शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|

मराठी चित्रपटासाठी धावले 'मराठी स्टार्स'

'गंध' मध्ये मिलिंद सोमणसह सोनाली, नीना कुलकर्णींचा सहभाग

WD
साचेबध्द चोकोरीतून बाहेर पडल्याने मराठी चित्रपटांना आता पुन्हा चांगले दिवस येऊ लागलेत. मराठीतही आता बिगबजेट चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. हिंदी चित्रपटांशी दोन हात करणा-या या चित्रपटांना चांगला प्रतिसादही मिळतोय. खरेतर अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला बळ देण्याचे काम नव्या दमाच्या कलाकारांनी केले आहे. निळू फुले, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत यांच्यानंतर मराठी चित्रपटाला ओहोटी लागली. श्वाससारख्या चित्रपटांनी तग धरणा-या मराठी चित्रपटसृष्टीला भरत, पॅडी, मकरंद, श्रेयस आदीं कलाकारांनी पुन्हा नवसंजीवनी मिळवून दिली.

मराठी चित्रपटांची क्रेझ लक्षात घेऊनच की काय, बीग-बी अभिताभ बच्चनने मराठी चित्रपटात काम करण्याची मनोकामना व्यक्त केली तर निर्माते सुभाष घई यांना मराठी चित्रपटाच्या विरणव्यवस्थेत शिरण्याची घाई लागली. मराठीतून बॉलीवुडमध्ये जाणा-या मराठी स्टार्सही आता पुन्हा मराठीकडे वळले आहेत. मराठी स्टार्सचा भरणा असलेला 'गंध' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी, अमृता सुभाष, नीना कुलकर्णी या प्रतिभावान कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवुड स्टार आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करतोय.

WD
एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा असल्याने 'गंध' हा चित्रपट अनेक दृष्टीने मराठी चित्रपटांची चाकोरी मोडणारा आहे. प्रीतम भंडारी, राजेश गोयल आणि संदीप कांकरिया या तीन मित्रांच्या 'फ्लॅशबल्बस् व्हेंचर'या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. सतत आव्हानांशी खेळणार्‍या या शिलेदारांनी गंधचा वेगळा कन्सेप्ट आव्हान म्हणूनच स्वीकारलाय. मराठी चित्रपटाला जागतीक स्तरावर मानाचं स्थान मिळवून देण्याचे आमचं ध्येय असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

WD
गंध या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन कुंडलकर करताहेत. रेस्टॉरेंट, निरोप या नव्या जाणिवांच्या चित्रपटांचे संवेदनशील दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकर परिचित आहेत. अनेक नाटकांच्या, एकांकिकांच्या लेखनाचा अनुभव गाठीशी असलेल्या कुंडलकर यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद लिहिले आहेत. तसेच अर्चना कुंडलकर यांच्या साथीने कथालेखन केले आहे. गंध च्या निमित्ताने एक निराळ्या अनुभूतीचा प्रेक्षक आस्वाद घेऊ शकतील असा विश्वास कार्यकारी निर्माते रणजित गुगळे यांनी व्यक्त केला आहे.