शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By मनोज पोलादे|

सचिनचा 'महाशतका'चा महाविश्वविक्रम

ND
ND
सचिन तेंडुलकरने बहुप्रतिक्षित 'महाशतक' पूर्ण करून क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरात नांव लिहिले आहे. आशिया करंडकात बांग्लादेशविरूद्ध शकिब-अल-हसनच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने हा महापराक्रम केला आहे.

विक्रमादित्य सचिनने बांग्लादेशविरूद्ध संयमाने खेळ करत १३८ चेंडूत शतक पूर्ण करत 'महाशतका'चा योग साधला. सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पावर असताना सचिनच्या शतकाबाबत आज इतकी क्रेझ नव्हती. म्हणजे तमाम क्रिकेट चाहते आता शतकं पूर्ण होईल... असे चातकासारखे प्रतिक्षा करत बसलेले नव्हते. आणि नेमका हाच मुहूर्त साधत त्याने संयमाने 'महाशतका'कडे वाटचाल करत तोंडात आइसक्रिम विरधळावे तेवढ्या हळुवारपणे शतक पूर्ण केले.

सचिनने २२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत जवळपास ३४ हजार धावांचे 'एव्हरेस्ट' उभारताना कसोटीत ५१ आणि वनडेत ४९ शतकं करत 'महाशतका'चा विश्वविक्रम केला आहे. १९८९ साली पाकविरूद्ध कराचीत त्याने कसोटी पदार्पण केले होते आणि महिनाभरात म्हणजे डिसेंबरमध्ये तो पाकविरूद्धच पहिली वनडे खेळला होता.

एरव्ही खोर्‍याने धावा करणार्‍या सचिनला शतकांच्या एव्हरेस्टवर झेंडा रोवण्यासाठी तब्बल वर्षभर प्रतिक्षा करावी लागली. यादरम्यान खेळलेल्या ३३ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये तो शतक झळकवू शकला नव्हता. विश्वकरंडकात त्याने सलग दोन शतकं झळकवत ९९ शतकांचा आकडा गाठला होता. यानंतर इंग्लंडच्या दौर्‍यात सचिनच्या महाशतकाबाबत उत्कंठेने शिखर गाठले होते. यानंतर वेस्ट इंडिजविरूद्धची मायदेशातील मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौराही पार पडला मात्र 'महाशतका' त्याला हुलकावणी देत राहिले.

यादरम्यान दोन-तिनदा तो नर्व्हस नाइंटीमध्ये बाद झाला. यामुळे चाहत्यांच्या आणि क्रिकेट जगतातील तमाम रसिकांच्या उत्कंठेवर विरजन पडते की काय...अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शुक्रवारचा 'सुवर्णदिन' उगवला आणि क्रिकेटच्या इतिहासातील अशक्य कोटीतील 'महाविश्वविक्रम' नोंदवल्या गेला.