शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By भाषा|

मराठी चित्रपटात नवा 'ट्रेंड'

मराठी चित्रपटातही आता एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. टॉपच्या अभिनेत्याला एकापेक्षा जास्त चित्रपटासाठी घेऊन त्याच्याबरोबर काम करण्याचा हा ट्रेंड आहे. अर्थात, बॉलीवूडमध्ये मिळणार्‍या पैशांची तुलना करता येणार नाही, पण त्यामुळे नवोदित दिग्दर्शक, पटकथाकारांना चांगले पैसे मिळू लागले आहेत.

हिंदीत बडे कलाकार चित्रपटाच्या वितरणात किंवा त्याच्या नफ्यात आपला हिस्सा मागतात, तसा प्रकार मराठीच्या बाबतीत संभवत नाही. कारण ही चित्रसृष्टी महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, असे अल्ट्रा इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार यांनी सांगितले. अल्ट्राने मराठीतील टॉपचा अभिनेता भरत जाधवशी पाच चित्रपटांचे करार केले आहेत. त्यातला पहिला 'लंगडा मारतोय तंगडा' हा पितांबर काळे यांनी दिग्दर्शित केला असून ९ ऑक्टोबरला तो रिलीज होईल. त्याचवेळी 'लगीन करायचे औंदा'चे शूटींग पूर्ण झाले आहे. भरतबरोबर तिसर्‍या चित्रपटाचे शूटींग जानेवारीत सुरू होणार आहे.

एकाच अभिनेत्याबरोबर पाच चित्रपट करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना अगरवाल म्हणाले, चित्रपट सुरू करण्यापूर्वीच्या अनेक कामे सफाईने करता येतात. कथा व पटकथा त्या अभिनेत्याच्या इमेजला साजेशी आहे की नाही हेही पाहिले जाते. आम्ही भरतबरोबर केलेले विनोदी चित्रपटही त्याच्या जातकुळीतले आहेत. ते शहरी आणि ग्रामीण जनतेलाही नक्कीच आवडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षात मराठी चित्रपटांचे मार्केट वाढले आहे. 'साडे माडे तीन' व 'दे धक्का' हे दोन चित्रपट लोकांपर्यंत जाहिरातबाजी करून पोहचविण्यात आले. त्याचवेळी 'वळू' व 'टिंग्या' हे कमी बजेटचेही चित्रपट दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांनी पाहिले.