गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|

इचार ठरला पक्काचा ध्वनीफित प्रकाशित!

- चंद्रकांत शिंदे

WD
मराठी चित्रपट खर्‍या अर्थाने आता ग्लोबल झाला आहे. ऑस्करपयर्ंत पोहोचलेल्या मराठी चित्रपटांसाठी आता मल्टीप्लेक्समध्ये ही प्रामुख्याने स्थान मिळू लागले आहे. वैभवशाली मराठीचा हा झेंडा पुढे नेण्याची जबाबदारी निर्मात्यांवर असून त्यांनी जास्तीत जास्त चांगले चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी निर्मात्यांचा हुरुप वाढवला. राज ठाकरे यांच्या हस्ते सुनंदा रामराव पवार द्वारा निर्मित इचार ठरला पक्का चित्रपटाच्या ध्वनिफीतीचे विमोचन नुकतेच मुंबईत करण्यात आले. याप्रसंगी बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण करणारा मधुर भांडारकर आणि सचिन पिळगांवकर प्रामुख्याने उपस्थित होते.

मराठी चित्रपटसृष्टीतही आता ग्लॅमर अवतरू लागले आहे. मराठी चित्रपटांचे मुहुर्त कधी होतात, त्याच्या ध्वनीफिती कधी बाजारात येतात आणि चित्रपट कधी प्रदर्शित होतात याची सिनेपत्रकारांनाही माहिती नसते तर सामान्य प्रेक्षकांची गोष्टच निराळी. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक निर्माते भव्यतेने (बॉलीवुडच्या मानाने किरकोळ) चित्रपटाचा मुहुर्त करण्याबरोबरच ध्वनीफीत विमोचनाचाही कार्यक्रम आयोजित करतात. गंगोत्री प्रोडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचा इचार ठरला पक्काचा ध्वनीफित विमोचन समारंभही भव्यतेने आयोजित करण्यात आला होता.

राज ठाकरे यांनी सांगितले, या कार्यक्रमाला मी यावे म्हणून सुनंदा पवार यांनी मोठा जॅक लावला होता. माझी पत्नी शर्मिला सुनंदा यांची चांगली मैत्रीण आहे. मैत्रीणीने मैत्रीणीला आग्रह केला आणि मला तो पूर्ण करावा लागला. मराठी कलाकार आज खूप पुढे गेलेले आहेत. भरत जाधवने मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून महागडी बीएमडब्ल्यू घेतली त्याचा मला अभिमान आहे. सर्व मराठी कलाकारांकडे बीएमडब्ल्यू यावी असे मला वाटते.

सुनंदा पवार यांनी इचार ठरला पक्काबाबत वेबदुनियाशी बोलताना सांगितले, मला लहानपणापासूनच कलेची आवड होती. मराठी चित्रपट निर्माण करावा असे मला गेल्या काही वर्षांपासून वाटत होते परंतु चांगले कथानक मिळत नव्हते. प्रदीप कबरे यांनी मला एक कथानक ऐकवले ते मला खूपच आवडले आणि मी लगेचच चित्रपट निर्मितीस सुरुवात केली. प्रदीप कबरे यांनी कथा-पटकथा-संवाद तर लिहिलेच, चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली आहे आणि चित्रपटातही एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मनोहर सरवणकर यांनी चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन केले आहे.

कथानकाबाबत विचारता सुनंदा पवार यांनी सांगितले, आजच्या राजकारणाचे सत्य चित्रण दाखवणारा हा चित्रपट आहे. ग्रामीण राजकारणावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेले आहेत परंतु या चित्रपटाद्वारे आम्ही राजकारण, समाजकारण आणि राजकारणातील तरुणांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे कि, प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.

भरत जाधवने वेबदुनियाशी बोलताना सांगितले, हा खूपच वेगळा आणि चांगला चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीतही खूपच चांगले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि यातील गाणी नक्कीच आवडतील. चित्रपटाची नायिका प्राची शाहने वेबदुनियाशी गप्पा मारताना सांगितले, या चित्रपटात भरतला राजकारणात येण्यासाठी मी मदत करते. ग्रामीण राजकारण कसे असते ते या चित्रपटात उत्कृष्टरित्या दाखवलेले आहे.

मधुर भांडारकर, सचिन पिळगांवकर यांनीही सुनंदा पवार यांना पहिल्या चित्रपटानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दोघांव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गायक, गीतकार, संगीतकार, कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.