गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 22 जुलै 2014 (10:38 IST)

भारताचा लॉर्डसवर 28 वर्षानंतर विजय

ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीने यजमान साहेबांचा सुफडासाफ करत भारताने दुसरा कसोटी सामना ९५ धावांनी जिंकला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्डस्वर भारताने तब्बल २८ वर्षानंतर तिरंगा फडकवला. इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारताने त्यांचा दुसरा डाव २२३ धावांवर संपुष्ठात आणला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाला होता. या विजयाचा शिल्पकार ठरला इशांत शर्मा त्याने ७ बळी घेतले. 
 
दुस-या कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडने चार बाद १०५ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. ईशांत शर्माने मोइन अली याला ३९ धावांवर बाद करत भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. उपहारापर्यंत इंग्लंडने पाच बाद १७३ धावा केल्या होत्या. उपहारानंतर इशांतने पुन्हा एकदा इंग्लंडला जोरदार धक्के दिले. त्याने प्रथम मॅट प्रायर याला १२ धावांवर बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्स (शून्यावर) आणि मग भारताच्या विजयात सर्वात मोठा अडथळा ठरू पाहणा-या ज्यो रुटला ६६ धावांवर बाद केले. रुट बाद झाला तेव्हा इंग्लंडची अवस्था आठ बाद २०१ अशी झाली होती. 
 
गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे रंगतदार कसोटी सामन्याच्या अंतिम म्हणजेच पाचव्या दिवशी इंग्लंडने ४ बाद १०५ धावेवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या दिवशी बॅकफूटवर आलेल्या इंग्लंडने अंतिम दिवशी दमदार प्रदर्शन केले. पाचव्या विकेट्ससाठी मोईन अली आणि जो रुटच्या १०१ धावांच्या भागीदारीने इंग्लंडला तारले. शेवटी उपहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात इशांत शर्माने मोईन अलीला चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद करुन इंग्लंडच्या मोठ्या भागीदारीला रोखले. इशांतचा हा तिसरा बळी ठरला. त्यानंतर मॅट प्रायर आणि रुटने आक्रमक खेळी करत धावसंख्येचा वेग वाढवला परंतु इशांत शर्माच्या गोलंदाजीसमोर एकानंतर एक फलंदाजांना तंबूत पाठवले.मॅट १२ धावा करुन मुरली विजयच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर अवघ्या तीन धावसंख्येच्या फरकावर एकच षटकात दोन गडी बाद करुन यजमानांना मोठा झटका इशांत शर्माने दिला. बेन स्टोक्सला भोपळा ही न फोडू देता पुजाराच्या हाती झेलबाद केले तर त्यानंतर दमदार अर्धशतक करणा-या जो रुटला बिन्नीच्या हाती झेलबाद केले. रुटने १४६ चेंडूत ६६ धावा केल्या त्यामध्ये त्याने ७ चौकार लगावले. रुटच्या बाद होण्याने ८ बाद २०१ अशी दयनीय स्थिती झाली. त्यानंतर ब्रॉडला धोनी करवी झेलबाद करुन साहेबांना ९ झटका इशांतनेच दिला. हा त्याचा सातवा बळी ठरला. अखेर जेम्स अँडरसनला जाडेजाने धाव बाद करुन २०११ नंतरचा परदेशातील पहिला विजय मिळवून दिला. त्याने अ‍ॅडरसनला २ धावेवर बाद केले. २२३ धावावर सर्वबाद करत तब्बल २८ वर्षापासूनचे विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. 
 
इशांत आणि स्पेल 
इशांतने पहिल्या सत्रात सुरुवातीच्या तासातील अपयश उपाहारापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर मोइन अलीला बाद करून भरून काढले. या विकेटमुळेच इंग्लंडच्या विजयाच्या थोडयाथोडक्या आशा संपुष्टात आल्या कारण नंतर फक्त लॉर्डस्वर लॉर्ड होता इशांत. उपहारानंतरच्या चौथ्या षटकात धोकादायक मॅट प्रायरला (१२) बाद केले. हे कमी म्हणून की काय इशांतने त्याच्या पुढच्या षटकात बेन स्टोक्स (०) आणि धोकादायक ज्यो रुटला (६६) बाद केले. रुट बाद झाला असला तरी चेंडूंतील धावांची त्याची खेळी ही भारताचा विजय लांबवणारी ठरली. पाठोपाठ इशांतने स्टुअर्ट ब्रॉडलाही (८) बाद करत त्याची कसोटीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (सात विकेट) नोंदवली. अर्थातच तो मान त्याला लॉर्डस्वर मिळाला. याबरोबरच राहिली भारताच्या संस्मरणीय विजयाची प्रतीक्षा ती जेम्स अ‍ॅँडरसनच्या (२) धावचीत होण्याने पूर्ण झाली. 
 
कुक आणि बेल वि. इशांत 
इशांत शर्माचे रिकी पॉँटिग आणि मायकेल क्लार्कसारख्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्धचे यश सर्वानाच ठाऊक आहे. त्यामध्ये अर्थातच इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि इयन बेल यांचीही भर पडली आहे. रविवारी चौथ्या दिवशी कुकला आठव्यांदा आणि बेलला सहाव्यांदा बाद करत इशांतने या दोन फलंदाजांविरुद्ध वर्चस्व राखले. 
 
२८ वर्षानंतरच्या विजयाची वैशिष्ट्ये 
१९८६ नंतर भारताचा लॉर्डस्वर विजय. भारताचा हा लॉर्डस्वरील दुसराच विजय परदेशात २०११ नंतर भारताचा पहिला कसोटी विजय, याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध जमैका कसोटीत विजय. या सामन्यात इंग्लंडचे शेवटचे सहा गडी केवळ ५० धावांमध्ये बाद झाले. त्यापैकी पाच गडी इशांतने बाद केले. २८ ही संख्या भारताला लकी ठरला आहे असे दिसते. भारताने २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकला होता. तर आता लॉर्डस् मैदानावरही २८ वर्षानंतर विजय मिळवला आहे. 
 
इतिहासाची पुनरावृत्ती 
भारताने लॉर्डस् मैदानावर १९८६ मध्ये अखेरचा कसोटी विजय मिळवला होता. हा विजय भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर तीन वर्षांनी मिळवला होता. आता ही भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर तीन वर्षांनी लॉर्डस् मैदानावर विजय मिळवला 
लॉर्डस्वरील मागील 
 
दोन कसोटींची आठवण 
२००७ मध्ये येथील कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना अखेरच्या दिवशी महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या फलंदाजांना हाताशी धरून नाबाद ७६ धावा फटकवल्या. त्याच वेळी पावसाचे आगमन झाले आणि ती कसोटी अनिर्णित राहिली. आम्ही जेलमधून बाहेर आलो, अशी प्रतिक्रिया त्यानंतर कर्णधार राहुल द्रविडने त्यावेळी दिली होती. २०११ मध्ये लॉर्डस् कसोटीत ४५८ धावांचे लक्ष्य गाठताना भारताने चौथ्या दिवसअखेर १ बाद ८० अशी चांगली सुरूवात केली होती. त्यामुळे पाचव्या दिवशी मध्यरात्री पासूनच तिकिटासाठी रांगा लागल्या होत्या. मात्र पाचव्या दिवशी भारत २६१ धावांत गारद झाला. 
 
अविस्मरणीय विजय : धोनी 
भारतीय संघाचे कर्र्णधार महेंद्रसिंग धोनीने या विजयाला अविस्मरणीय विजय म्हणत खेळाडूंच्या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे. संघातील सर्वच खेळाडूंना अनुभव नव्हता परंतु सर्वांनी शानदार प्रदर्शन केले. रवींद्र जडेजाने केलेल्या अर्धशतकामुळेच भारताला अपेक्षित धावा करता आला. भुवनेश्वर कुमारचे करावे तितके कौतुक कमी आहे असेही यावेळी धोनी म्हणाला. 
 
या विकेट्स धोनीच्या : ईशांत 
सामनावीरचा मानकरी ठरलेल्या ईशांत शर्माने ७ बळी घेऊन भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पण या विकेटचे श्रेय ईशांतने कर्णधार धोनीला दिले आहे. सामनावीर ईशांत म्हणाला की, धोनीने मला शॉर्ट बॉल टाकण्यास सांगितले आणि त्यावर एक एक फलंदाज बाद होत गेले. या सर्व विकेट्सचे श्रेय धोनीचे आहे त्याने प्रोत्साहित केले म्हणूनच मी ही कामगिरी करु शकलो. 
 
विजयाचे पाच स्टार 
ईशांत शर्मा : ईशांत शर्माने ७ बळी घेऊन या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने २३ षटकात ७४ धावा देऊन हे शानदार प्रदर्शन केले. 
भुवनेश्वर कुमार : कुमारने या कसोटीमध्ये पहिल्या डावात ३६ धावांची खेळी करत ६ बळी घेतले. दुस-या डावात भारताचे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाबरोबर ९० धावांची भागीदारी केली. या डावात कुमारने ५२ धावांची दमदार खेळी केली. 
रवींद्र जडेजा : रवींद्र जडेजाच्या आक्रमक अर्धशतकामुळेच भारताला अपेक्षित धावसंख्या करता आली. जडेजाने ५७ चेंडूचा सामना करत ६८ धावा ९ चौकारच्या सहाय्याने केले. जडेजाच्या या अर्धशतकानेच भारताला तीनशेचा टप्पा पार करता आला. 
मुरली विजय : दुस-या डावात भारताचे एकानंतर एक फलंदाज तंबूत परत असताना विजयने शानदार खेळी करत ९५ धावा केल्या त्यामुळेच भारताचा डाव सावरला गेला. त्याने २४७ चेंडूत ११ चौकारसह या धावा केल्या. 
अजिंक्य रहाणे : पहिल्या डावात भारत ३ बाद ८६ धावा अशा अवस्थेत असताना भारताच्या डावाला सावरत त्याने १०३ धावांची शतकी खेळी केली.