शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2015 (16:16 IST)

अंकुश पालकांचा

आजकाल सर्वाना मोकळीक द्याचे फॅड सुरू असल्याचे दिसून येते. पूर्वी तिन्हीसंध्याकाळी, दिवे लागणीला घरी थांबून, देवासमोर प्रार्थना म्हणायची, देवासह घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करून अभ्यसाला बसायचे, अशी पद्धत होती. आम्हाला कुणी त्याची सक्ती केली नव्हती. घरातील आजी-आजोबा यांनी एकदाच समजावून सांगितले की, दिवेलागणीला आपल्या घरी पाहिजे, बाहेरून आल्याबरोबर प्रथम हातपाय, तोंड स्वच्छ धुऊनच घरात फिरायचे. आम्हाला त्यांनी हे जे संस्कार सांगितले ते आपोआप रूजले. त्यांनाही कुठला अंकुश लावावा लागला नाही आणि आम्ही सुद्धा हे कशाला करायला पाहिजे अशा फालतू शंका त्यांना विचारल्या नाहीत. वडीलधारे सांगतात म्हणजे चांगलेच असणार अशी आमची श्रद्धा होती. आजी, आई, वडील, मोठा भाऊ यांच्याबद्दल एक भीतीयुक्त आदर होता. शाळेत गुरुजनांबद्दलही खूप आदर आणि श्रद्धा होती. तमुळे कधीच कुठला प्रॉब्लेम आला नाही. त्यावेळी शाळेत मधलसुटीत भैयजीची गाडी होती, त्यावर पाच पैशाला पाणीपुरी, कचोरी, भेळ मिळायची. खिशत चार आठ आण्याचा पॉकेटमनी ऊर्फ खाऊसाठीचे पैसे असायचे. त्यातून हे कधीतरी खायचे, शक्यतो रोज घरचाच डबा घेऊन जायचो. पण आता हे जुने पुराणे इतिहासजमा झालेले दिसते आहे. तेव्हा वडिलांची एकच सायकल होती. ती कधीतरी आम्ही तिघे भाऊ आळीपाळीने शाळेत नेत असू. पण शोभानगरच्या चाळीतील आम्ही पंधरा-वीस मुले बहुतेक खिंडीतल्या वाटेने एकत्र चालत मजा करतच हरिभाई शाळेत जात असू. त्यातील मजा औरच होती.

पण आजकाल हे सर्व बदललचे जाणवते आहे. आता शाळेत कॉलेजला जायला स्वत:ची दुचाकी, चारचाकी नाही तर बस, अँटोरिक्षा लागते. एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत चालला असल्याने आजी-आजोबा वृद्धाश्रमात आणि घरी हम  दो हमारा एक हे प्रमाण आहे. त्यामुलाला किंवा मुलीला स्वत:वर कुठलीही बंधन नको आहेत. आई-वडील नोकरदार असल्यामुळे त्यांनाही मुलांसाठी वेळ देता येत नाही. दोघेही नोकरी करत असल्याने घरात पैसा चांगलाच येतो. त्यामुळे घरात सर्व सुखसोयी आहेत. मुख्य म्हणजे मुलांनी काही एक वस्तू मागितली की त्यासोबत आणखी चार वस्तू घेऊन द्यायचे प्रकार हल्ली वाढले आहेत. खाऊच्या पैशाऐवजी भरभक्कम पॉकेटमनी त्या मुलाला दिला की आपले कर्तव्य संपले असे पालकांना वाटते. त्यामुलांकडे आपल्या वयाच्या मानाने महागडी बाईक, भारीतला भारी स्मार्टफोन, भलेलठ्ठ मिळणारा पॉकेटमनी त्यामुळे ह्या पिढीचा स्वैराचार वाढत चालला आहे.

मुलांवर पालकांनी लक्ष ठेवून अंकुश लावणे गरजेचे आहे. माझ्या मित्राचे दुकान आहे. तिथे आम्ही काही मित्र संध्याकाळी एकत्र जमतो. त्यावेळी तिथे दररोज येणारी 16 ते 21 वर्षाची मुले एकावेळी 150 ते 200 रूपांचा चुराडा करताना दिसतात. महागडय़ा सिगारेटस् त्यासोबत कुरकुरेसारखे पदार्थ, जोडीला शीतपेय, थंडपाण्याच्या बाटल्या, पाऊच अशा वस्तूंवर आळीपाळीने खर्च करताना दिसतात. ज्यावेळी या वयात  यांनी घरात असायला पाहिजे. त्यावेळी ही मुले बाईक बेभानपणे उडवत उंडारताना दिसतात. काही मुलीही अशा गोष्टी करताना दिसून येतात. शासकीय बंदी असूनही ही मुले बिनदिक्कत गुटखा खातात. त्यांचे बोलणे कानावर पडते, तेव्हा त्यांना ना आई-वडिलांबद्दल आदर ना आपल्या शिक्षकांबद्दल आदर असल्याचे दिसते. स्मार्टफोनवर नेहमी पोर्नसाईटवर अश्लील चित्रफिती पाहाणे हे तर त्यांचे नित्यकर्मच झाले आहे.

अशा अनिर्बद्ध मुलांकडून कळत नकळत गुन्हा घडण्याची शक्यता असते. ही मुले वाईट संगतीने एच.आ.व्ही बाधीत होऊ शकतात. आर्थिक चणचणीमुळे मोठा गुन्हा करू शकतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर अंकुश ठेऊन तो काय करतो? कोठे जातो? हे पाहिले पाहिजे. त्या मुलांवर वेळीच पालकांनी अंकुश ठेवून त्यांचे फाजील लाड बंद केले, तरच ही तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात न अडकता सरळ जीवन जगू शकेल, असे मला वाटते.

गिरिश दुनाखे