शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

इतरांवर दोष थोपवण्याची कारणे सापडली

बरेचदा लोक आपल्या चुकीचे खापर दुसर्‍यावर फोडतात किंवा जबाबदारी ढकलून मोकळे होतात. चांगले काम केल्यावरही स्तुती करण्यात कंजूसी करतात. अशा वर्तणुकीमागे मेंदूत स्त्रवणारे एक रसायन असल्याचे संशोधकांचे मत आहे. काही अघटित घडल्यास मानवी मेंदूतील ‘अँमिग्डाला’ हे रसायन सक्रिय होऊन जाते.
 
मेंदूतील पेशींपासून याची निर्मिती होत असते आणि त्याचा बदामासारखा आकार असतो. त्यामुळे व्यक्तीचा संवेदना, व्यवहार आणि उत्तेजना उद्दीपित होऊन व्यक्ती नकारात्मक काम करू लागते. त्यावेळी सकारात्मकतेचा त्यावर काहीच परिणाम होत नाही, असा दावा उत्तर कॅरोलिनातील डय़ूक विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.
संशोधकांनी मानवी मेंदूच्या कल्पना आणि वागणुकीत होणार्‍या बदलांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी 6650 पेक्षा अधिक लोकांवर प्रयोग केले. या संशोधनाच्या शोधनिबंधानुसार, मानवी मेंदू दोन प्रकारे काम करत असतो. काही वाईट घडल्यास मेंदू अधिकच सक्रिय होऊन जातो, तर चांगले घडल्यास तो शांत राहतो. त्यामुळे व्यक्तीने चूक केल्यास त्यासाठी तो इतरांना जबाबदार धरतो. याउलट चांगले करताना आपण त्या कामाशी तर्कसंगत असतो आणि त्यामागे कोणताही हेतू नसल्याचा भाव मेंदूत असतो.
 
डय़ूक विद्यापीठाच मनोविज्ञान आणि नूरोसायन्सचे प्राध्यापक स्कॉट ह्यूटेल यांच्या मते, निंदा आणि श्रेय या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. मात्र त्यांच्या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. हे रसायन मेंदूला सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करण्यास उद्दीपित करत असतो.