शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

वर्ल्डकपमधील भारत-पाक सेमीफायनल फिक्स?

PR
गतवर्षी भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील उपांत्य फेरीचा सामना 'फिक्स' असल्याचा दावा लंडनच्या संडे टाइम्स या वृत्तपत्राने केल्याने खळबळ उडाली आहे.

या फिक्सिंगच्या नेटवर्कसाठी बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीचाही वापर करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. या वृत्ताची चौकशी करण्याची तयारी आयसीसीने दाखविली आहे. या प्रकरणाने मॅचफिक्सिंगचे भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसले आहे. फिक्सिंगपासून क्रिकेटला दूर ठेवण्याचा आयसीसी प्रयत्न करीत असले तरी याची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे निदर्शनास येत आहे.

या लढतीसाठी सट्टेबाजांनी खेळाडूंना प्रचंड मोठी रक्कम दिल्याने या वृत्तात म्हटले आहे. संथपणे धावा काढण्यासाठी फलंदाजांना ३४ लाख, तर सुमार गोलंदाजी करण्यासाठी ३९ लाख रुपयांची रक्कम दिली गेली. मॅचफिक्सिंगची खात्री देणार्‍या खेळाडू किंवा अधिकार्‍यालाही ५ कोटी ८४ लाख रुपये दिले गेल्याचे यात म्हटले आहे.बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीचा वापर खेळाडूंना पटवण्यासाठी करण्यात आल्याचा दावा वृत्तात एका सट्टेबाजाचा हवाला देऊन करण्यात आला आहे. यासंदर्भात वृत्तपत्राने दिल्लीतील एका सट्टेबाजाची मुलाखत घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीपेक्षाही इंग्लिश कौन्टीतील लढती फिक्स करणे अधिक सोपे असल्याचे त्याने सांगितले. कौन्टी क्रिकेटमधील लढती छोट्या असतात आणि कुणाचेही त्याकडे लक्ष नसते. त्यामुळे पैसे कमवणे सोपे असल्याचे या सट्टेबाजाने सांगितले.

चौकशीदरम्यान गोळा केलेली माहिती वृत्तपत्राने आयसीसीकडे दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन आयसीसीने दिले आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर बाजारात क्रिकेटवरील सट्टय़ांचे प्रमाण खूप मोठे असून, प्रत्येक लढतीवर लाखो रुपयांचा सट्टा लागतो, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.