शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

महाराष्ट्राला भरीव काही मिळणार की...?

राज्याच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने ग्रामीण भागात रेल्वेचे जाळे उभारण्याचा राज्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने पाच नव्या रेल्वे मार्गांसाठी ५० टक्के खर्चाची तरतूदही राज्याने केली आहे. अशी तरतूद करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी ३ जुलै रोजी सादर होणार्‍या रेल्वेच्या अर्थसंकल्पात राज्याला या मार्गांसाठी भरीव तरतूद मिळावी अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास लालूंप्रमाणे ममता यांनीही मराठी लोकांच्या तोंडाला पाने पुसली असेच म्हणावे लागेल.

अहमदनगर-बीड-परळीवैजनाथ (२६१.२५ किमी), वर्धा-नांदेड (२७० किमी), मनमाड-इंदौर (३५० किमी) आणि वडसा देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली (४९.५ किमी) हे चार मार्ग राज्याने प्राधान्याने हाती घेतले असून या मार्गांचा सर्वेही झाला आहे. या चारही मार्गांसाठी येणार्‍या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कमेचा भार राज्याने उचलला असून त्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक तरतूदीस सुरुवातही केली आहे. राज्याच्या ग्रामीण विकासाच्यादृष्टीने रेल्वेचे हे नवे मार्ग अतिशय महत्त्वाचे असल्याने राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना सविस्तर पत्र लिहून या प्रकल्पांसाठी केंद्राने भरीव आणि तातडीची तरतूद करण्याची विनंती केली होती व त्यानुसार पाठपुरावाही चालू आहे. शिवाय या मार्गांचा ५० टक्के वाटा राज्याने उचलल्याने उद्या ३ जुलै रोजी होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गांसाठी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने सुवर्ण त्रिकोण साधणार्‍या पुणे-नाशिक या २६५ किलोमीटर लांबीच्या आणि १०४४ कोटी रुपये खर्चाच्या नव्या रेल्वे मार्गाचा समावेश करावा असेही महाराष्ट्राने प्रस्तावित केलेले आहे. राज्यातील बारामती-लोणंद, अमरावती-नरखेड, पुणतांबा-शिर्डी, मिरज-लातूर, सोलापूर-होटगी गदग, पनवेल-रोहा, दिवा-कल्याण, पनवेल-जसई जेएनपीटी, पखणी-सोलापूर, पकणी-मोहोळ, अकोला-पूर्णा, जबलपूर-गोंदिया, चिंधवरा-नागपूर, कळमना-नागपूर, महानगर परिवहन प्रकल्पांतर्गत येणारे कुर्ला-ठाणे अतिरिक्त मार्ग, ठाणे-तुर्भे-नेरळ-वाशी, बेलापूर-सीवूडस्‌ उरण विद्युतीकरण, बोरिवली-विरार ही कामे चालू असलेल्या आणि रूंदीकरण, दुहेरीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या रेल्वे मार्गांना भरीव तरतूद मिळण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय जळगाव-उधना व जळगाव-सुरत दुहेरीकरण, यवतमाळ-मुर्तिजापूर-अचलपूर, पुणे-मिरज कोल्हापूर दुहेरीकरण, जालना-खामगाव शेगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन ते रेल्वे बोर्डास सादर करण्यात आले आहे. या प्रकल्पांनाही हिरवा झेंडा मिळणार काय याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.