गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जून 2014 (11:45 IST)

आदितीचा मराठीला मुजरा

मराठी इंडस्ट्री, मराठी सिनेमे यांची मनोरंजनसृष्टीत सध्या खूप चर्चा आहे. अनेक बॉलिवूडकर पाहुणे कलाकार म्हणून मराठी सिनेमात हजेरी लावून जातायत. आगामी ‘लय भारी’ सिनेमात सलमान खान दिसणार आहे. ‘मर्डर 3’ फेम आदिती राव हैदरीच्या दिलखेचक नृत्याची कमाल मराठीत पाहायला मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आगामी ‘रमा माधव’ या मेगा प्रोजेक्टमध्ये तिनं तिच्या नृत्याची झलक दाखवली आहे.

या चित्रपटातल्या एका गाण्यात तिनं मुजरा पेश केला आहे. ‘रमा माधव’ हा चित्रपट 1760 च्या कालखंडावर बेतलेला आहे. हा काळ मराठी साम्राज्याचा सुबत्तेचा काळ समजला जातो. पेशवे पुण्यात असतानाच्या काळात विशेष समारंभांसाठी नर्तिकांना आमंत्रित केलं जायचं. त्यामुळे या गाण्यासाठी ट्रेंड क्लासिकल डान्सरची आवश्यकता होती. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केलीय. त्यांनीच मृणाल कुलकर्णी यांना आदितीचं नाव सुचवलं. हिंदी भाषेतलं हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिलं आहे. ‘लूट लियो मोहे शाम सवरिया, बर्बस जमुना किनारे’ असे या गाण्याचे बोल आहेत. माधवराव पेशवे यांचे काका रघुनाथराव यांच्या आवडत्या नर्तिकेच्या भूमिकेत अदिती दिसेल. लाल रंगाची लेहेंगा-चोली आणि भरगच्च दागिन्यांमध्ये सजलेली आदिती यात पाहायला मिळेल. या गाण्यात अदितीसोबत प्रसाद ओकही दिसेल. आदितीचं हे नृत्य चित्रपटाच्या खास आकर्षणांपैकी एक असेल.