शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

आर्थिक मंदीमुळे टाटांनी विस्तार योजना गुंडाळल्या

आर्थिक मंदीच्या विळख्यात आता भारतीय उद्योगही सापडू लागले आहेत. भारतीय उद्योग क्षेत्रातील बड्या टाटा ग्रुपने आता आपल्या विस्तार योजना आणि इतर उद्योग ताब्यात घेण्याच्या योजना गुंडाळल्या आहेत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी तसेच पत्रच ग्रुपमधील ९८ कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे.

टाटा सन्सच्या प्रवक्त्याने या वृत्ताला पुष्टी देत सांगितले, की ग्रुपमधील कंपन्यांच्या व्यवस्थापनाला आगामी आर्थिक पेचप्रसंगाच्या काळात अधिक सजग आणि सावध रहाण्यास सांगण्यात आले असून जपून खर्च करण्यास आणि शक्य होईल तेवढे उत्पन्न वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सध्याच्या पेचप्रसंगाला तोंड देण्यासाठी टाटा स्वतःहून प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्या विविध कंपन्यातील व्यवस्थापनाला पाठवलेल्या पत्रात सध्याच्या व्यावसायिक योजनांचा अभ्यास करून सहा कलमी कृती योजना तयार करण्यास सांगितले आहे. तसेच रोकड ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला असून विस्तार योजना गुंडाळण्यास सांगितल्या आहेत. शिवाय इतर उद्योग ताब्यात घेण्याची प्रक्रियाही थांबवावी असे त्यांनी सुचवले आहे. जेवढा खर्च कमी करता येईल तेवढा करावा असे त्यांनी सांगितले आहे.

आर्थिक मंदीचा फटका टाटा ग्रुपच्या कंपन्यांनाही बसला आहे. जग्वार लॅंड रोव्हरचा ताबा घेण्यासाठी टाटांना २.३ अब्ज डॉलर्स उभे करायचे होते. त्यातील ४ हजार १५० कोटी शेअर बाजारातून उभे करण्यात येणार होते. पण तेवढे जमा करण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळेच नवी एक्विझिशन्स करण्यासाठी थोडे थांबावे असे सांगण्यात आले आहे.