शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

भारतीयांची शरणागती; सर्वबाद १९६

भारतीय गोलंदाजांनी काल जे कमावलं, त्यावर फलंदाजांनी आज पाणी फिरवलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात स्टुअर्ट क्लार्क, ब्रेट ली आणि ब्रॅ़ड हॉग यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पार गळपटले आणि पाहुण्यांचा डाव अवघ्या १९६ धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाला १४७ धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे. सचिन तेंडूलकर व सौरभ गांगुली यांच्याशिवाय एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाने कालच्या नऊ बाद ३३७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरवात केली. पण त्यांचा पाहिला डाव ३४३ धावांवर आटोपला. स्टुअर्ट क्लार्क सकाळी झहीर खानच्या गोलंदाजीवर हरभजनकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव सुरू झाला आणि तितक्याच लवकर तो संपलाही. सलामीवर वसीम जाफर (४) व राहूल द्रविड (५) लवकर तंबूत परतले. जाफरने ब्रेटली पुढे शरणागती पत्करत गिलख्रिस्टकडे झेल दिला. द्रविडला स्टुअर्ट क्लार्कने पायचीत केले.

लक्ष्मणने सचिनच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तोही २६ धावांवर बाद झाला. लीने त्याला पॉंटींगकरवी झेलबाद करवले.

सचिनने एकीकडे डाव सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले होते. सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने त्याने ६२ धावा केल्या. पण क्लार्कच्या गोलंदाजीवर तोही त्रिफळाचीत झाला. सचिननंतर आलेला युवराजही आल्याआल्या तंबूत परतला. क्लार्कच्या चेंडूवर त्याने गिलख्रिस्टकडे झेल दिला.

चहापानानंतर पाच बाद १२२ धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने महेंद्रसिंह धोनीच्या रूपाने सहावी विकेट गमावली. वन डेचा हा कर्णधार शू्न्यावर बाद होऊन तंबूत परतला. क्लार्कने त्याला पायचीत केले. धोनीनंतर आलेल्या अनिल कुंबळेच्या साथीने गांगुलीने (४३) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सातव्या गड्यासाठी ४४ धावांची भागीदारी केली. पण गांगुलीला हॉगने बाद केले. हरभजनही दोन धावा बनवून तंबूत परतला. कर्णधार कुंबळे २७ धाव करून ब्रेटलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. झहीर खानची शिकार लीनेच केली.

अशा रितीने भारतीय डावाची इतिश्री झाली. ऑस्ट्रेलियाच्या स्टुअर्ट क्लार्क, ब्रेट लीने प्रत्येकी चार तर हॉगने दोन बळी घेतले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरवात झाली असून खेळ संपला तेव्हा यजमानांनी बिनबाद ३२ धावा केल्या होत्या. फिल जॅकस व मॅथ्यू हेडन अनुक्रमे १० व २२ धावांवर खेळत होते.