शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (16:49 IST)

शरद पवारांच्या उपस्थितीत यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन होणार

आशुतोष गोवारीकर देणार स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेत व्याख्यान
२० जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान रंगणार महोत्सव
 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट महोत्सव २० जानेवारी २०१७ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये होणार आहे. महोत्सवाचे उदघाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, आस्थापना व्यवस्थापक संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
 
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. यावेळी महोत्सवास मुंबई विद्यापिठाचे सहकार्य लाभणार आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे उदघाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत, असे प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी सांगितले. यंदाच्या चित्रपट महोत्सवात जगभरातील एकूण ७५ सिनेमे दाखवले जाणार आहेत. तर यावर्षी `स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व्याख्याते म्हणून असणार आहेत. `मास्टर क्लास’ या विभागात चिली देशातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जॉर्ज अरिगडा हे `ध्वनी आणि संगीत’ या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत, अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. 
  
यावर्षी ५२ जागतिक, ३ भारतीय, ३ मराठी, ४ रेट्रो, ७ लैटीन अमेरिका या भाषेतील सिनेमे आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २९ लघुपट यामध्ये १३ चलचित्र तर १६ अनिमेशन आहे. यावर्षी व्हिएतनाम देशाचे ५ सिनेमे देखील दाखविण्यात येणार आहेत. असे महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितले.