शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

काही घडण्यापूर्वीच मुलांना समजून घ्या!

NDND
शाळेत मुलांनी गोळीबार करून खून केल्याच्या घटना अमेरिकेत सर्रास घडतात. आपल्याकडे संस्कारच असे असतात, की मुले असे काही करणार नाहीत, या विचारांत आपण मश्गुल होतो. पण गुरगावला परवा घडलेल्या घटनेने आपल्या या समजूतीला जोरदार धक्का दिला. आपल्याच विचारांत मश्गुल असलेल्या पालकांना आपल्या मुलांसबंधांत गंभीर विचार करायला भाग पाडले. युरो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवीत शिकत असलेल्या आकाश यादव व विकास यादव या दोघांनी आपलाच एक सहअध्यायी अभिषेक त्यागीला गोळ्या घातल्या आणि त्याला मारून टाकले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात भांडण झाले होते. प्राचार्यांनी हस्तक्षेप करून ते सोडविलेही होते. पण त्यानंतरही असे काही होईल याची कुणाला कल्पनाही नव्हती. आम्ही यासंदर्भात काही मानसोपचार तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक यांच्याशी बोलून मुलांच्या मनात काय चाललेय याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

कार्टून चॅनल्स पाहण्यावर प्रतिबंध हवा
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. योगेश देशपांडेंच्या मते, हल्ली मुले टिव्ही फार पहातात. व्हिज्युअल मिडीयामध्ये त्यातही विशेषतः कार्टून चॅनल्समध्ये शस्त्रांचा सर्रास उपयोग दाखविला जातो. शस्त्रे हातात घेतलेले कॅरेक्टरच मग त्या मुलाचा रोल मॉडेल होते. तो जसा वागतो, तशीच वागण्याचा मुलेही प्रयत्न करतात. त्यालाच कंडक्ट डिसऑर्डर म्हणजे वर्तणूकीत विपरीत बदल असे म्हणतात. त्यामुळे मूल भांडखोर आणि समाजविरोधी बनते. आई-वडिलांपेक्षा मित्रांच्या म्हणण्याला ते जास्त किंमत देऊ लागतात. चौदा ते अठरा वर्षांच्या मुलांमध्ये हे सर्रास दिसून येते. पालकांनी अशा वेळी मुलांवर जास्त लक्ष ठेवणे हेच योग्य आहे.

अनावर भावनांचा परिपाक
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अभय पालिवाल यांनीही एक वेगळा मुद्दा पुढे मांडला. त्यांच्या मते गुरगावमध्ये घडलेल्या प्रकाराला चाईल्डहूड एग्रेशन असे म्हणतात. याचे मूळ घरातील भांडणात किंवा प्रयोग करून पाहण्याचे कुतूहल यातही असू शकते. ते पुढे म्हणतात, की मुले भावनेच्या भरात येऊन चुकीचे पाऊल उचलतात. मुलांच्या भावनेला कुठेही योग्य जागा मिळाली नाही, तर त्या उसळून बाहेर येतात व त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होते. गुरगावची घटना याचेच उदाहरण आहे. म्हणूनच पालकांनी मुलांवर लक्ष ठेवून तो चुकीच्या मार्गावर तर जात नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.

काही शिक्षकांनीही या विषयावर आपली मते मांडली. ओमप्रकाश व्यास यांच्या मते मुलांमध्ये इगो भयंकर वाढला आहे. आपला इगो राखण्यासाठी ते काहीही करायला बिचकत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांना योग्य काय अयोग्य काय हे शिकवले पाहिजे. कुसुम नवले यांच्या मते, अनेकदा भांडणे होण्याची कारणे, इगो, चिडवणे, अतिशय गळेकापू स्पर्धा, दुसऱ्याविषयीचा मत्सर यामुळे होतात. चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वर्गातील काही मुलांचे बाहेरच्या मुलांशी भांडण झाले. या मुलांना मारण्यासाठी बाहेरची मुले आली होती. त्यावेळी त्यांना मी खूप समजावले. तुम्ही यांना मारले तर तुमचा राग तुम्ही काढाल हे खरे. पण त्यानंतर होणारे परिणाम तुमचे आई-वडिल सहन करू शकतील काय हे सांगितल्यानंतर मात्र ते गप्प बसले. अशा वेळी मुलांना कोणत्या ना कोणत्या कार्यात व्यस्त ठेवले पाहिजे.

NDND
समाजशास्त्रज्ञ डॉ. डी. के. गुप्ता यांच्या मते मुलांना बिघडवण्यात टिव्ही व व्हिडीयो गेम्स कारणीभूत आहेत. मुले व्हिडीयो गेम्समध्ये शत्रूला गोळी मारून उडवतात. त्यांना ते सहज सोपे वाटते. शिवाय ते अत्यंत हर्षभरीत होतात. पूर्वी खेळ आनंदाचे साधन होते. पण आता खून खराब्यातून खेळाचा आनंद शोधला जात असेल तर ही भयावह बाब आहे. हल्ली लहान कुटुंबांमध्ये आई- वडिलांना मुलांना द्यायला वेळ नसतो. ते मुलाच्या सर्व मागण्या पूर्ण करतात. पण मुलगा मात्र स्वतःला उपेक्षित समजतो. त्याच्या मनात काय चालले आहे, ते ऐकायला कुणाकडेच वेळ नसतो. त्यावेळी त्याच्या आत असलेली मानसिक खळबळ हिंसक असू शकते.
पेडियाट्रिशियन डॉ. मनोज वैष्णव यांच्या मते, बारा वर्षापासूनच मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल घडायला सुरवात होते. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडतो. या वयाच्या मुलांमध्ये टेस्टोरस्टेरॉन संप्रेरकांचे प्रमाण वाढते. हेच संप्रेरक आक्रमकता व हिंसकपणाला जबाबदार आहे. याच काळात मुलांचा इगो खूप वाढतो. याच वयात मुली जास्त लाजाळू होतात. शारीरिक बदलांमुळे गोंधळलेले असतात. तणावाखाली असल्याने त्यांच्या वागण्यातही बदल जाणवतो.

मूल चुकीचे वागते हे कसे ओळखावे?
१. मूल सांगितलेले ऐकत नसेल तर
२. न सांगता घराच्या बाहेर जास्त काळ रहात असेल
३. घरातून पैसे गायब व्हायला लागले तर
४. छोट्या छोट्या गोष्टींवर त्याची चीडचीड होत असेल तर
५. नकारात्मक भावना दिसून येत असतील तर
६. पराचा कावळा करत असल्यास
७. छोट्या बाबींवरून मारामारी करत असल्यास
८. मित्र, जनावरांवर राग काढत असल्यास

असे वागण्याची कारणे काय?
१. तो सांगत असलेले ऐकले जात नसेल तर
२. कुण्या मोठ्या व्यक्तीने त्याच्या चुकीच्या वागण्याची तक्रार केल्यास
३. कुणाबरोबर तुलना केल्यास
४. स्पर्धेतील तणावातून
५. स्वतःविषयीच्या कल्पनांना तडा गेल्यास

अशा वेळी काय करावे
पालकांनी मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. त्याला काय म्हणायचे ते ऐकले पाहिजे. त्याच्या मनात असलेल्या भावनांना व्यक्त व्हायला जागा दिली पाहिजे. त्याचा राग शांत झाल्यानतंरही त्याच्याशी असेच वागले पाहिजे. शिवाय एरवीही रोज त्याच्याशी त्याच्या मित्रांबद्दल बोलायला हवे. त्याच्या शाळेतले किस्से मन लावून ऐकायला हवेत. शाळेतले वातावरण कसे आहे, याविषयीसुद्धा गप्पा मारायला हव्यात.