर्प पूजेसाठीच आले होते. कुटुंबप्रमुख सुरेशचंद्र खाडे यांच्याशी बोलले तेव्हा समजले, की त्यांची मुलगी श्वेताचे लग्नच होत नाहीये. ब्राह्मणाला विचारले तर तो म्हणतो, की तिच्या कुंडलीतील कालसर्प दोषाचे निवारण होईपर्यंत तिचे लग्न जुळणार नाही. श्वेताची आई किरण यांनी सांगितले, की त्यांच्या परिचितांपैकी एका मुलाच्या कुंडलीतही कालसर्प दोष होता. त्यामुळे त्याचेही लग्न होत नव्हते. त्यांनी पूजा केल्यानंतर मात्र हा दोष दूर झाला आणि त्याचे लग्नही झाले.खाडे कुटुंबीयांसारखी अनेक कुटुंबे येथे कालसर्प दोष निवारणासाठी येतात. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षतांचे प्रमाण मोठे होते. किंबहूना त्यांचीच संख्या जास्त होती.

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा


ShrutiWD
कालसर्पयोग म्हणजे तरी काय हे जाणून घेण्यासाठी येथील भिक्षुक कमलाकर अकोलकर यांच्याशी संपर्क साधला. अकोलकर स्वतः कालसर्प योग दोष निवारण करतात. त्यांनी सांगितले, की कुंडलीत राहू आणि केतूच्या मध्ये सर्व ग्रह आल्यास त्याला कालसर्प योग असे म्हणतात. सध्या हा दोष मोठ्या प्रमाणावर आढळतो. कारण आपण आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि श्राद्ध नीट करत नाही. या दोषाचे निवारण येथे पूजेद्वारे केले जाते. या पूजेत चांदीचे नऊ नाग आणि सोन्याचा एक नाग असतो. ही पूजा दोन तास चालते. गणेश पूजनाने सुरू झालेली पूजा हवनानंतर संपते. त्यानंतर दोषाचे निवारण झाले असे मानले जाते. अकोलकरांच्या मते जगातील वीस टक्के लोकांच्या कुंडलीत कालसर्प योग असतो. त्यामुळे त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.

या दोष निवारणासाठी मुंबईहून आलेल्या प्रदीपकुमार से
ShrutiWD
आणि सुनंदा सेन या दाम्पत्याची गाठ अकोलकरांनी घालून दिली. सुनंदा यांना याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, की आमच्या आयुष्यात अचानक अडचणी यायला सुरवात झाली आहे. मुलगा डॉक्टर आहे,. पण काही काम करत नाही. कोर्टाच्या जंजाळात अडकलो आहोत. एका ज्योतिषाने आम्हा दोघांच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, असे सांगून सगळ्या अडचणी त्यामुळेच येत असल्याचे सांगितले. म्हणून आम्ही येथे आलो आहोत.

येथील पूजा पाहिल्यानंतर गावात इतरत्र फिरले. त्यावेळी सर्वत्र मंत्रांचे आवाज येत होते. सगळीकडे हीच पूजा चालली होती. काही ठिकाणी एकावेळी वीस वीस जणांची पूजा केली जात होती. या समूहासाठी तीन ब्राह्मण माईकच्या सहाय्याने मंत्रपठण करीत होते. ही पूजा पाहिल्यानंतर एका गोष्टीची मात्र खात्री पटली. या पूजेनंतर एखाद्याच्या आयुष्यातील कालसर्प योगाचे निवारण होऊन भगवंताची कृपा झाली की नाही हे माहित नाही, पण येथील भिक्षुकवर्गावर मात्र भगवंताची कृपादृष्टी मात्र नक्कीच झाली आहे. पूजेचा फायदा किती होतो किंवा नाही यासंदर्भात दोन्ही मते आढळली. काहींच्या मते फायदा होतो, काहींच्या मते आम्ही आमच्या मनाला समाधान वाटते म्हणून करतो.

आमची कुंडली दोषमुक्त व्हावी एवढेच आमचे म्हणणे आहे. कालसर्प योगाच्या बाबतीत प्राचीन ग्रंथात मात्र, काहीही लिहिलेले नाही. यापूर्वी पंधरा वीस वर्षांपूर्वी या पूजेचे एवढे प्रस्थही नव्हते. अचानक या पूजेविषयीची चर्चा सुरू झाली आणि येथील भिक्षुकांवर परमेश्वराची कृपादृष्टी झाली. विशेष म्हणजे ही पूजा येथेच होते. दुसरीकडे होत नाही. असे का याला कुणाकडे उत्तर नाही.

ShrutiWD
ही पूजा करताना मंत्रोच्चारण असे असते की भिक्षुक नेमके काय म्हणतोय हे कळत नाही. सर्वसामान्यांचे त्याकडे लक्षही नसते. या पूजेची दक्षिणा ठरलेली आहे. काही हजार त्यासाठी मोजावे लागतात. पूजेची सगळी सामग्री यजमानांकडे असते. त्यामुळे येताना काहीही आणण्याची गरज नसते. रहाण्याची-खाण्याची व्यवस्था यजमान अगदी जातीने करतात. अनेकांनी त्यासाठी आता मोठ्या इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे येणार्‍या भाविकांची व्यवस्था अगदी हॉटेलसारखी केली जाते. थोडक्यात त्र्यंबकेश्वरात केल्या जाणार्‍या या पूजेने आता व्यावसायिक रूप घेतले आहे.