गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

श्रीलंकेचा विजय अर्थात भारताचा फायनलमध्ये प्रवेश!

WD
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना आज होणार आहे. भारताच्या दृष्टीने ही लढत श्रीलंकेने जिंकण्याची गरज आहे.

भारताने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून आशा कायम राखल्या आहेत; पण तेवढे अंतिम फेरीसाठी पुरेसे ठरलेले नाही. आता श्रीलंकेचीही कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरू शकते. बांगलादेशकडून हरल्यामुळे भारताच्या मोहिमेला सुरवातीलाच धक्का बसला. स्पर्धेच्या नियमानुसार दोन्ही संघांचे गुण समान झाल्यास एकमेकांविरुद्धच्या सामन्यातील निकालाचा निकष लावला जाईल. या बाबतीत बांगलादेश सरस आहे.

फॉर्मचा निकष लावल्यास बांगलादेश आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवू शकतो. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला कडवी झुंज दिल्यानंतर बांगलादेशने भारताच्या 289 धावांचा यशस्वी पाठलाग केला. "टायगर्स' असे बांगलादेशच्या संघाचे टोपणनाव आहे. मायदेशात दणाणून प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांच्या साक्षीने बांगलादेशने धडाकेबाज कामगिरी केली आहे.

काहीही झाले तरी बांगलादेशसाठी ही लढत सोपी नसेल. श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचा संघ सहजी हार मानणार नाही. दोन सामने गमावल्यानंतर एक सामना जिंकून मायदेशी परतण्यापूर्वी थोडी प्रतिष्ठा राखण्याचा त्यांचा निर्धार असेल.

आजचा सामना
श्रीलंका वि. बांगलादेश
थेट प्रक्षेपण ः दुपारी 1.30
निओ क्रिकेट