शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2015 (09:56 IST)

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन

कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे रविवारी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर दालमिया यांच्यावर कोलकातामधील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये उपचार करण्यात येत होते. दालमिया यांच्यावर उपचार सुरू असतानाच रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष असलेले जगमोहन दालमिया यांना दोन दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकातामधील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. दालमिया यांच्यावर हृदयविकारांवर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दालमिया यांच्या निधनाची बातमी समजताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. दरम्यान, दालमिया यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली, पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांच्यासह बंगाल क्रिकेट बोर्डाच्या काही पदाधिकार्‍यांनी बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.